संघावर टीका करण्यापलीकडे काँग्रेसकडे उरले तरी काय?

    दिनांक  15-Jul-2019   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारावर जे बिनबुडाचे आरोप केले गेले किंवा जी नाहक टीका केली गेली, ती ऐकण्याच्या स्थितीत देशातील जनता नाही. या अपप्रचाराने जनतेचे कान किटल्यानेच जनतेने काँग्रेस आणि विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.


एकेकाळी अखिल भारतीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाची अवस्था अगदी दारूण झाली आहे. काँग्रेसचे तारू लोकसभा निवडणुकीच्या खडकावर फुटल्याने त्यातील असंख्य नेते आता त्या जहाजातून दुसऱ्या जहाजावर उड्या मारू लागले आहेत. अखिल भारतीय असणारा हा पक्ष आता काही राज्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर तर या पक्षाला कोणी वाली उरला आहे का, असे वाटण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे. काही अपवाद वगळता आतापर्यंत नेहरू-गांधी घराण्यापलीकडे विचार न करणाऱ्या भारतीय काँग्रेसला आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कोणाकडे द्यावीत, याचे उत्तर अजूनपर्यंत सापडलेले नाही. राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि आपल्या परिवारातील कोणाचाही या पदासाठी विचार करू नये, असे त्यांनी बजावले असल्याने हे गणित कसे सोडवायचे, याची डोकेफोड काँग्रेस नेत्यांकडून चालू आहे. पण राहुल गांधी, सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी जी व्यक्ती मान्य असेल, तिचीच त्या पदावर वर्णी लागणार हे उघड आहे. काँग्रेसचे तारू फुटल्याने त्या पक्षाला रामराम ठोकून अनेक काँग्रेस नेते भाजपकडे वळू लागले आहेत. कर्नाटक आणि गोवा या राज्यांमधील उदाहरणे ताजी आहेत. गोव्यामध्ये काँग्रेसच्या दहा आमदारांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यातील काहीना मंत्रिपदेही देण्यात आली. कर्नाटकमधील काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या काही आमदारांनी पक्षाविरुद्ध बंड केले. मात्र, त्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांनी तांत्रिक मुद्दे पुढे करून बंडाचा हा लोंढा थोपवून धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, आज ना उद्या हा बांध फुटणार, हे स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारची तात्त्विक युती न करता केवळ सत्तेची फळे चाखण्यास मिळावीत, या हेतूने एकत्रित आलेल्या पक्षांची अवस्था अशीच होणार! कर्नाटक राज्यातील काँग्रेस - धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार जाऊन तेथे भारतीय जनता पक्षाचे सरकार कधी येते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राहुल गांधी यांचा गेल्या काही दिवसांत केवळ एककलमी कार्यक्रम होता. तो म्हणजे त्यांच्यावर विविध कारणांखाली देशाच्या काही न्यायालयांत जे अब्रूनुकसानीचे खटले दाखल करण्यात आले आहेत, त्या खटल्याच्या सुनावणीस हजेरी लावणे, आपणास गुन्हा मान्य नसल्याचे न्यायालयास सांगणे आणि जामिनावर आपली सुटका करून घेणे. त्यांनी पक्षाध्यक्ष जबाबदारी सोडली, हे किती बरे झाले. त्यांना न्यायालयांमध्ये खेटे घालण्यास वेळ तरी मिळाला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना संघ परिवारावर टीका केल्याशिवाय चैन पडत नसल्याचे सर्वविदित आहे. देशात कुठे काहीही झाले तरी संघाला जबाबदार धरायचे आणि 'साप साप' म्हणत भुई थोपटत राहायचे, ही काँग्रेसची नीती देशवासीयांना माहिती असल्याने त्याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी अहमदाबादला गेले होते. तेथील न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्यासंदर्भात त्यांची ही अहमदाबाद वारी होती. त्या खटल्याच्या सुनावणीस हजेरी लावल्यानंतर राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर केलेले भाष्य लक्षात घेता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवरचा त्यांचा राग गेला नसल्याचेच दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करण्याची परंपरा गांधी - नेहरू घराण्यात पिढीजात चालू आहे. त्यामुळे राहुल गांधी तरी त्याला कसे अपवाद असणार? सार्वजनिकरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लढण्यासाठी व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी आपल्या विरोधकांचे आभार मानले आहेत. गेली कित्येक वर्षे सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि संघापासून प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या पूर्वीच्या जनसंघावर आणि सध्याच्या भाजपवर टीका केल्यानंतर कोणती फळे चाखायला मिळतात, याचा अनुभव घेतल्यानंतरही त्यांची ही बाष्कळ बडबड चालू आहे. काँग्रेस पक्ष आणि नेहरू-गांधी घराणे संघ परिवारावर जी बिनबुडाची टीका करीत आहे, ती जनतेस अमान्य आहे. त्यातूनच आज जनतेने भाजपला निर्विवाद बहुमतांनी निवडून दिले आहे आणि एकामागून एक राज्ये काँग्रेसच्या हातातून निसटून जाऊ लागली आहेत. केवळ काँग्रेसच्या बाबतीत असे घडत आहे, असे नाही. भाजपवर टीका करणाऱ्या पक्षांच्या विश्वासार्हतेबद्दल जनतेला शंका वाटू लागल्याने जनताही त्या पक्षांना जवळ उभे करण्यास नाकारू लागली आहे.

 

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर, भाजपवर, भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर खोटे आरोप केले. त्या खोट्या आरोपांवरून त्यांच्याविरुद्ध जे खटले गुदरण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांना देशाच्या विविध भागांत धावावे लागत आहे. या निमित्ताने आपल्या विरोधकांनी आपणास चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे, असे त्यांना वाटत असेल तर अशी संधी राहुल गांधी यांना लखलाभ होवो, पण त्यामुळे त्यांचे वा त्यांच्या काँग्रेस पक्षाचे काही भले होणार नाही, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. राहुल गांधी यांची अशी एक तऱ्हा, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दुसरी तऱ्हा! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष बी. ए.च्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे. त्याविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर वातावरण पेटविण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी चालविला आहे, पण या विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी, संघाबाबतचा अभ्यासक्रम वगळण्यास ठाम नकार दिला. तसेच 2003 सालापासून विद्यापीठाच्या एम. ए.च्या अभ्यासक्रमामध्ये संघाशी संबंधित अभ्यासक्रमाचा समावेश असल्याचे, या मुद्द्यावरून टीका करणाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. देशाच्या इतिहासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोलाचे योगदान आहे. त्या योगदानाचा इतिहास भावी पिढ्यांना शिकवायचा नाही, अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्याचे आता त्यांनी विसरून जावे. देशाच्या इतिहासात, राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान भावी पिढ्यांना कळायलाच हवे. वाट्टेल ते आरोप करून संघाची आणि संघ परिवाराची बदनामी करणाऱ्यांची सत्य इतिहास कथन करून तोंडे बंद करायलाच हवीत! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारावर जे बिनबुडाचे आरोप केले गेले किंवा जी नाहक टीका केली गेली, ती ऐकण्याच्या स्थितीत देशातील जनता नाही. या अपप्रचाराने जनतेचे कान किटल्यानेच जनतेने काँग्रेस आणि विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. सदैव राष्ट्राचा विचार करणाऱ्या आणि राष्ट्रास परमवैभवाप्रत नेण्यापलीकडे अन्य कोणताही विचार न करणाऱ्या संघावर टीका करीत बसण्यापेक्षा आपल्या बुडत चाललेल्या जहाजाचे भगदाड बुजविण्याकडे राहुल गांधी यांनी लक्ष दिल्यास त्या पक्षाची गेलेली पत काही प्रमाणात सावरू शकेल. संघाच्या विशाल वटवृक्षाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजली असल्याने राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांच्या बाष्कळ बडबडीने या वटवृक्षास जराही धक्का पोहोचणार नाही!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat