आधी प्रपंच करावा नेटका ।

    दिनांक  17-Jul-2019मर्थांनी ‘सगुणपरीक्षा’ नावाच्या समासांतून सामान्य माणसाचे एकंदरीत जीवन चित्रण करून त्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याची आपण याआधीच्या लेखांत माहिती घेतली. भोवतालच्या समाजाचे स्वामींनी सूक्ष्म अवलोकन केले होते. हा सामान्य माणूस दुसऱ्या विवाहानंतर आजारपणातून सावरतो. कामधंदा करून सामान्यपणे जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू करतो, पण लग्नाला बरेच दिवस होऊनही त्याला मूलबाळ होत नाही, याचे त्याला वाईट वाटते. वाईट वाटण्याचे खरे कारण निराळेच असते. लोक अशा जोडप्याला ‘वांझ’ म्हणून हिणवतात, हे त्याला बोचत होते. तेव्हा पुत्र नसेना का, निदान मुलगी तरी व्हावी, असे त्याला वाटत असते.

 

पुत्रसंतान नसता दुःखी ।

वांज नाव पडिले लोकिकी ।

ते न फिटे म्हणोनि लेंकी ।

तरी हो आता ॥

 

मग त्यासाठी तो उपासतापास करतो. नवससायास करून अनेक तीर्थयात्रा करीत फिरतो. तितक्यात कुलदेवता प्रसन्न होऊन त्यांना एकदाचे मूल होते. त्या मुलावर दोघांचे अतोनात प्रेम असते. ते त्याला क्षणभर दृष्टिआड होऊ देत नाहीत. तथापि पूर्वपापाने ते मूल अचानक मरते. त्यामुळे त्यांचे नाव ‘मरतवांझ’ म्हणजे ज्याची मुले जगत नाहीत, असे पडते. त्याचे त्याला दुःख होते. त्यामुळे दोघेही भ्रमिष्टासारखे वागू लागतात. अशावेळी खंडोबा आणि कुलस्वामिनी त्यांना पावली. पण, त्यामुळे भलतेच झाले.

 

लेंकुरें उदंड जाली ।

तों ते लक्ष्मी निघोन गेली ।

बापडी भिकेसी लागली ।

काहीं खाया मिळेना ॥

 

यानंतर कुटुंबापायी त्याच्या जीवनाची कशी वाताहत झाली, याचे सांगोपांग वर्णन स्वामींनी केले आहे. अपार कष्ट करून म्हातारा झाल्यावर त्याचे आणखी हाल होतात. तत्कालीन वृद्धांची कशी हलाखीची स्थिती असे, याचे वास्तववादी वर्णन दासबोधात वाचायला मिळते. स्वामींनी वृद्धांचे हाल दाखवून उपदेश केला आहे की, आता तरी सावध व्हा आणि भगवंताला शरण जा.

 

असो ऐसे वृद्धपण ।

सकळांस आहे दारुण ।

म्हणोनिया शरण । भगवंतास जावे ॥

 

प्रपंच ‘नेटका’ होण्यासाठी प्रापंचिकांना दिलेली शिकवण प्रपंचापुरती न राहता ती सामाजिक होऊन जाते. सामान्यपणे वार्धक्याची स्थिती सर्व समाजात याच स्वरूपाची असते. अशा रीतीने सामान्य माणसाच्या जीवनातील यथार्थता स्वामींनी दासबोधात मांडली आहे. त्यातून अनेक प्रकारची शिकवण मिळत जाते. मुख्यतः स्वामींना असे सांगायचे आहे की, भगवंताला विसरून ‘मी’पणाने, अहंकाराने केलेली कृत्ये दुःखालाकारणीभूत होतात. प्रपंचात माणूस साधारणपणे ‘मी’पणाने वागत असतो. त्यामुळे त्याला प्रपंचात अनेक दुःखेभोगावी लागतात. दासबोधातील ‘स्वगुणपरीक्षा’ या समासात स्वामींनी या नरदेहाचे, कष्टप्रद जीवनाचे यथासांग वर्णन केले आहे. अगदी वाखाणण्यानिशी वर्णन केले आहे. त्याचा उपयोग स्वामींनी पार्श्वभूमी म्हणून केला आहे. एखाद्या चित्रात मुख्य विषयाबरोबर पार्श्वभूमी रंगवणे महत्त्वाचे असते. तसाच प्रकार येथे झाला आहे. कारण, ‘स्वगुणपरीक्षा’ समासात सामान्य माणसाचे जे करुणामय चित्रण डोळ्यांपुढे उभे राहते, त्या पार्श्वभूमीवर पुढील आध्यात्मिक व प्रापंचिक उपदेश मनावर ठसतो. त्या उपदेशातून स्वामींना लोकांना ‘शहाणे’ करायचे आहे. तीर्थाटनाच्या काळात स्वामींनी सामान्य लोकांचे हाल जवळून पाहिले होते. हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माची अवनती त्यांना दिसत होती. अशावेळी राजकीय स्वातंत्र्याबरोबर समाजात सुधारणा करणे अगत्याचे होते, असे स्वामींच्या मनाने घेतले. आदर्श नीतिमानता व चारित्र्यसंपन्न सशक्त तरुण पिढी त्यांना तयार करायची होती. दासबोधातील उपदेशांकडे या दृष्टीने बघितले म्हणजे दासबोध ग्रंथाचे महत्त्व कळून येते. तो नुसता आध्यात्मिक ग्रंथ नाही. लोकांना शहाणे करण्यासाठी मदत करणारा ग्रंथ आहे. स्वामींनी केलेला उपदेश फक्त आध्यात्मिक स्वरूपाचा नाही, तर ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा आहे. त्यासाठी बुद्धियोगाची म्हणजे ज्ञानयोगाची महती स्वामींनी जागोजाग सांगितली आहे.

 

स्वामींच्या मते, येहलोकी परलोकी । बुद्धिभोगचि पाहिजे ॥ सुखी संसारात स्वामींनी महत्त्व दिले आहे. इतर संतांप्रमाणे संसार म्हणजे अध्यात्ममार्गातील धोंड हे मत स्वामींना मान्य नव्हते. दरिद्री, रडक्या संसाराची स्वामींनी निंदा केली आहे. आपल्या मनाप्रमाणे वागणारी बायको व मुले असतील, तर तो पूर्वसुकृताचा योग आहे, असे स्वामींनी म्हटले आहे. समर्थांच्या मते, माणसाने दूर देशी जाऊन विद्यावंत व्हावे. उदंड मिळवून आणावे आणि सुखाने त्याचा उपभोग घ्यावा, पण भगवंताला विसरू नये. आधी कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कष्ट करायला कधी कंटाळू नये. कष्ट करून स्वतःतर सुखी व्हावेच; परंतु, घरातील स्त्री-पुरुष, दासदासी यांनाही सुखी करावे.

 

दासबोधाच्या सुरुवातीस या ग्रंथात ‘बहुदा आध्यात्मनिरोपण निरोपिले ॥’ (दा. 1.1.3) असे जरी म्हटले असेल तरी हा ग्रंथ केवळ अध्यात्मशास्त्र सांगण्यासाठी नाही, हे समर्थांनी अगोदरच मनात ठरवले असावे. दासबोध ग्रंथ हा तसा एका अर्थाने अध्यात्म आचरणाऱ्या साधकांसाठी असला तरी तितकाच तो प्रापंचिकांना सुखाने प्रपंच करण्यासाठीही आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कारण, या विचारांतील स्वामींची भूमिकाच मुळातच अशी आहे की,

 

आधी प्रपंच करावा नेटका ।

मग घ्यावे परमार्थ विवेका ।

येथे आळस करूं नका । विवेकी हो ॥

 

तसेच स्वामींना असेही वाटते की, ‘शहाणे करून सोडावे । सकळजन ॥या भूमिकांतून ग्रंथलेखन झाल्याने साधकांसाठी बद्ध, मुमुक्षू, सिद्ध याचे स्पष्टीकरण करताना त्याचबरोबर सामान्य माणसांसाठी व्यवहारशास्त्र, चांगल्या वागणुकीचे फायदे, सत्संगाचे महत्त्व यांचाही ऊहापोह केला आहे. दासबोधातील ही शिकवण सर्वांना समजावी म्हणून स्वामींनी ती पुन्हा त्यांच्या स्फुट कवितांतून, अभंगांतून पदपदांतरातून सांगितली आहे.

 

समर्थांनी वारंवार सांगितले आहे की, ‘वाईट संगत’ आणि ‘आळस’ हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. माणसाला संगतीने चांगली गती किंवा अधोगती प्राप्त होते. आत्मसुखासह सर्व प्रापंचिक व मानसिक सुखे प्राप्त होणे हे उत्तम संगतीचे फळ आहे, हे माणसाने नेहमी लक्षात ठेवावे. नीट विचार केला तर या जगात सज्जन, दुर्जन हे असणारच. विचारी पुरुषाने विवेकाचा वापर करून सज्जनांची संगत निवडावी व दुर्जनांच्या वाटेलाही जाऊ नये.

 

उत्तम संगतीचे फळ सुख ।

अद्धम संगतीचे फळ दुःख ।

आनंद सांडुनिया शोका ।

कैसा घ्यावा ॥ (दा. 17.7.17)

 

सज्जनांच्या संगतीने सत्वगुणाची वाढ होते. सत्वगुणाचे प्राबल्य झाल्याने रजोगुण आणि तमोगुण हे आपोआप कमी होऊ लागतात. सत्वगुण देहात प्रकट झाला म्हणजे संसारातील प्रापंचिक गोष्टी सांभाळत असताना भगवंताविषयी प्रेम वाढते. त्यामुळे सर्व बाबतीत विवेक जागृत राहतो. या विवेकाच्या साहाय्याने प्रपंचातील अडचणींना दुःखाला पाहून माणूस डगमगत नाही. त्याला कधी नैराश्य येत नाही. तो नेहमी प्रसन्नचित्त राहतो. अशी स्थिती प्राप्त झाल्यावर त्या माणसाला दैवही अनुकूल होते. अशा रीतीने स्वामींना समाज सुविचारी करून स्वराज्यास लायक बनवायला होता आणि तसा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. गिरिधरस्वामींनी ‘समर्थ प्रताप’ ग्रंथात लिहिलेल्या विचाराने समर्थांच्या मनातील ही आर्तता स्पष्ट करतो

 

कैसी क्षेम राहेल जगती ।

कैसी देवदेवाल्ये तगती ॥

 

स्वामींच्या उपदेशाचे भांडार अपार आहे. त्यातील काही हाती लागले तरी जीवनाचे सार्थक होईल.

 

(क्रमश:)

 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat