विम्बल्डनची नवी 'राणी' रोमानियाच्या हालेप विजयी

    दिनांक  14-Jul-2019नवी दिल्ली : टेनिसमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विम्बल्डन २०१९ स्पर्धेमध्ये रोमानियाच्या सिमोना हालेपचा विजय झाला. तिने सेरेना विल्यम्सचा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्यांदा विम्बल्डनवर तिने स्वतःचे नाव कोरले. तिने सेरेनाचा ६-२, ६-२ असा पराभव करत ही कामगिरी केली.

 

अंतिम सामन्यात हालेपने सुरूवातीपासून आक्रमक खेळी केली. तिने पहिल्या सेटमध्ये ४-० एकतर्फी आघाडी घेतली. त्यानंतर सेरेनाने सामन्यामध्ये पुन्हा परतण्याचा प्रयत्न केला. मात्र हालेपच्या आक्रमणासमोर सेरेनाचा टिकाव लागला नाही. तिने पहिला सेट ६-२ असा फरकाने गमावला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही हालेपने आक्रमण सुरूच ठेवत एकतर्फी सामन्यात बाजी मारली. हालेपने हा सामना फक्त ५५ मिनिटात जिंकला.

 

हालेपने यापूर्वी २०१८ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. आता त्यानंतर तिने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा जिंकली. तसेच तिने सेरेनाला २४ वा ग्रॅन्डस्लॅम जिंकण्याच्या स्वप्नाला धक्का दिला आहे. सेरेना आणि सिमोनामध्ये याआधी १० सामने झाले होते. यापैकी ९ सामन्यांमध्ये सेरेनाने विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम फेरीत सेरेनाकडे संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात होते. मात्र, सिमोनाने दमदार कामगिरी करत आपल्या पहिल्या विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat