‘का रे दुरावा?’

    दिनांक  16-Jul-2019


 
 
 
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही काँग्रेसमधील शह-काटशहाचे राजकारण थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत त्यात आणखी भर घातली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी वारंवार होणाऱ्या मतभेदांनंतरच सिद्धू यांनी राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करताना सिद्धूंचे अमरिंदर सिंग यांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत केले होते. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर या दोन नेत्यांमध्ये दिवसेंदिवस इतका दुरावा निर्माण झाला की त्याची जागा दोषारोपांनी घेतली. भाजप सोडून काँग्रेसचा ‘हात’ धरणाऱ्या सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदर यांच्या कठोर स्वभावाचा सामना करावा लागणार, हे चांगलेच ठाऊक होते. त्याची पूर्वकल्पना असतानाही त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची इच्छा मनात असल्यानेच सिद्धू यांनी ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळातच काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे सर्वश्रुत आहे. त्यानंतर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ताही आली. मात्र, पक्षात नवख्या असलेल्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकणे काँग्रेसच्या स्वभावात नाही. जुन्याजाणत्या अमरिंदर सिंग यांना काँग्रेसने मुख्यमंत्री बनविले आणि सिद्धू यांच्याकडे नगर-विकास, सांस्कृतिक यांसह अन्य काही वजनदार खाती सोपवून काँग्रेसने सरकार चालविण्यास सुरुवात केली. पंजाब विधानसभेच्या पाच वर्षांपैकी अडीच वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण होत आला आहे. त्यामुळे उरलेल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आपल्याकडे असावी, असे केवळ सिद्धूच नाही, तर इतर अनेक काँग्रेसींना वाटू लागले आहे. यासाठी पक्षश्रेष्ठींशी भेटून त्यासाठी सोयीस्कररित्या मार्ग काढण्याचे प्रयत्नही त्यांनी सुरू केले आहेत. अडीच वर्षांत पंजाबमध्ये योग्यरित्या सरकार न चालविल्यानेच लोकसभेत कसे नुकसान सोसावे लागले, याचे दाखले ते पक्षश्रेष्ठींना देत सुटले आहेत. अमरिंदर यांच्या एककल्ली कारभारामुळेच आपल्या पत्नी नवज्योत कौर यांचा पराभव झाल्याचा आरोप सिद्धूंनी जाहीरपणे केला होता. अनेकदा याबाबत तक्रारी करूनही आपल्या प्रतिस्पर्ध्याविरोधात कारवाई होत नसल्याने सिद्धू यांनी या सर्वाला कंटाळून राजीनामा दिला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबरोबर सिद्धू यांचा दुरावा मुख्यमंत्रिपदाच्या निवडीपासूनच होता. त्यात सिद्धू यांनी इमरान खानच्या शपथविधीप्रसंगी केलेला लाळखोटेपणा, लष्करप्रमुख बाजवांना मारलेली मिठी, अखेरीस सिद्धूंनाच घेऊन बुडाली.
 
 

बंडाळी, अपयश आणि काँग्रेस

 

पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा सोपविल्यानंतर काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद सोडविण्यात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अपयशी ठरला, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पण, ही काही पहिलीच वेळ नाही. दोन वरिष्ठ नेत्यांमधील वाद सोडविण्यात काँग्रेस पक्ष कमी ठरत असल्याचे अशा घटनांवरून दिसून येते. पण, जिथे काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडीचेच भिजत गोंघडे आहे, तिथे इतर अंतर्गत वादांना महत्त्व ते काय....सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच जवळपास दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील दोन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्येही असाच दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यातही अनेक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे उघडकीस आले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दिल्ली दरबारीही हा वाद पोहोचला. मात्र, सक्षम निर्णय न झाल्याने परिणाम शून्य. राणे यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला आणि कोकणचे वर्चस्वही काँग्रेसच्या हातून निसटले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही संजय निरूपम आणि गुरुदास कामत या दोन वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत खदखद वारंवार चव्हाट्यावर आली. याच्या तक्रारीही पक्षश्रेष्ठींपर्यंत आल्या. मात्र, पुन्हा तोच कित्ता काँग्रेसकडून गिरवण्यात आला. नेते वाद घालत राहिले आणि महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आणखी घटली. देवरा-निरुपम वादही चव्हाट्यावर आलाच. लोकसभा निवडणुकीच्या आधीही काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत धुसफूस वारंवार चव्हाट्यावर येतच राहिली. विदर्भातील अनेक नेते प्रदेशाध्यक्षांविरोधात तक्रारींचा पाढा प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे वाचू लागले. पुन्हा तोच परिणाम. पक्षश्रेष्ठींकडून वेळीच निर्णय न घेतल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला 48 पैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांतही तसेच झाले. सिद्धरामैय्यांच्या तक्रारीही अनेकांनी केल्या. मात्र तोच आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे सांगत काँग्रेसने निवडणुका लढल्या. परिणाम सर्वांसमोर आहेच. अंतर्गत बंडाळीमुळे पक्षाचे वारंवार नुकसान होत असूनही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना अशा नेत्यांबाबत सक्षम निर्णय घेण्यात रस नसल्याचे दिसते. त्यामुळे काँग्रेसला केवळ पक्षाध्यक्षच नव्हे, तर कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सर्व पातळीवर पक्ष टिकवण्यासाठी संघटन पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय भवितव्य नाही, हे निश्चित.

- रामचंद्र नाईक

 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat