
मुंबई : मुंबईत बेकायदा पार्कींग करणाऱ्यांना दि. ७ जुलै २०१९ पासून १० हजार रुपये दंड आकारण्यात येतो. पालिकेच्या पथकांनी तशी कारवाईही सुरू केली आहे. मात्र, हा नियम चक्क महापौरांनीच मोडल्याने त्याची चर्चा सोशल मीडियासह अन्य ठिकाणी होत आहे. पालिका आता महापौरांना दंड आकारणार का असा सवालही केला जात आहे.
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची कार एका मालवणी आस्वाद नावाच्या हॉटेलसमोर उभी दिसली. खुद्द महापौरांचीच कार नो पार्कींगमध्ये उभी असल्याचे समजल्यावर त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पालिका त्यांना दंड आकारणार का असा प्रश्नही विचारला जाऊ लागला. दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांनी सध्यातरी त्यांच्यावर कोणतिही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पालिका सभागृहात आता महापौरांविरोधात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून हा मुद्दा उचलून धरला जाणार असल्याची शक्यता आहे.
नागरिकांना आपली वाहने 'पार्क' करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेद्वारे विविध १४६ ठिकाणी तब्बल ३४ हजार ८०८ वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जाते. हे लक्षात घेऊन वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, याकरिता वाहनतळांलगतच्या एक किलोमीटरच्या रस्ता; तसेच दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे 'नो पार्किंग झोन' म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
याबाबत जनजागृती होण्यासाठी सूचना देणारे फलक लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींकडूनच हे नियम धाब्यावर बसवण्यात येत असतील, आणि दंड लागणार नसेल, तर सर्वांना समान न्याय आहे, का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat