अमेरिकेतील चार पुरोगामी का तुकडे-तुकडे चौकडी

    दिनांक  16-Jul-2019   १४ जुलै रोजी आपल्या ट्विटमध्ये ट्रम्प म्हणाले की, “या सदस्य अशा देशांमधून अमेरिकेत आल्या, जिथे अनागोंदीची परिस्थिती, सरकारे अत्यंत भ्रष्ट असून कारभार करण्यास असमर्थ आहेत. काही ठिकाणी तर सरकार नामक यंत्रणाच अस्तित्त्वात नाही. असे असूनही त्या अमेरिका या जगातील सर्वात शक्तीशाली आणि महान देशाने राज्यकारभार कसा करावा, हे उच्चरवात सांगत असतात. एवढंच आहे तर त्यांनी आपल्या मूळ देशात परत जावे. तिथली गुन्हेगारीने बरबटलेली आणि अराजकसदृश्य परिस्थिती सुधारावी आणि मग इकडे येऊन सांगावे की, हे त्यांनी कसे केले?”

 

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदींना विजयी करण्यात देशातील स्वतःला पुरोगामी म्हणविणार्‍या दांभिक कंपूने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी २०१४ सालापासून सतत पाच वर्षे अनेकवेळा राईचा पर्वत करून देशात भय आणि असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकांमध्ये तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांहून हिरीरीने प्रचार केला. मोदींचा विरोध करता करता त्यांनी वेळोवेळी राष्ट्रविघातक शक्तींना, इतकेच काय बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानलाही पाठिंबा दिला. या वर्गातून येणार्‍या काही बुद्धीवादी-उच्चशिक्षित नेत्यांमुळे काँग्रेस आणखी डावीकडे झुकली. या सगळ्याचा मतदारांवर विपरित परिणाम होऊन त्यांनी मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपला गेल्या वेळेपेक्षा भव्य विजय मिळवून दिला. अमेरिकेत तर जिभेवर कोणताही लगाम नसलेले डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष आहेत. मग विचार करा, आजवर जगाला ज्ञान देणारी अमेरिकेतील पुरोगामी मंडळी ट्रम्पवर किती खार खात असतील? पहिली दोन वर्षं तर त्यांनी ट्रम्प किमान चार वर्ष अध्यक्षपदी राहतील, हे मान्य करायलाच नकार दिला होता. पण ट्रम्प काही पदच्युत झाले नाहीत.

 

अध्यक्षपदी असूनही ट्रम्पच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाहीये. कधी ट्विटरवर तर कधी मुलाखतींतून ते आपली अमेरिका आणि जगाबद्दलची मतं; खरंतर त्यांना पूर्वग्रह म्हणणं योग्य ठरेल; अप्रच्छन्नपणे मांडतात. त्यांच्या मुलुखमैदानी तोफेचा रोख कधी मेक्सिकोतून बेकायदेशीरपणे आलेल्या लोकांकडे असतो; कधी सीएनएन आणि न्यूयॉर्क टाइम्ससारख्या माध्यमांकडे, तर कधी तो चीन किंवा भारताकडे असतो. पण यावेळी त्यांनी सभ्यपणाच्या सर्व मर्यादा सोडत डेमोक्रॅटिक पक्षाच्या चार अश्वेतवर्णीय महिला लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले. १४ जुलै रोजी आपल्या ट्विटमध्ये ट्रम्प म्हणाले की, “या सदस्य अशा देशांमधून अमेरिकेत आल्या आहे, जिथे अनागोंदीची परिस्थिती, सरकारे अत्यंत भ्रष्ट असून कारभार करण्यास असमर्थ आहेत. काही ठिकाणी तर सरकार नामक यंत्रणाच अस्तित्त्वात नाही. असे असूनही त्या अमेरिका या जगातील सर्वात शक्तीशाली आणि महान देशाने राज्यकारभार कसा करावा, हे उच्चरवात सांगत असतात. एवढंच आहे तर त्यांनी आपल्या मूळ देशात परत जावे. तिथली गुन्हेगारीने बरबटलेली आणि अराजकसदृश्य परिस्थिती सुधारावी आणि मग इकडे येऊन सांगावे की, हे त्यांनी कसे केले?”

 

या ट्विटमुळे अमेरिकेत राजकीय भूकंप झाला. एरवी असे कोणी म्हटले तर त्याला वर्णद्वेषी ठरवून त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकेल. या चार लोकप्रतिनिधींपैकी तीन जन्माने अमेरिकन आहेत, तर एक अगदी लहानपणी अमेरिकेत स्थायिक झाली होती. १३ भावंडं असलेल्या रशिदा त्लाइब पॅलेस्टिनियन-अरब पार्श्वभूमीच्या आहेत. हिजाब घालणार्‍या इल्हान उमर यांच्या आई वडिलांना सोमालियातील यादवी युद्धामुळे तेथून पळ काढून अमेरिकेत आसरा घ्यावा लागला होता. अयाना प्रेस्ली कृष्णवर्णीय असून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आल्या आहेत. अलेक्झांड्रा ओकॅशियो कार्टेझ या केवळ २९ वर्षांच्या असून पोर्तोरिकन पार्श्वभूमीच्या आहेत. त्यांनी बारमध्ये काम केले होते. अमेरिका हा देश स्थलांतरितांचा असून ट्रम्प यांची सध्याची पत्नी मेलानिया यांचा जन्मदेखील स्लोव्हेनियात झाला होता. २००६ साली त्यांनी अमेरिकन नागरिकत्व प्राप्त केले. त्यामुळे एका अर्थाने या सर्वांचे प्रतिनिधीगृहात निवडून जाणे, हे लोकशाहीच्या बळकटीकरणाचे लक्षण आहे. पण अमेरिकेतील स्थलांतराला छटा आहेत.

 

आजवर स्थलांतर होत असूनही अमेरिकेचा; खासकरून त्याच्या राजकारणाचा तोंडवळा श्वेतवर्णीय, अँग्लो-सॅक्सन, प्रोटेस्टंट, पुरुषप्रधान होता. त्यामुळेच तेथे आजवर एकही महिला अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकली नाही. अल्पसंख्याक धर्मांतील किंवा वंशातील अनेक लोक राजकारणात वरच्या पदापर्यंत पोहोचले असले तरी, अमेरिकेला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्यासाठी २००८ सालची वाट पाहावी लागली. त्यात ओबामांचीही आई श्वेतवर्णीय होती आणि आपण ख्रिस्ती धर्म पालन करत असल्याचे ओबामांना वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लोकांना सांगावे लागले. तीच कथा बॉबी जिंदल किंवा निकी हेलीसारख्या भारतीय वंशाच्या राजकारण्यांची. अमेरिकेतील एकमेव हिंदू संसद सदस्य तुलसी गबार्ड या श्वेतवर्णीय आहेत आणि हवाईतून निवडून आल्या आहेत. अमेरिकेतील ज्यू धर्मीयांचा अनेक उद्योग, माध्यमं आणि विद्यापीठांमध्ये प्रभाव असला तरी आजवर एकही ज्यू अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकला नाही. थोडक्यात काय तर अमेरिकेत अल्पसंख्याक समाजातील राजकारण्यांना आपण धार्मिक किंवा वैचारिक मुख्य प्रवाहाचा भाग आहोत, असे दाखवल्याशिवाय राजकारणात सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणे अवघड आहे.

 

पण ट्रम्प यांच्या निवडीनंतर या व्यवस्थेला वेगाने तडे जाऊ लागले आहेत. मुख्य प्रवाहाबाहेरची... अनेक विषयांत टोकाची मतं असणार्‍या आणि अल्पसंख्याक गटांतून येणार्‍या महिलांनी राजकारणात मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला असून यशही मिळवले आहे. त्यातील काहींचे आर्थिक आणि गरिबी निर्मूलनाबाबतचे विचार साम्यवादाजवळ जाणारे आहेत, काही मुस्लीम मूलतत्त्ववादाची पाठराखण करणारे आहेत, कोणी अवैधरित्या अमेरिकेत आलेल्यांना नागरिकत्व देऊन त्यांना सामावून घ्यायचे समर्थन करतात तर कोणी टोकाचे पर्यावरणवादी आहेत. थोडक्यात काय तर त्यांनी आजवरच्या राजकीय प्रवासात वेळोवेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बहुसंख्य मतदारांपेक्षा टोकाची डावी भूमिका घेतली आहे.

 

वेळप्रसंगी आपल्या 'वंचित' पार्श्वभूमीचा ढाल म्हणूनही वापर केला आहे. आपल्या व्यक्तिगत मतांना डेमोक्रॅटिक पक्षात राजमान्यता मिळवण्यासाठी त्यांनी 'द स्क्वॉड' या नावाने ओळखला जाणारा दबावगट निर्माण केला आहे. त्यांच्या या यशामुळे अमेरिकन समाजातील विविध धार्मिक, वांशिक आणि वैचारिक अल्पसंख्याकांच्या पाठिंब्याने सत्तेवर येणार्‍या डेमोक्रॅटिक पक्षाच्या एकीला तडे जाऊ लागले आहेत. मागे इल्हान उमर यांनी इस्रायलला पाठिंबा देणार्‍या अमेरिकन नागरिकांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्याबद्दल त्यांना माफीही मागावी लागली होती. गेल्या आठवड्यात 'द स्क्वॉड'च्या सदस्यांनी मेक्सिकोच्या सीमेवर अवैध घुसखोरांना ताब्यात घेऊन बंदिस्त करण्यासाठी व्यवस्था उभारण्यास समर्थन करणार्‍या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांविरुद्ध अगदी पक्षाच्या सर्वोच्च नेत्या आणि प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्याविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. तसे करताना आपण भिन्न वर्णाच्या असल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा कांगावा केला. त्यामुळे पेलोसी आणि त्यांच्यात वाक्युद्ध झडले. त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला.

 

ट्रम्प आणि पेलोसी यांच्यातूनही विस्तव जात नाही. पण ऑकॅसियो-कार्टेझ यांच्या पेलोसींबद्दलच्या वक्तव्यांनी व्यथित होऊन आपण त्यांच्यावर टीका केली, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे टीका करताना ट्रम्प यांनी अनेक धादांत खोटी विधानं करत 'द स्क्वॉड'च्या सदस्यांना अल-कायदाचे समर्थक बनवून टाकले. त्यासाठी गेले दोन दिवस अमेरिकन वृत्तमाध्यमांसह ट्रम्प यांच्या पक्षाचे नेतेही त्यांच्यावर टीका करत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाला आणि खुद्द नॅन्सी पेलोसींनाही 'द स्क्वॉड'च्या मागे उभे राहाणे भाग पडले आहे. ट्रम्प यांनी मधमाशांच्या पोळ्याला दगड मारला असला तरी चवताळलेल्या माश्यांचा डंख डेमोक्रॅटिक पक्षाला बसू शकतो.

 

या वादामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे केंद्र टोकाच्या डाव्या सदस्यांकडे सरकू लागले आहे. त्यामुळे पुढची निवडणूक टोकाचे उजवे असलेले ट्रम्प आणि टोकाच्या डाव्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारामध्ये होऊ शकते. असे झाल्यास राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेने ग्रासलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे अनेक मध्यममार्गी मतदार नाईलाजाने रिपब्लिकन पक्षाला मत देतील किंवा मतदानाला बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे २०२० साली ट्रम्प पुन्हा जिंकले तर त्याचे श्रेय डेमोक्रॅटिक पक्षाच्या टोकाच्या डाव्या विचारांच्या तरुण महिला खासदारांकडे नक्की जाईल. निवडणुकांच्या पलीकडे विचार केल्यास असे दिसते की, एकीकडे ट्रम्प आणि दुसरीकडे 'स्क्वॉड' यांच्यामुळे अमेरिकन ओळख, मूल्य आणि संस्कृती यांच्या शाश्वतेबद्दल शंका उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat