माझ्या गुरूंच्या सहवासात...

    दिनांक  16-Jul-2019

नमू विघ्नहर्ता, मूळ सृष्टिकर्ता ।

तूच सुखकर्ता, तूचि दुःखहर्ता ॥

तूच गणाधीश, इंद्रिया दमन।

तूच गुरूराया, गणेश देवा ॥

सकळ तीर्थांचे, तीर्थ तुझे पाय।

प्रसादाचा प्रसाद, तुझी कृपा ॥

रघुसुत म्हणे, आलो तुला शरण ।

भवबंध तुटले, चुकले मरण ॥

(रघुसुतकृत गुरूपाठ)

 

वेदकाळापासून ते आजपावेतो ज्ञानाचा प्रवाह अखंड सुरू आहे तो गुरू-शिष्य परंपरेनेच. अगदी प्रारंभी ईश्वराने मानवी रूपात अवतरून गुरुत्व आणि शिष्यत्वही स्वत:च धारण करून स्वधर्म आचरला आणि मनुष्यास त्याचा धर्म शिकवला.

 

वेदपूर्वकाळात मानवास ज्ञान देणारा कोणीही नव्हता. याकरिता ईश्वराने जशी आपल्याच सत्तेने त्रिगुणात्मक प्रकृती निर्माण केली, तसेच त्यावेळी पुन्हा स्वत:च प्रकृतीच्या आश्रयाने तीन गुणांच्या प्रभावाने स्वत:ला उत्पन्न करून माता-पित्याच्या पोटी ऋषींच्या रूपाने अवतार घेतला. त्या ऋषींनी वेद ऐकले, जाणले, मुखोद्गत केले. स्वत: जाणले, मग शिष्यांना शिकवले. ज्ञानाला गती मिळाली. परंपरेने मुमुक्षुंपर्यंत ते ज्ञान प्रवाहित झाले. काळाच्या ओघात ऋषिमुनी आपले अवतार संपवून निघून जातात. काळ पुढे पुढे सरकतो आहे. तरी अवतारकार्य मात्र आजही चालू आहे.

  

काळ बदलला, तशी समाजधारणा बदलली. मनुष्याचा वेष बदलला, समाजप्रवाहात अवतारी ऋषींचा वेष पालटला. देव-देवतांचे वेष आले. त्यांनीही आपले अवतारकार्य संपवले. पुढे कालौघात संत-मुनिजन अवतरले. काळाबरोबरच ईश्वरही गूढरित्या जगरहाटीप्रमाणेच वागून आपले कार्य करीत आहे. आजही संत आहेत. आपण त्यांना ‘सद्गुरू’ म्हणून ओळखतो. त्यांच्या सर्वसामान्य बाह्य रहाटीकडे पाहून त्यांचे स्वरूप जाणणे कठीण होते. तरीपण ते स्वस्वरूपास पावले आहेत, हे जाणणे गरजेचे आहे. अशारीतीने निर्गुण-निराकार ईश्वरच परंपरेने ज्ञानदाता होतो. ऋषिमुनी, देवदेवता, संतजन, सद्गुरू ही त्या अचिंत्य अशा परमात्म्याची अवतार गाथा जो जाणतो, तोच परम पदास पोहोचतो.

 

माझ्या मागील जन्मांची काहीतरी पुण्याई असणार म्हणूनच या खेपेस गुरुतुल्य माता-पित्याच्या पोटी जन्म होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले आहे. त्या भाग्यानेच मला हरिनामाची गोडी लागली आणि तशातच ग्रंथांप्रमाणे उपजीवन असणार्‍या पित्याच्या सहवासात संतजनांची संगती लाभली. मग हाती ग्रंथ घेऊन हरिभक्तीचा डांगोरा पिटत माझा जीवनक्रम चालू राहिला. संतमुनिजनांच्या बरोबरीनेच हरिनामाचा झेंडा हाती घेऊन ज्यांना भक्तीचा लळा लागला, त्यांच्यासाठी संतांकडून मिळालेला ज्ञानाचा ठेवा शब्दप्रपंच करून मी वाटत चालत आहे. पित्याच्या अनुज्ञेने मी याज्ञिक होऊन हा शब्दयज्ञ मांडला आहे. या यज्ञातील यज्ञदेवता साक्षात पिता आहे. ऋषिस्वरूप माझ्या पित्याच्या सहवासात बालपण आणि तारुण्यही सरत असतानाच माझी गृहस्थाश्रमाची पूर्तता होऊन मी वानप्रस्थाश्रमात पारमार्थिक पांथस्थ कसा झालो, हे माझे मलाच कळले नाही.

 

गीतेच्या गाभार्‍यातील भाव अंत:करणास चिकटला तो प्रत्यक्ष माझे परमपूज्य वडील कै. दादा यांच्या जीवनाचे पैलू न्याहाळताना. त्यांचे जीवन हे स्वत:साठी नव्हतेच. कौटुंबिक प्रपंचातील प्रवासात आपले तन-मन-धन हे स्वत:चे न मानता केवळ इतरांच्या जीवन उभारणीत ते व्यतीत करण्याच्या त्यांच्या मनोवृत्तीतून तेच संस्कार नकळत माझ्या मनावर बिंबवले गेले आणि आज गीतेचा लक्षपूर्वक अभ्यास करताना गत आयुष्यातील रोजनिशी मनाशीच पडताळून पाहिली अन् गीतेचा प्रत्यक्ष मतितार्थ अधिक दृढ झाला. तो म्हणजे ‘निष्काम कर्मभाव’, जो दादांच्या जीवनशैलीतच भरलेला असल्याचे जाणवते. प्रपंचात लोकांना साहाय्य करूनसुद्धा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता पुन्हा जीवन मार्गक्रमण करीत राहणे, या त्यांच्या विचारसरणीतच गीतेचे दर्शन घडते. पुण्यवान माता-पिता लाभले, हाच भगवंताचा कृपाशीर्वाद पावला आणि धन्य झालो. गुरुतुल्य पित्याचे जीवनमूल्य शिरसावंद्य मानले म्हणूनच आज ’भगवद्गीतेतील जीवनयोग’ साध्य होऊन धन्य पावलो.

 

मनुष्याजवळ असणारे ज्ञान आणि भक्ती ही जरी त्याला मुखातून शब्दरूपाने सांगता आली नाही, तरी ती अंत:करणात ठसलेली असल्यामुळे परिणामत: त्याच्या कर्मात उतरलेलीच असते आणि असा मनुष्य त्याच्या कर्ममार्गात निष्कामता आणि स्थिरबुद्धी ठेऊनच वागतो. नेमके हेच दर्शन मला गुरुतुल्य वडिलांचे झाले. असो. आज त्यांचे चरित्र सांगणार नाही, परंतु गीता जीवनात उतरविण्याची प्रेरणा त्यांच्या स्मरणातून मिळाली हे नक्की !

 

मानवाला त्याच्या मानव्याचे गुपित, धर्माचे गूढ, ईश्वराचे रहस्य, कर्मगती आणि सृष्टीचे ज्ञान व्हावे म्हणून जी उपासना करावी लागते, ती मला माझे सद्गुरू दादांकडूनच प्राप्त झाली. भेदात अभेद जाणणे, मनुष्यात ईश्वरी विभूती अनुभवणे, प्रपंचात परमार्थ साधणे, जगात देवाबरोबर राहणे आणि पशुत्वातून मनुष्यत्वात येऊन पुढे देवत्वात प्रवेशणे हे कसे होते, ते सनातन वैदिक हिंदू धर्माच्या ज्ञानाने आणि आचरणाने कळते. ही संतांची वहिवाट मला माझ्या सद्गुरूंच्याच सहवासात गवसली.

 

प्रत्येक मनुष्याला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय आप्त, मित्र, शत्रू असतात, त्याप्रमाणे राष्ट्रालाही आप्त, मित्र, शत्रू असतातच. याची शुद्ध जाणीव करून देणारे एक सद्गुरूच आहेत. असे समर्थ सगुणरूप हे साक्षात परब्रह्माचेच असते, असा दृढ विश्वास सत्शिष्याचा असतो. ही हिंदुस्थानची अतिप्राचीन सहज समृद्ध जीवनपद्धती आहे.

 

माझे गुरूदेव सांगत असत, सांसारिक कर्माने बद्ध झालेले आणि संसारदु:खाने तप्त झालेल्या जीवांना कर्म, भक्ती, ज्ञान आणि उपासना सहजपणे कल्याणकारी होते. कारण, स्वाभाविक किंवा काही निमित्ताने घडणार्‍या पापांची निवृत्ती पापवासनांचे दमन करूनच होते. कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक वा राष्ट्रीय अनुचित वर्तन किंवा असमर्थनीय विचारातून घडणारे कर्म हे पारमार्थिकदृष्ट्या पापच ठरते. याकरिता लोभ, प्रलोभन, आकर्षण, मोह या दोषांचा संपूर्णपणे सर्वेथैव सर्व स्तरावर निरास होणे गरजेचे आहे. म्हणून भक्ती देवावरील असो अथवा राष्ट्रावरील असो, ती निष्काम भावाने घडली पाहिजे. मनुष्य कोणत्याही कर्माश्रमात वागत असताना तो शिक्षक असो, राजा असो, सैनिक असो, व्यापारी वा शेतकरी असो, सेवक असो, त्या सर्वांस गुरू ज्ञानाद्वारे परमपवित्र अवस्था प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतो. या मार्गात देव-देश-धर्मावरील निष्ठा दृढ होते. मला माझ्या परमभाग्याने अशा समर्थ सद्गुरू पित्याच्याच पोटी जन्म मिळाला आणि मी शांत झालो. आता सहजच म्हणावेसे वाटते,

 

संताचिये खुणे, स्थिरावले मन ।

आणिक ते स्थान, नाही दुजे ॥

चित्ताचे भ्रमण, खंडून विकार ।

मजसी उपाय, एक गुरू ॥

सकळ तीर्थे, एक झाली जेथे ।

तेचि मज घर, गुरू तेथे ॥

नेत्री त्याचे रूप, मुखी त्याचे नाम ।

देही त्याचे गुण, एकरूपे ॥

(रघुसुतकृत गुरुपाठ)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

- प्रमोद जोशी

(लेखक स्थापत्यविशारद आहेत.)

8097502562

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat