कोकणातील चाकरमान्यांसाठी एसटी २२०० जादा बसेस सोडणार !

    दिनांक  19-Jul-2019 


२७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

 

मुंबई : मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना कोकणातील घराच्या दारात सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची सोय केली आहे. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या २७ जुलै पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. तसेच या सेवेचा कोकणवासीयांची लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी ग्रुप बुकिंगला २० जुलै पासून सुरुवात होत आहे. संबंधितांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील १४ बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat