'या' कारणासाठी चांद्रयान मोहीम थांबवली

    दिनांक  15-Jul-2019
 


श्रीहरिकोटा : भारतासह जगाचे लक्ष लागलेल्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-२' मोहिमेचे प्रक्षेपण अवघ्या ५६ मिनिटे २४ सेकंदांआधी रोखण्यात आले. तांत्रिक अडचण निदर्शनास आल्यानंतर मोहिमेला धोका उद्भवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून इस्रोच्या वैज्ञानिकांनी हा निर्णय घेतला आहे.

 

लवकरच जाहीर होणार नवी तारीख

या मोहिमेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती इस्रोचे जनसंपर्क अधिकारी गुरुप्रसाद यांनी दिली आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी 'चांद्रयान-२'चे प्रक्षेपण करण्यात येणार होते. रविवारी पहाटे ६ वाजून ५१ मिनिटांनी मोहिमेचे काउंटडाउन सुरू झाले मात्र, ५६ मिनिटांआधी लाँच व्हेइकल सिस्टिममध्ये तांत्रिक दोष उद्भवल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. यामुळे मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

अशी झाली होती तयारी

रविवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी रॉकेट 'जीएसएलव्ही'-'एमके' तृतीय यानात 'क्रायोजेनिक स्टेज'वर द्रवस्वरूपात ऑक्सिजन भरण्यात आला होता. रात्री १ वाजून ४ मिनिटांनी 'चांद्रयान-२'ला नेणाऱ्या जीएसएलव्ही रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये लिक्विड हायड्रोजन भरण्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र, २ वाजून १३ मिनिटांनी तांत्रिक कारणांमुळे काउंटडाउन थांबवण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat