आजचे संकट सोमवारवर : कर्नाटकातील नाटक सुरूच

19 Jul 2019 22:12:52



बंगळूरू : कर्नाटकात सध्या मोठ्या संकटात सापडलेल्या कुमारस्वामी सरकारवरील संकट सोमवारपर्यंत टळले आहे. शुक्रवारीही कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान झाले नाही आणि विधानसभा अध्यक्षांनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता कर्नाटकचे हे राजकीय नाटक आता सोमवारपर्यंत चालण्याची चिन्हे आहेत.

 

गुरुवारी कामकाज स्थगित करणारे विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश हे शुक्रवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतील, अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत होते. परंतु, अध्यक्षांनी दिवसभरात मतदान न घेता कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “आता सोमवारी सकाळी ११ वाजता कामकाज सुरू झाल्यावर विश्वासदर्शक प्रस्तावावर सभागृहात सुरू असलेली चर्चा पुढे सुरूच राहणार असून त्यानंतर मतदान होण्याची शक्यता आहे. आमचे सरकार सोमवारी विश्वासदर्शक प्रस्तावावरील मतदानाला सामोरे जाईल,” अशी माहिती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी दिली.

 

कर्नाटकात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस व काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. परंतु, हे सरकार प्रचंड अस्थिर झाले असून गेल्या काही दिवसांत राज्यातील या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना गळती लागली आहे. एकामागोमाग एक आमदार पक्षाचा राजीनामा देत असून भाजपच्या जवळ जाऊ इच्छित आहेत. यामुळे हे सरकार संकटात आले असून विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध न करता आल्यास कुमारस्वामी यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने सत्ता टिकवण्याची धडपड काँग्रेस व जेडीएस हे दोन्ही पक्ष करताना दिसत आहेत.

 

दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी पाच कोटी रुपयांची लाच दिली असा आरोप आमदार श्रीनिवास गौडा यांनी भाषणादरम्यान केला होता. त्यावर आक्षेप घेऊन येदीयुरप्पा यांनी गौडा यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली आहे. विनापुरावा एखाद्या आमदाराने असा आरोप करणे हे अतिशय आक्षेपार्ह आहे, असे नोटीस देताना येदीयुरप्पा म्हणाले.

 

राज्यपालांची सूचना अव्हेरली

दरम्यान, शुक्रवारी विधानसभेच्या कामकाजादरम्यान राज्याचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान घेण्याची सूचना केली होती. परंतु, ही वेळ टळून गेल्यावर राज्यपालांनी पुन्हा सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्याची सूचना अध्यक्षांना चिठ्ठीद्वारे केली. मात्र त्यावरही अध्यक्षांनी कोणतीही कृती न करता कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केले आणि राज्यपालांच्या सूचनेचे पालनच केले नाही.

 

कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यपालांकडून विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप होत असून राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी अध्यक्षांना दिलेल्या वेळेबाबत कुमारस्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यपालांचा हस्तक्षेप न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

 

विधानसभेत काळी जादू..!

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे बंधू व मंत्रिमंडळातील मंत्री एच. डी. रेवण्णा हे काळ्या जादूचे प्रयोग सभागृहात करत असल्याचा आरोप भाजपने केला. रेवण्णा हे संकटकाळात हातात लिंबू ठेवतात, त्यामुळे संकटे दूर होतात, अशी त्यांची श्रद्धा आहे, असे सांगत विधानसभा सभागृहात याचप्रकारच्या गोष्टी रेवण्णा करत असल्याचे भाजपने सांगितले. परंतु, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हा आरोप फेटाळून लावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0