मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर आयुक्तांनी रोखले अधिकाऱ्यांचे वेतन

    दिनांक  17-Jul-2019
 

कल्याण डोंबिवली पालिकेत आधारवाडी डम्पिंगचा मुद्दा ऐरणीवर 


 

डोंबिवली : कल्याणचे आधारवाडी डम्पिंग बंद करा अन्यथा अधिकाऱ्यांचे पगार रोखा, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. यानंतर कल्याण डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत.

 

गेली अनेक वर्षे रखडलेले आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या सूचनेकडे केडीएमसी प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याकडे तातडीने लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

 

कचऱ्याच्या प्रश्नांत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचे वेतन रोखण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यावर येत्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पडसाद उमटण्याची शक्यता होती मात्र, त्यापूर्वीच आयुक्तांनी वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत. यात उपायुक्त अमित पंडित यांसह कल्याण डोंबिवली विभागाचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, प्रमुख आरोग्य निरीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या समावेश आहेत. कामत प्रगती न दिसल्यास निलंबनाचा इशारा ही देण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat