वांद्रे -कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान : मुख्यमंत्री

17 Jul 2019 17:27:51


 


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा वांद्रे-कुर्ला संकुलातील सी ६५ हा भूखंड जपानच्या मे.गोईसू रियल्टी प्रा. लिमिटेड कंपनीला देण्यासंदर्भातील देकार पत्राचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष कोजून निशीमा यांना करण्यात आले. यावेळी वांद्रे-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी मुंबई व देशातील आदर्श स्थान असून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या स्थापनेनंतर हे संकुल जागतिक घडामोडीचे केंद्र होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात जपानचे भारतातील मुख्य कौन्सिल मासाहिडे सोतो, कंपनीचे संचालक हिसातोषी काटायामा,संपादन विभागाचे प्रमुख रायजू अमामिया, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए.राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यावेळी उपस्थित होते. गोईस रियल्टी ही जपानमधील बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. थेट परकीय गुंतवणूक अंतर्गत या कंपनीची उपकंपनी असलेली सुमोटोमो रियल्टी डेव्हपलमेंट कंपनी ही भारतात गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने वांद्रे कुर्ला संकुलातील सी-६५ हा भूखंड गोईस रियल्टी कंपनीस २ हजार २३८ कोटी इतक्या रकमेस भाडेपट्टीने देण्यात आला आहे. यासंबंधीचे देकार पत्र बुधवारी कंपनीला देण्यात आले. १२ हजार ४८६ चौ.मी. भूखंडावर ही कंपनी इमारत उभी करणार आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वांद्रे-कुर्ला संकुलात मोठ-मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. गोईस रियल्टीच्या सुमोटोमो कंपनीने वांद्रे-कुर्ला संकुलात गुंतवणूक केल्यामुळे येत्या पाच वर्षात तिची भरभराट होईल. सुमोटोमो व एमएमआरडी यांच्यातील सहकार्याचा हा क्षण भविष्यासाठी मोलाचा ठरणार आहे. बांधकाम क्षेत्रातील हा सर्वात मोठा सौदा असून या व्यवहारामुळे गुंतवणुकदारांसाठी नवीन मार्ग खुला झाला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाची माहिती देऊन महानगर आयुक्त राजीव म्हणाले की, मोठ्या वेगाने विकसित होत असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये अधिकाधिक जागतिक कंपन्या गुंतवणूक करत आहेत. निशीमा म्हणाले की, "गोईसू ही कंपनी जपानमधील बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहे. मुंबई हे ठिकाण व्यवसायासाठी उत्तम असल्यामुळे येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यापुढील काळातही कंपनी येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. त्यातून राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल."

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
Powered By Sangraha 9.0