मैत्रीचे घट्ट बंध...

    दिनांक  14-Jul-2019   नुकतेच रशियातील सरकारी विद्यापीठांनी भारतीयांना शिक्षणात शिष्यवृत्ती देण्यासाठी विशेष घोषणा केली. त्यानुसार रशियातील सरकारी विद्यापीठामध्ये मेडिकल आणि इंजिनियरिंगचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील सरकारी विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.


आंतरराष्ट्रीय राजकारणात द्विराष्ट्र मैत्री किती काळ टिकेल याचे भाकीत वर्तवणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखे आहे. म्हणजेच, दोन देशात निर्माण झालेली मैत्री खूप काळपर्यंत टिकणे अवघड जरी असले तरी अशक्य नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगात रशियाने मैत्रीचा हात पकडला होता. कालपरत्वे तो सैल होण्याचीदेखील शक्यता होतीच मात्र, वर्षागणिक रशिया आणि भारत यांच्यातील मैत्री घट्ट होत गेल्याचेच आपणाला दिसून येत आहे. नुकतेच रशियातील सरकारी विद्यापीठांनी भारतीयांना शिक्षणात शिष्यवृत्ती देण्यासाठी विशेष घोषणा केली. त्यानुसार रशियातील सरकारी विद्यापीठामध्ये मेडिकल आणि इंजिनियरिंगचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथील सरकारी विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. रशियन संघराज्याच्या राष्ट्रीय दिनाच्या औचित्याने या विद्यापीठांनी ही घोषणा केली आहे.

 

भारतीय विद्यार्थ्यांचा रशियामध्ये उच्च शिक्षण घेण्याकडे नेहमीच अधिक कल असतो. त्यामुळे रशियातील आय.एम.सेचनोव्ह, मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटी, अष्ट्राखान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, साराटोव्ह स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि रशियातील युरोपियन प्रदेशामध्ये असलेल्या इतर विद्यापीठांनी यापुढे भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. दरम्यान, भारत आणि रशियात अनेक विद्यापीठे ही प्राचीन आहेत. त्यामुळे येथे प्राप्त होणारे ज्ञानदेखील गुणवत्तापूर्ण आहे. त्यामुळेच अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा रशियातील शिक्षणाकडे ओढा असल्याचेदेखील दिसून येत असते. आज भारत आणि अमेरिकेतील संबंधदेखील कमालीचे सुधारले आहेत आणि अमेरिका आणि रशियात पूर्वीपासून वितुष्ट आहे. तरीदेखील भारत आणि रशियातील मैत्री आजही केवळ टिकलीच नाही तर त्या मैत्रभावात प्रगतीदेखील होत आहे. हेच या रशियामधील सरकारी विद्यापीठांच्या घोषणेवरून दिसून येते. तसेच, काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला रशियाने संरक्षण सामग्री दिली होती. मात्र, त्यावेळीदेखील भारत आणि रशियातील संबंधात कोणताही तणाव निर्माण झाला नाही. तर, रशियाने पाकला शस्त्र देणे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील केवळ एक व्यवहार आहे, याची खात्रीदेखील भारताला होती. तर, रशियाचे चीनबरोबर आणि भारताचे अमेरिकेबरोबर संबंध अधिक दृढ करण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले असले आणि यापुढील काळातदेखील होण्याची शक्यता असली तरी, भारत आणि रशिया यांचे पूर्वीपासून असणारे संबंध आगामी काळातदेखील दृढ राहतील, असाच संदेश या शिष्यवृत्तीच्या घोषणेतून देण्यात आला असल्याचे जाणवते.

 

मुळात, ज्या पिढीने भारत आणि रशिया यांतील संबंधांची मुहूर्तमेढ रोवली, ती पिढी आज ज्येष्ठ झाली आहे. त्यामुळे आता या दोन देशांतील संबंध टिकवणे आणि त्यात सातत्याने सुधारणा करणे, ही नवीन पिढीची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे आणि तरुण विद्यार्थी हे या नव्या पिढीचे नेतृत्व करत आहेत. अशा विद्यार्थ्यांना आपल्या देशातील सरकारी विद्यापीठामार्फत शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करून रशियाने भारताप्रती आपला आदरभावच व्यक्त केला आहे, असे दिसून येते. जागतिक पटलावर दोन देशांचे इतर देशांशी संबंध कसे आहेत, यावर त्या दोन देशांचे नाते अवलंबून असते. मात्र, रशियासाठी अमेरिका आणि भारतासाठी चीन आणि पाकिस्तान हे डोकेदुखी असतानादेखील भारताने अमेरिकेच्या जवळ जाणे आणि रशियाने पाक आणि चीनच्या समीप जाणे, यामुळे भारत आणि रशिया यांच्या नात्यात काही फरक पडला, असे सध्या तरी दिसून येत नाही, हे विशेष. तसेच, रशियामध्ये संशोधन आणि विकास यासाठी अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या धोरणामुळे मिळणे सहजशक्य होणार आहे. एखाद्या देशातील सर्वच सरकारी विद्यापीठांनी दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत उपलब्ध करून देणे हे संबंध अबाधित राहण्याकरिता मोठे पाऊल आहे, असे वाटते. सामाजिक, आर्थिक, संरक्षण, सांकृतिक या क्षेत्रातील सहकार्य हे तात्कालिक असते किंवा त्यात करार केला जातो. मात्र, शिक्षणविषयक संबंधांमुळे दोन देशांतील भावी पिढ्या आणि वैचारिक आदानप्रदान यांचे एकत्रीकरण होण्यास चालना मिळते व त्याचा परिणाम अनेक वर्ष त्या दोन राष्ट्रांच्या संबंधावर होत असतो. त्यामुळेच, भारत आणि रशियातील मैत्रीचे बंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat