याद, नीरज यांची...

    दिनांक  17-Jul-2019   

‘आपली माणसं’ याची आपली व्याख्या फारच संकुचित अशीच असते. त्या व्याख्येत बसवून जात, धर्म, शेजार, रक्तनाते, गोतावळा, गाव, मग मोहल्ला अन् मग गल्ली... असे काहीही नीरज यांच्याबाबत बसत नाही. गेल्या 19 जुलैला ते गेले. तसा त्यांचा नि माझा संबंध म्हणजे प्रत्यक्ष संपर्क एकदाच... यवतमाळच्या अमोलकचंद कॉलेजला ते आले होते. तेव्हा मी कॉलेजला जाणाराही नव्हतो, तरीही नीरज येणार स्नेहसंमेलनाला म्हणून गेलो. तरीही त्या काळात लकाकत्या मानेचे देवानंद आणि मानेला झटका मारणारे राजेश खन्ना आणि केसांत टोपली टाकून आंबाड्याचा डोंगर उभारणार्या अन् आठ कोनातून लाजणार्या नायिकाच काय त्या काळात महाविद्यालय परिसरात दिसायच्या. तरीही त्यांच्यात माझी अवस्था ज्युनियर मेहमूदसारखीच; पण त्या वेळी नीरज यांनी ‘शोखीयों मे घोला जाए...’ ही कविता पूर्ण म्हणजे आठ कडवी म्हणून दाखविली होती.
 
नीरज गेले त्या दिवशी मग तनहाई वाजू लागली मनात. सुन्या सुन्या शहरांत त्यांच्या गीतांची शहनाई निनादू लागली होती. खूपसार्या आठवणी दाटून आल्या. त्यांची अन् माझी भेट होण्याचे तसे काही कारण नाही. ते ऐन बहरात लिहीत होते त्या काळात चित्रपट आणि गाणी यांचा संबंध असण्याचे ते वयही नव्हते. तो काळही त्या वयातल्या मुलांना चित्रपटांशी संबंध असण्याचा नव्हता. एकदा कुणीतरी पाहुणे उन्हाळ्यात आले होते. त्या काळात चित्रपट पाहण्याचा हा सोहळा असायचा. पाहुणे आले अन् गावात टॉकीजला चांगला चित्रपट होता. दुपारच्या जेवणानंतर चर्चा रंगात आल्या. छोट्या गावांतल्या चित्रपटगृहांत दुपारचे शो नसायचे. आता चित्रपटांनी पूर्ण धंदा केल्यावर जसे ते टीव्ही वाहिनीवर दाखल होतात, त्याचे तसे राईटस् विकले जातात, तसे त्या काळात पुण्या- मुंबईकडे चित्रपट पाहून झाल्यावर मग ते लहान गावांतल्या टॉकीजला यायचे. कदाचित त्यांचे भाव उतरलेले असायचे. त्यामुळे चित्रपट पाहणे हाही एक सोहळा होता. पाहुण्यांना ती ट्रीट होती. त्यांच्यासोबत मग बच्चेकंपनीचाही नंबर लागला. वडील म्हणाले, ‘‘अरे राहुद्या ना मुलांना घरीच. मी आहेच ना सोबत.’’ तर पाहुणे म्हणाले, ‘‘मुलांनी पाहिला तर फार फाक पडेल असा काही हा चित्रपट नाही.’’ त्या काळातले चित्रपट देशभक्तीकडे झुकलेले असायचे. त्यामुळे सिनेमा बघण्याचा योग आला. तो होता- ‘प्रेमपुजारी.’ चित्रपट नायकाच्या नावाने ओळखले जातात अजूनही. त्यामुळे या चित्रपटातली गाणी नीरज यांनी लिहिली होती, हे कॉलेजला गेल्यावर कळले.
 
 
 
शोखियोंमे घोलां जाए फुलों का शबाब, रंगीला रे तेरे रंग मे, फुलों के रंग से... ही गाणी खूपच आवडली त्या वयातही. ती गाणी तोंडात बसली. अर्थ कळत नव्हता. अर्थ कळण्याच्या वयात ही गाणी ऐंशीच्या दशकातली सर्वाधिक लोकप्रिय गाणी होती. तोवर मग नीरजही कळले होते. त्यांच्याविषयी मग बर्यापैकी माहिती गोळा झाली होती. न्हाव्याच्या दुकानात गेल्यावर तिथे फिल्मी मॅगझिन्सच पडून असायची. माधुरी अन् मनोरमा, ब्लीटझ् ही मासिके पडून असायची. त्यातून आपले फिल्मी ज्ञान वाढत गेले. उत्सुकता होतीच, कारण ‘चित्रपट बघायचा नाही,’ या दंडकापासून ‘आता बघू द्या ना, वयात आलाय तो’पर्यंतचा प्रवास पार पडला होता. तरीही कुठला चित्रपट बघायचा यावर वडिलांचे अन् घरातल्या मोठ्यांचे सेन्सॉर असण्याचा तो काळ होताच. त्यामुळे उत्सुकता होतीच. आकर्षणही होते. अटकाव असल्याने त्यात वाढ होत गेली.
 
 
त्या दिवशी पाहिला चित्रपट अन् ती नीरजची पहिली भेट, असेच म्हणावे लागेल. कुठल्याही कवीची प्रत्यक्ष भेट होण्यापेक्षा त्याच्या शब्दांची भेट होणे अन् त्याने आपल्याला गुंतवून ठेवणे, आपल्या मनातल्या भावनांना त्याचे शब्द चपखल बसणे, हीच खरी भेट असते. नंतर नीरज यांचे कवितासंग्रहदेखील मिळविले. मित्रमंडळीतही नीरज फेमस होते. त्यामुळे त्यांच्याविषयी खूप माहिती आपल्याला आहे, हा गौरवाचा विषय होता. कुणीतरी म्हणाले होते दहावी-अकरावीला असताना की, ‘‘काय त्या नीरजचे फ्राड रे तुम्हाला? चित्रपटांतली गाणी लिहितो तो माणूस.’’ तेव्हा त्याच्या तोंडावर नीरज यांचा अथक संघर्षच फेकला होता. ‘‘ते केवळ चित्रपटांची गाणी नाही लिहीत. ते हिंदीचे प्राध्यापक होते’’पासून ‘‘त्यांनी टायपिस्टची नोकरी केली,’’ इथवर सारेच सांगत सुटलो. त्यावर तो समोरचा कान पिळणारा म्हणाला, ‘‘त्यांना त्यांच्या कॉलेजने, प्रेम प्रकरण करता अन् तास घेत नाही म्हणून आरोप ठेवला होता,’’ असे सांगितले. आता त्याही वेळी, प्राध्यापक आहेत म्हणून त्यांनी प्रेम करूच नये का? अन् प्रेम म्हणजे काय केवळ स्त्री- पुरुषातलेच असते का? देशावरही असतेच ना प्रेम आपले, आपल्या शाळेवरही असते अतूट असे प्रेम, असे वाटून गेले. प्रेम करणे हा गुन्हा कसा ठरतो?
 
त्यांच्या आयुष्यातला संघर्ष अखेरपर्यंत संपलाच नाही. ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ मिळाले. तीन वेळा त्यांना फिल्म फेअरही मिळाले. त्यांची गाणी आजही रसिकप्रियच आहेत. त्यांच्या कविताही खूपच अभिजात अशाच आहेत. गोपालदास नीरज यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. ते सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील बाबू ब्रजकिशोर सक्सेना यांचे निधन झाले. ते दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी इटावामध्ये कचेरीत टायपिस्ट म्हणून काम केले. नंतर चित्रपटगृहातील एका दुकानावरही काम केले. ते काम सुटल्यावर बेरोजगारीत दिवस काढल्यावर ते दिल्लीला गेले अन् स्वच्छता विभागात टायपिस्ट म्हणून नोकरी पत्करली. ही नोकरी सुटल्यावर कानपूरमध्ये त्यांनी डीएव्ही कॉलेजमध्ये लिपिक म्हणून काम सुरू केले. नोकरी करत त्यांनी परीक्षा देत बी. ए. आणि नंतर हिंदी साहित्याची प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली. मेरठ येथे हिंदीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्यावर वर्ग वेळेवर घेत नसल्याचे आणि प्रेम प्रकरणात गुंतल्याचे आरोप केले. यामुळे नाराज झालेले नीरज यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अलिगढच्या धर्म समाज कॉलेजमध्ये ते हिंदीचे प्राध्यापक झाले. अलिगढमध्ये मॅरिस रोडवर घर बांधले आणि त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते...
हे सगळे त्या माणसाला मला सांगायचे आहे. ‘‘एकही गुनाह हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमीसे प्यार करतां हूँ...’’ असे म्हणणारे नीरज, माणसांवर अन् माणुसकीवर प्रेम करणारे नीरज, त्या वयात कुण्या मुलीवरही प्रेम करत असतील तर तो काय गुन्हा ठरतो का?
 
प्रेमावर त्यांनी खूप गहिरं असं लेखन केलं. ‘‘मी आलो नि प्रेमावर लेखन सुरू झालं अन् मी गेलो की ते संपलेलं असेल,’’ असं ते म्हणाले होते. कविता करणार्या या माणसाला चित्रपटांची गाणी लिहिण्यासाठी देव आनंदने आणले. देव आनंद यांनी लखनऊतील एका मुशायर्यात त्यांच्या कविता ऐकल्या. त्यांना चित्रपटांत गाणी लिहिण्यासाठी मुंबईला बोलावले. ‘कारवॉं गुजर गया,’ हे गाणे हिट झाले. त्याआधी याच नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आला होता. साठच्या दशकात युवा पिढीत र्तुफान लोकप्रिय होता.
 
 
त्या काळात देव आनंद यांच्या ‘प्रेमपुजारी’ या चित्रपटाचे काम सुरू होते. सचिनदांना त्याच्यासाठी काही अनवट अशी गाणी हवी होती. रंगीला या शब्दापासून सुरू होणारे गाणे हवे होते. नीरज यांनी तिथेच त्यांच्या कार्यालयात बसूनच हे गाणे लिहून दिले- रंगीला रे तेरे रंग में... अर्धशतकानंतरही ते तसेच ताजे आहे. 50 वर्षांनंतरही तसेच ताजे, टवटवीत वाटते. ‘प्रेमपुजारी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘शर्मिली’तली त्यांनी लिहिलेली गाणी हिट झाली, पण चित्रपट पडले. त्यांच्यावर ‘पनौती’ असा शिक्का मारला गेला. ज्या देव आनंदने त्यांना आणले त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरविली... असे काळजाला लागून राहणारे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात वारंवार येत राहिले. कदाचित वेदनांची गाणी व्हावीत यासाठीच ते असावे. वेदनांची अशी गाणी झाली की गाण्यांचे वेद होत असतात.
बदन के जिसके शर्रोंत का पैरहन देखा,
वो आदमी भी यहॉं हमने बदचलन देखा...
ही कविता सादर करताना, त्यांच्यावर त्यांच्या महाविद्यालयाने केलेला आरोप किती जिव्हारी लागला होता, हे कळायचे. हरिवंशराय बच्चन, ओशो यांनी मात्र या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. कलावंतांना समजून घेण्यासाठी ऐहिक सुखांच्या पलीकडे असलेली संस्कृती भिनली असली पाहिजे. कलावंताला समजून घेणे ही खरी सांस्कृतिकता असते.