फॅक्टचेक ; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा नाही तर स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज !

19 Jul 2019 14:00:22


 


मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले मुंबई पोलीसमधील जिगरबाज अधिकारी प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) अर्ज केला आहे. ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत असणारे शर्मा यांनी ४ जुलै रोजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडे हा अर्ज दिला असून पुढील तीन महिन्यात यावर निर्णय होणार आहे. शर्मा येत्या काही महिन्यांत पोलिस दलातून सेवानिवृत्त होणार असून निवृत्ती अगोदरच त्यांच्या व्हीआरएस अर्जाने चर्चांना उधाण आले आहे.

 

शर्मा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व्हीआरएससाठी अर्ज दिल्याने ते राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा माध्यमात व पोलीस दलात पेरल्या जात आहेत. 'महा MTB' ने त्यांच्याशी संपर्क साधला असता, मी राजीनामा दिला असल्याची चर्चा ही निव्वळ अफवा असून मी राजीनामा नाही तर स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) अर्ज केला असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात प्रवेश करणार का ? असा प्रश्न त्यांना विचारला असताना राजकारणातील प्रवेशाबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत, योग्यवेळी यावर निर्णय घेतला जाईल असे शर्मा यांनी सांगितले.

 

शर्मा हे भाजप किंवा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असून अंधेरी, साकीनाका आणि नालासोपारा यापैकी एका मतदारसंघातून त्यांची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. मात्र शर्मा यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत सध्यातरी बोलणे टाळले असले तरी आगामी काळात हा जिगरबाज अधिकारी आपल्या पक्षात यावा यासाठी चढाओढ लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

 

१९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले शर्मा यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. एका बनावट एन्काऊंटर प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र २०१३ साली त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते. शर्मा यांची कारकीर्द गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरली. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त एन्काऊंटर केले असून 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा या यादीत समावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0