बी.एल.संतोष : एक कुशल संघटक

    दिनांक  17-Jul-2019   दक्षिण भारतातील राजकारणात कुशल संघटक, अशी ओळख असलेले बी.एल.संतोष यांच्यावर भाजपतर्फे राष्ट्रीय महासचिवपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांच्या कार्याबद्दल...

 

आपल्या महाविद्यालयीन कारकिर्दीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदर्श मानणाऱ्या आणि कायम संघटनेसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या बॉम्मरबेटू लक्ष्मीजनार्दन संतोष यांना भाजपमध्ये सर्वाधिक उच्चपदस्थ व्यक्तींमध्ये तिसरे स्थान मिळाले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक बुथप्रमुखांची तयारी करून घेण्याचे व त्यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम त्यांनी पार पाडले. दक्षिण भारतातील राजकारणात भाजपचे स्थान बळकट करणारा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मितेला मतदार महत्त्व देतात. अशा ठिकाणी मतदारांमध्ये राष्ट्रीय पक्षांचे संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलून धरले. राष्ट्रीय महासचिव म्हणजेच संघटन महामंत्रिपदावर नियुक्त झाल्यानंतर भाजपच्या अजेंड्याप्रमाणे दक्षिणेतील राज्यांना सत्ताकेंद्र बनवण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर असणार. मूळ कर्नाटकचे असलेले बी. एल. संतोष भाजपचे कर्नाटक राज्यातील महासचिव होते. येत्या काळातील महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावरच आहे.

 

भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदानंतर राष्ट्रीय महासचिव या पदाला महत्त्वाचे स्थान आहे. भाजपचा महासचिव महत्त्वाच्या बैठकांमध्ये प्रामुख्याने उपस्थित असतो. या जागी असलेल्या राम लाल यांची जागा बी. एल. संतोष यांनी घेतली आहे. राम लाल आता रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुखपदाचा कार्यभार पाहणार आहेत. बी. एल. संतोष यांनी कर्नाटकमध्ये लागू केलेली कार्यपद्धती संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली होती. त्यांनी प्रत्येक बुथवर कार्यकर्ते आणि बुथप्रमुखांची फौज तयार करत प्रचार व प्रसाराचे काम सुरू केले. त्यांची अत्यंत साधेपणाने राहण्याची शैली लोकांना आवडत गेली. कायम पंचा आणि धोतर अशी वेशभूषा परिधान करणारे संतोष लोकांना कायम आपल्यातील वाटतात. आजही ते पक्षसंघटनेच्या कामांसाठी जाताना हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये थांबण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यांसोबत राहणे पसंत करतात. पक्षासाठी काम करताना संघटने काम करणाऱ्या प्रत्येकाचा चेहरा आणि नाव त्यांच्या कायमस्वरुपी लक्षात असते, अशी आठवण त्यांच्याबद्दल सांगितली जाते. कर्नाटकमधील लहान लहान गावांची नावेही त्यांना तोंडपाठ आहेत. त्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी यापूर्वी वास्तव्यही केले आहे. त्या काळात संघाच्या विचारधारेला अनेकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे. तरुणपणापासून ते रा. स्व. संघाच्या विचारधारेने प्रभावित झाले. त्यांनी कर्नाटक येथील दावणगेरेस्थित बी. डी. टी. इंजिनिअरिंग महाविद्यालयात रसायनशास्त्रात अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले होते. रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनण्यापूर्वी त्यांनी एका कंपनीत तीन वर्षे नोकरी केली. त्यांच्या तंत्रज्ञान क्षेत्रज्ञानातील अनुभवाचा फायदाही संघटन कौशल्यात झाला. अविवाहीत राहून त्यांनी पूर्णवेळ संघाच्या प्रचारासाठी आपली सेवा दिली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी रा. स्व. संघाची विचारसरणी स्वीकारली होती. महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा किंवा मॉक पत्रकार परिषद विद्यार्थ्यांकडून आयोजित केली जात असे, त्यावेळेस ते विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका निभावत. चीन आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांत त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांना या विषयातील तज्ज्ञ मानले जाते.

 

रा. स्व. संघ आणि नव्याने प्रवेश घेणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये एक सेतू बनण्याचे काम ते करतात. निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यांची कार्यपद्धतीमुळे त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये वेगळा आदर आहे. 2008 मध्ये भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी भाजपचा प्रचार इतर राज्यांमध्येही सुरू केला. त्यांच्यावर त्यावेळेस दोन राज्यांच्या संघटनात्मक सचिवांची जबाबदारी सोपवण्यात आली. दक्षिणेतील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची पकड मजबूत करण्यात संतोष यांचा मोलाचा वाटा आहे. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या जागी पक्षाची पकड सैल आहे, 2024 मध्ये त्याच जागांवर पक्षाची कामगिरी उंचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. भाजपसह रा. स्व. संघामध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये युवावर्गाची संख्या लक्षणीय आहे. या साऱ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणून बी. एल. संतोष यांची आणि त्यांच्यासारख्या नेतृत्वाची मोठी मदत मिळणार आहे. एका नव्या ऊर्जेसह काम करण्याची संधी बी. एल. संतोष यांच्याकडे आहे. ‘पडद्यामागे निर्णय घेणारा एक चेहरा’ अशी त्यांनी स्वतःची ओळख तयार केली आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ प्रचारक आणि प्रसारक म्हणून काम पाहणारा नेता, अशी प्रतिमा जनमानसात त्यांनी निर्माण केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat