आंटी निघाली चर्चला । गाडीचा खोंड बिथरला । कुणी तरी बोलवा पाद्रीबुवाला ॥

19 Jul 2019 19:35:52



चर्चमध्ये जावं असं लोकांना का वाटत नाही? लोकप्रिय गाण्यांच्या चालींवर 'चर्चला चला' म्हणून जाहिरात करणारे पाद्री या मूलभूत प्रश्नावर गप्प का राहतात?

 

वरीलप्रमाणे लोकगीतांचा किंवा इतर लोकप्रिय गीतांचा आधार घेऊन लोकांना दर रविवारी सकाळी चर्चमध्ये येण्याचा आग्रह करायला 'चर्च ऑफ इंग्लंड'ने सुरुवात केली आहे. दर रविवारच्या साप्ताहिक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये येणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. हा प्रश्न इंग्लंडपुरताच नाही. सर्वत्र हीच स्थिती आहे. त्यावर तोडगा म्हणून विविध चर्चसंस्था वेगवेगळे उपाय करीत आहेत. 'चर्च ऑफ इंग्लंड'ने म्हणजे अँग्लिकन चर्चने आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून, लोकप्रिय गाण्यांच्या चालींवर नवी जाहिरातगीते बनवून लोकांना चर्चमध्ये येण्याचा आग्रह करण्याची युक्ती सुरू केली आहे. 'कँटरबरी'च्या बिशपने इंग्लंडसोबतच स्कॉटलंड, वेल्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, अर्जेंटिना येथील अँग्लिकन चर्चेसना, तसेच बाप्टिस्ट, मेथॉडिस्ट, युनायटेड रिफॉर्म्ड, साल्व्हेशन आर्मी, अलीम पेण्टेकोस्टल इ. प्रोटेस्टंट उपपंथांना आवाहन केले आहे की, त्यांनीही स्थानिक पातळीवर अशा जाहिराती बनवून प्रसारित कराव्यात.

 

आपल्याकडे 'सिंगलबारी' आणि 'डबलबारी' अशा प्रकारची भजनी मंडळं भलतीच लोकप्रिय असतात. ती हा उद्योग मोठ्या उत्साहाने करत असतात. लोकप्रिय गाणी, लावण्या, कव्वाल्या, यांच्या चालींमध्ये भजनाचे शब्द बसवून एकदम उडती, फडकती भजनं सादर करण्यात येतात. 'मला लागली कुणाची उचकी' किंवा 'ढगाला लागली कळ' अशा गाण्यांच्या चालींवर बांधलेली भजनं आपणही ऐकली असतील. गाणं शृंगारिक, चावट आहे की आध्यात्मिक, भक्तिरसाचा परिपोष करणारं आहे, एवढे कोण लेकाचा बघतोय! चाल उडती पाहिजे, गाणं फडकतं पाहिजे, पहिल्या ओळीपासून 'पब्लिक'ने ठेका धरला पाहिजे, बस्स!

 

पण, भक्तिरसाचा परिपोष करणं हे अशा भजनी मंडळाचे उद्दिष्ट नसतेच. त्यांना फक्त फड गाजवून लोकांची करमणूक करायची असते. वर 'ढगाला लागली कळ'च्या साच्यात बसवलेलं 'माझे माहेर पंढरी' ऐकून कुणी पंढरीला गेले, असे घडत नाही. तशी कुणी अपेक्षाही ठेवत नाही. मुळात त्या पंढरीची ताकद एवढी प्रचंड आहे की, लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी तिला लोकप्रिय उडत्या गाण्यांची अजिबातच गरज नाही. हे सगळे कँटरबरीच्या बिशपला माहीत नाही, असं नव्हे. कारण, मनुष्यस्वभाव सगळीकडे सारखाच असतो. पण, चर्चवाली मंडळी आता 'पेटली' आहेत. कारण, चर्चमध्ये येणार्‍या लोकांची संख्या फारच वेगाने घटत चालली आहे. युरोपातल्या ख्रिश्चन संप्रदायाचे प्रमुख मठ दोन. पहिला - 'ग्रीक ऑर्थोडॉक्स.' याच्या प्रमुखाला 'पॅट्रिआर्क' असं म्हणतात. या मठाला पूर्व युरोपातील देश अनुसरतात. दुसरा - 'रोमन कॅथलिक.' यांच्या प्रमुखाला 'पोप' म्हणतात. या मठाचे अनुयायी मुख्यत: पश्चिम युरोपीय देश आणि जगभर सर्वत्र आहेत. कारण, स्पेन आणि पोर्तुगाल या कॅथलिक अनुयायी देशांनी जगभर सर्वत्र मुलुखगिरी करून भरपूर 'बाटवाबाटवी' केली.

 

मध्ययुगात पोप आणि त्याचे एकंदर अधिकारी मंडळ हे फारच उन्मत्त आणि भ्रष्ट झालं. साहजिकच त्यांना विरोध झाला आणि एक फार मोठा गट कॅथलिक मठापासून दूर झाला. यात इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याचा पुढाकार होता. या मंडळींनी फक्त इंग्लंडचे असे 'अँग्लिकन चर्च' किंवा 'चर्च ऑफ इंग्लंड' स्थापन केले. आठवा हेन्री स्वत:च त्याचा प्रमुख बनला. तेव्हापासून इंग्लंडचा राजा किंवा राणी हेच 'अँग्लिकन चर्च'चे प्रमुख असण्याची वहिवाट पडली. तीच आजही कायम आहे. राजाला धार्मिक गोष्टींत लक्ष घालण्यास सवड नाही, म्हणून त्याचा प्रतिनिधी या नात्याने कँटरबरी येथील आर्चबिशपने एकंदर कारभार पाहावा, अशी व्यवस्था झाली. तीच प्रथा आजही कायम आहे. या लोकांनी पोपला विरोध करून 'प्रोटेस्ट' करून नवा मठ काढला, म्हणून त्यांना नाव मिळालं 'प्रोटेस्टंट.'

 

पुढे इंग्लंडने वेल्स, स्कॉटलंड यांच्याशी ऐक्य केले आणि त्यांचे मिळून ब्रिटन बनले. कारण, ते सगळेच 'प्रोटेस्टंट' आहेत आणि आयर्लंड आजही ब्रिटनविरुद्ध घातपाती कारवाया करीत असते. कारण, आयर्लंड हे कॅथलिक आहे. आपल्याकडे हजारो संप्रदाय आणि हजारो मठ आहेत. त्यांचे आपापले अहंकार आणि अभिनिवेशही आहेत. पण, म्हणून कुणी एकमेकांचे मुडदे पाडलेले नाहीत. भारताला 'मागासलेला' म्हणणार्‍या 'पुढारलेल्या' मंडळींनी हे लक्षात ठेवायला हवं. ब्रिटन 'प्रोटेस्टंट' असल्यामुळे आणि पुढील काळात त्यांचं साम्राज्य जगभर पसरल्यामुळे कॅथलिक संप्रदायाप्रमाणेच 'प्रोटेस्टंट' संप्रदायही सर्वत्र पसरला. पुढे त्यांच्यातही असंख्य भेद निर्माण झाले. 'बाप्टिस्ट,' 'मेथॉडिस्ट' वगैरे उपपंथ त्यापैकीच. या उपपंथांचे आपापले प्रमुख आहेत. ते कँटरबरीच्या आर्चबिशपला मानतातच, असं नाही. पण, 'पॅट्रिमार्क' किंवा 'पोप' यांच्यापेक्षा त्यांना आर्चबिशप जवळचा वाटतो इतकंच. ऑर्थोडॉक्स, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांचे उपपंथ, उपमठ, गट, तट असे सगळे मिळून जगभरात किमान १२०० ते १४०० विभिन्न गट आहेत. त्यांची चर्चेसतर वेगळी आहेतच, पण कबरस्तानेही वेगळी आहेत.

 

एका गटाचा माणूस शक्यतो दुसर्‍या गटाच्या चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणार नाही आणि एका गटाच्या मृताला दुसर्‍या गटाच्या कबरस्तानात पुरण्यास तर परवानगीच नाही. नियोजित विवाह असेल, तर शक्यतो एका गटाची मुलगी दुसर्‍या गटातल्या मुलाला दिली जात नाही. प्रेमविवाह असेल, तर मुलगा-मुलगी सगळ्यांनाच फाट्यावर मारतात. त्यामुळे प्रश्नच नसतो. इतक्या काटेकोरपणे जे लोक भेदभाव पाळतात, ते लोक आम्हा हिंदूंना 'विषमता पाळणारे' म्हणतात, हा केवढा विनोद आहे. हा विनोद नाही, हा उर्मट मुजोरपणा आहे आणि आम्ही बावळटपणे तो चालवून घेतो. कारण, 'इंग्रजी वाघिणीच्या दुधाने' आमची अस्मिताच नष्ट करून टाकली आहे. या सगळ्या भानगडीतला मूळ प्रश्न असा आहे की, चर्चमध्ये जावं असं लोकांना का वाटत नाही? लोकप्रिय गाण्यांच्या चालींवर 'चर्चला चला' म्हणून जाहिरात करणारे पाद्री या मूलभूत प्रश्नावर गप्प का राहतात? काही जण म्हणतात, लोक अधिकाधिक सुशिक्षित झाले आहेत, विज्ञानवादी झाले आहेत, फार तर्कवादी आणि चिकित्सक झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आता पूर्वीसारखा चर्चवर विश्वास राहिलेला नाही.

 

ही सगळीच विधाने चूक आहेत. शिक्षणाचा कमी-अधिक प्रसार हा विषय आशिया-आफ्रिका-दक्षिण अमेरिका येथील देशांचा आहे. ब्रिटनसारख्या प्रगत देशामधील शतप्रतिशत नागरिक गेल्या किमान २०० वर्षांपासूनच चांगले सुशिक्षित आहेत आणि विज्ञान, तर्क, चिकित्सा यामुळे जर लोक चर्चपासून म्हणजेच ख्रिश्चानिटीपासून दूर होत असतील, तर त्या धर्माच्या शिकवणुकीत अवैज्ञानिक, अतार्किक, बुद्धीला न पटणारं असं बरंच काही असलं पाहिजे, अशी कबुलीच एक प्रकारे तुम्ही देताय. बरं, तसं नसेल तर लोकांच्या वैज्ञानिक, तार्किक, चिकित्सक बुद्धीला पटेल अशी ख्रिश्चन धर्मतत्त्वांची नव्याने, कालसुसंगत अशी मांडणी करा की तुम्ही. त्या बाबतीत तर सगळी दिवाळखोरीच दिसते आहे. मुळात ख्रिश्चन धर्ममतात वैचारिक मांडणी फारशी नाहीच, असा बायबल अभ्यासकांचा स्पष्ट अभिप्राय आहे. लोकांना आकर्षून घेण्याचं पाद्य्रांचे एक फार मोठे बलस्थान म्हणजे त्यांची सेवाकार्ये. शाळा, रुग्णालयं, अनाथालयं याद्वारे असंख्य पाद्री आणि जोगिणी (नन्स) यांनी जगातल्या कानाकोपर्‍यात जाऊन जी सेवाकार्ये उभी केली, त्यातून असंख्य लोक ख्रिश्चन झाले. ख्रिश्चन धर्ममतांच्या वैचारिक आकर्षणामुळे नव्हे! पण, सेवाकार्याची ती पुण्याई आता सरली आहे. जगभरच्या सर्व चर्चसंस्था आता लैंगिक दुराचाराच्या वावटळीने ग्रासल्या आहेत. पाद्री आणि जोगिणी यांच्यातला दुराचार निदान नैसर्गिक तरी म्हणता येईल. पण, पाद्य्रांचा चर्चमध्ये येणार्‍या लहान मुला-मुलींशी दुराचार, ही तर विकृती आहे. चर्चमध्ये 'कन्फेशन' म्हणजे 'पापाची कबुली' नावाचा प्रकार असतो.

 

'कन्फेशन बॉक्स' म्हणजे टेलिफोन बूथसारखी एक बंद केबिन असते. त्या केबिनमध्ये पाद्री बसतो. केबिनच्या एका बाजूला एक झडप उघडलेली असते. तिथे पापी व्यक्ती गुडघे टेकून बसते आणि पाद्य्रांकडे म्हणजे येशूच्या प्रतिनिधींकडे आपल्या हातून घडलेल्या पापाची कबुली देते. पाद्य्राने त्याबद्दल कुणाकडेही वाच्यता करायची नाही, असा संकेत आहे. बरं, हे पाप म्हणजे अगदी मोठा अक्षम्य गुन्हा असतो, असं नव्हे. खोटं बोलणं, चहाडी करणं, मत्सर वाटणं, लावालाव्या करणं हेदेखील पापच आहे. त्याचे निवेदन करा आणि आपल्या मनातून ती घाण काढून टाका, असा हा खरं म्हणजे मूळ मनोवैज्ञानिक उपाय आहे. या 'कन्फेशन'चा गैरफायदा घेऊन अनेक पाद्य्रांनी अनेक स्त्रिया आणि तरुण मुलींना ब्लॅकमेल केल्याच्या अनेक घटना गेल्या दशकभरात उघडकीला आल्या आहेत. यात भारतातील पाद्रीही मागे नाहीत, बरं का! म्हणजे चर्चमधल्या प्रवचनांनी आता बौद्धिक समाधानही होत नाही आणि व्यवस्थापन, बाह्य शिस्त, सभ्य आचरणही जर संपलं असेल, तर लोक कशाला चर्चमध्ये जातील? पण तेही सगळे बाजूला ठेवा. माणूस सुशिक्षित असो वा अशिक्षित, बुद्धिवादी असो वा सश्रद्ध, पौर्वात्य असो वा पाश्चिमात्त्य, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक माणसाला काहीतरी चिंता असतेच, कसलंतरी भय असतंच आणि त्यापासून त्याला सुरक्षितता हवी असते. साधारणपणे कोणताही माणूस प्रथम देवाकडे, धर्माकडे वळतो तोही सुरक्षितता मिळावी म्हणून, मिळते म्हणून.

 

प्रार्थना केल्यामुळे मिळणार्‍या समाधानातून त्याला सुरक्षितता मिळते. त्यातून त्याला आत्मविश्वास मिळतो आणि या आत्मविश्वासातून त्याला चिंता, भय यांच्यावर मात करण्याची, दु:ख सोसण्याची, संकटांशी झगडण्याची शक्ती मिळते. वैचारिक मांडणी वगैरे पायर्‍या नंतर येतात. कित्येकांच्या जीवनात त्या पायर्‍या येतही नाहीत. त्यांना त्यांची गरजही नसते. चर्चच्या विचारातून आणि पाद्य्रांच्या आचरणातून लोकांना अशी सुरक्षितता आणि आत्मविश्वास मिळणार नसेल, तर उडत्या गाण्यांच्या जाहिराती काय कामाच्या?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0