..म्हणून धोनीला ७व्या क्रमांकावर खेळवले : शास्त्री

    दिनांक  13-Jul-2019नवी दिल्ली : भारतीय संघ विश्वचषकामधून बाहेर पडल्यानंतर अखेर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्याबद्दल भाष्य केले. महेंद्र सिंग धोनीला ७व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयावर संपूर्ण क्रीडा विश्वात टीकेची झोड उठली होती यावर '७व्या क्रमांकावर फलंदाजीला खेळवण्याचा निर्णय हा संपूर्ण संघाचा होता.' असे स्पष्टीकरण शास्त्रींनीं दिले.

 

"धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय हा संपूर्ण संघाकडून एकमताने घेण्यात आला होता. सर्व खेळाडूंनी यावर एकमत दर्शविले होते. धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नंतर फायदा करून घ्यायचा होता. तो मॅच विनर आहे. त्याचा असा उपयोग करून घेतला नसता तर तो गुन्हाच ठरला असता." असे स्पष्टीकरण देत रवी शास्त्रीने होणाऱ्या टीकेवर उत्तर दिले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने या सर्व गोष्टींचा निर्वाळा केला. धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला यावा आणि लवकर बाद व्हावा असे तुम्हाला वाटते का?, असा सवालही शास्त्रींनी केला.

 

उपांत्य सामन्यामध्ये भारत अवघ्या १८ धावांनी पराभूत झाला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनीने ५० धावा केल्या होत्या, पण त्यानंतर एक अतिरिक्त धाव घेण्याच्या नादात तो रन आऊट झाला आणि भारताची जिंकण्याची सर्व आशा मावळल्या. त्यामुळेच सुनील गावसकर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनेही धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

 

मधल्या फळीमध्ये भारताला चांगल्या फलंदाजांची गरज असल्याचेही त्यांनी मान्य केले. मधल्या फळीमध्ये चांगले फलंदाज नसल्याची कमतरता जाणवल्याचे सांगतानाच त्याजागी चांगले फलंदाज ठेवणे ही आता भविष्यातील महत्वाची गोष्ट आहे. इथे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. के.एल. राहुल होता, पण शिखर धवन जखमी झाला होता. त्यानंतर विजय शंकरचे जखमी होणे हा संघासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे संघाची एकबाजू कमकुवत झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat