सनातन वारशाची पुनर्स्थापना की स्मशानघाटाची यात्रा?

    दिनांक  13-Jul-2019   



नरेंद्र मोदी हे या वर्तमानाचे प्रतिनिधित्व करतात. भविष्याच्या इतिहासाची पाने लेखनाचे काम तर १९२५ पासूनच म्हणजे संघ स्थापनेपासूनच सुरू झालेले आहे. या लेखनाचे काम करत करत काही पिढ्या संपल्या. आताच्या पिढ्या अविरत कष्ट करीत आहेत आणि उद्याच्या पिढ्या हे स्वप्न प्रत्यक्षात पाहण्याचे दिवस आणणार आहेत. काँग्रेसपुढचा एवढाच प्रश्न आहे की, आपल्या सनातन वारशाची पुनर्स्थापना करायची की स्मशानघाटाची यात्रा करायची? निर्णय त्यांना करायचा आहे.


वयोवृद्ध काँग्रेस पक्षातील अनिश्चितता काही संपत नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रारंभी काहीजणांना असे वाटले की, हे एक नाटक आहे. राहुल गांधी यांनी नाटक केले नाही, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, राहुल गांधी यांनी आपला निर्णय बदलला नाही. राजीनामा देऊनही आता दीड महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. या काळात नवीन पक्षाध्यक्षाची निवड झालेली नाही. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यापाठोपाठ मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि उत्तर मध्यप्रदेशचे प्रमुख नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीदेखील आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. युथ काँग्रेसचे प्रमुख केशवचंद यादव आणि अनुसूचित जाती गटाचे प्रमुख नितीन राऊत यांनीदेखील राजीनामे दिले आहेत. उत्तम रेड्डी, गिरीश चोडणकर ही आणखीन काही नावे राजीनामा देणाऱ्यांमध्ये आहेत. ज्यांनी राजीनामे दिले, ते सर्व राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या प्रमुखानेच राजीनामा दिल्यामुळे या सर्वांनी राजीनामे सादर केलेले आहेत. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी यापैकी कोणाची निवड होईल, हे सांगता येत नाही. तसेच जुन्या पिढीतील आणखी कोणाच्या गळ्यात ही पक्षाध्यक्षपदाची माळ पडेल, हे सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजे, गांधी परिवाराला जे नाव मान्य होईल, त्याचीच अध्यक्षपदावर निवड होईल. ज्याप्रमाणे मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तसा परिवाराला एकनिष्ठ माणूस शोधला जाईल. काँग्रेसने हे मान्य केलेले आहे की, नेहरु-गांधी घराण्यातील व्यक्ती अंतिम निर्णय घेण्याच्या स्थानावर असल्याशिवाय पक्ष उभा राहू शकत नाही. सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना पक्षाची दाणादाण होण्याची स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत की, भिक्षेची कटोरी आणि चादर घेऊन रस्त्याच्या कडेला आम्हाला बसावे लागेल. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. २००४ साली काँग्रेस सत्तेवरदेखील आली. नेहरू असताना सर्व सूत्रे नेहरूंच्या हाती असत आणि इंदिरा गांधी असताना इंदिरा गांधींकडे सर्व सूत्रे होती. वारसाहक्काने ती राजीव गांधीकडे आली. नेहरू-गांधी घराण्याचे नेतृत्व मान्य करुन काँग्रेस पक्ष उभा राहू शकतो असा त्याचा इतिहास आहे. प्रश्न असा आहे की, काँग्रेसला या नेतृत्वामुळे जनमान्यता मिळेल का? ती मिळायची असती, तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला घवघवीत यश मिळायला हवे होते. २०१४ साली जी स्थिती काँग्रेसची झाली, तीच स्थिती आताही झालेली आहे. २०१४ साली राहुल गांधींचेच नेतृत्व होते आणि आताही राहुल गांधींनीच नेतृत्व केले.

 

एक काळ असा होता की, गांधी घराण्याशी निष्ठा असणारा बांधील मतदार सर्व भारतात होता. स्वातंत्र्य आंदोलनातील पिढी, त्यानंतर आलेली दुसरी पिढी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिली. आता आलेल्या तिसऱ्या-चौथ्या पिढीची ती अवस्था नाही. स्वातंत्र्य आंदोलनाचा विषय आता संपलेला आहे. आताचा विषय 'स्वतंत्र भारतात माझे स्थान कोेणते? मी कोठे आहे? माझ्या आशा, आकांक्षा, प्रगती कोणामुळे होणार आहे?' याचा विचार नवमतदार करतो. तो व्यक्तिगत स्तरावरदेखील करतो आणि समूहरूपानेदेखील करतो. या आकांक्षांना ओळखून त्याप्रमाणे राजकीय भाषाशैली विकसित करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. राहुल गांधी याबाबतीत अयशस्वी झालेले आहेत. केवळ गांधी घराण्याच्या नावलौकिकावर मतपेट्या भरण्याचे दिवस आता संपलेले आहेत. आताची पिढी आणि येणारी पिढी यांच्या भावभावनांशी ज्याची नाळ जुळेल, तो दिल्लीत सत्ताधीश होईल. नवीन पिढीच्या भावभावनांमध्ये 'राष्ट्रवाद' हा एक अतिशय महत्त्वाचा विषय पुढे आलेला आहे. काँग्रेसने 'राष्ट्रवाद' या विषयावर १९४७ सालापासून अत्यंत चुकीची भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रवादाचा मुख्य विषय असतो, राष्ट्राची संस्कृती. ही संस्कृती सर्व लोकांना जोडून ठेवते. भारतीय संस्कृतीची व्याख्या करणे महाकठीण काम आहे. एकाच वेळेला ती धार्मिक आहे, त्याच वेळी ती प्रादेशिकदेखील आहे, तशीच ती जातीपातीचे बंध कमी-अधिक प्रमाणात धरून ठेवणारी आहे. स्त्रीचा सन्मान करणारी आहे, त्याचवेळी स्त्रीला अनेक गोष्टी नाकारणारीही आहे. परक्या माणसाला भारत अतिशय गोंधळाचा देश वाटतो, तो यासाठी. काँग्रेसने विशेषत: नेहरू यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या पिढीने 'असली' भारत काय आहे, कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यांनी भारताला 'सेक्युलर' करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा व्यवहारातला अर्थ असा केला की, जे जे 'हिंदू' असेल, ते ते 'निंदू.' हिंदुत्वाची भाषा करील त्याला पायदळी तुडवू, त्याला अस्पृश्य करून टाकू, असे झाले म्हणजे 'सेक्युलॅरिझम' आला, ही काँग्रेसची विचारसरणी झाली. नेहरूंसकट सगळे महाविद्वान असल्यामुळे आपण आपल्या हाताने तिरडी बांधत आहोत, हे या लोकांच्या कधी लक्षात आले नाही. त्यांच्या हे लक्षात आले नाही की, हिंदू म्हणजेच सर्व पंथांचा आदर, हिंदू म्हणजेच सर्वसमावेशकता, हिंदू म्हणजे मानवधर्म, हिंदू म्हणजे चराचर सृष्टीचा विचार, त्याला संकुचित ठरवणे, त्याला दहशतवादी ठरवणे, पाप आहे. पापाची फळे भोगावी लागतात. बहुतेक फळे याच जन्मात भोगावी लागतात. ही पापाची फळे भोगण्याचा कालखंड आताच्या काँग्रेसच्या नशिबी आलेला आहे.

 

स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस अशी नव्हती. गांधी स्वत: 'कर्मठ हिंदू' होते. "हिंदू धर्माएवढा श्रेष्ठ धर्म अन्य कुठला नाही, सर्व धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची समानता असली तरी मला हिंदू धर्मच प्रिय आहे," असे गांधींजी म्हणत. भगवद्गीता माझी माता आहे आणि जेव्हा केव्हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण होतात, तेव्हा मी माझ्या आईला (गीतेला) शरण जातो. ती मला माझ्या प्रश्नांची उत्तरे देते. हिंदू धर्म आज थकलेला दिसतो. परिवर्तन करण्यास तो कमी पडतो, असे जरी असले तरी ही त्याची अवस्था कायम राहणार नाही. त्याचा थकवा दूर झाल्यानंतर तो पूर्वी कधी जेवढ्या तेजाने प्रकटला नसेल तेवढ्या तेजाने प्रकट होईल. लोकमान्य टिळकांच्या हिंदुपणाबद्दल शंका घेण्यास तसूभरदेखील जागा नाही. याच मालिकेत डॉ. राजेंद्रप्रसाद, चक्रवर्ती राजगोपालचारी यांचीदेखील गणना करावी लागते. काँग्रेसला पुनरुज्जीवित करायचे असेल, तर काँग्रेसला आपल्या मुळाकडे जावे लागेल. लोकमान्य टिळकांना शरण जावे लागेल, गांधीजींना शरण जावे लागेल, लाला लजपतराय यांना शरण जावे लागेल. त्यांनी कोणत्या मूलभूत तत्वांवर आणि विचारांवर काँग्रेसची उभारणी केली, हे समजून घ्यावे लागेल. काँग्रेसला बीजाचा शोध घ्यावा लागेल आणि त्याची जोपासना करावी लागेल. म्हणून आज काँग्रेसला नेहरू-गांधींची गरज नसून 'महात्मा गांधी'ची गरज आहे. आज काँग्रेसला नेहरू-गांधींची गरज नसून टिळक-गांधींची गरज आहे. पराभवानंतर सल्ला देणाऱ्या लोकांच्या सल्ल्यांचा पाऊस पडू लागलेला आहे. हा आमचा काँग्रेसला सल्ला नाही. काँग्रेसला सल्ला देणारे आम्ही कोण? काँग्रेसला सल्ला देणारे सांगतात की, सौम्य हिंदुत्वाने काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणार नाही. काँग्रेसचे पुनरुज्जीवन उदारमतवादी लोकशाहीने होईल. अल्पसंख्य म्हणजे मुसलमान यांना काँग्रेस आश्रयदाती वाटली पाहिजे, दलितांना न्याय देणारी वाटली पाहिजे, उदारमतवाद्यांना उदार मते मांडू देणारी वाटली पाहिजे, हा त्यांचा सल्ला आहे. सगळे 'गांधी' हा सल्ला देताना दिसतात. हे सल्ले जर काँग्रेसने अंमलात आणले, तर आणखी दहा-पंधरा वर्षांनंतर राजघाटावर एक नवीन समाधी बांधावी लागेल आणि त्याखाली लिहावे लागेल. '१४० वर्षांची काँग्रेस येथे चिरनिद्रा घेत आहे.'

 

भारत बदलत चालला आहे. १९४७ चा भारत इतिहासजमा झालेला आहे. २०१९चा भारत हा वर्तमानाततील भारत आहे. आणि हा वर्तमानातील भारत भविष्याची पाने लिहीत चालला आहे. ही पाने ज्याला वाचता येतील, तो भारतावर राज्य करील. त्यातील पहिले पान प्रखर राष्ट्रवादाचे आहे. मी भारतीय आहे आणि मला भारतातच काय जगातही छाती पुढे काढून आणि ताठ मानेने चालता आले पाहिजे. जे अपमान माझ्या पूर्वजांनी भोगले, ते मी भोगणार नाही. हा राष्ट्रवादाचा पहिला हुंकार आहे. दुसरे पान आहे, समृद्ध भारताचे. भारतातील प्रत्येकाला राहण्यास योग्य घर मिळाले पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला आणि बुद्धीला काम मिळाले पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या पराक्रमाने प्राप्त करायच्या आहेत. भिकेची झोळी नको. तिसरे पान आहे, आम्ही प्रथम भारतीय आहोत मग इतर उपासना पंथांचे, मग अन्य कुठल्या जातीचे. ही भावना आता प्रबळ होत चाललेली आहे. हे पान 'हिंदू' आणि 'मुसलमान' हा उपासना भेद फार वेगाने कमी करत जाईल आणि एकराष्ट्रीयत्त्वाची भावना त्यातून परस्पर बंधुत्त्वाची भावना निर्माण करीत जाईल. हा प्रवाह तथाकथित उदारमतवादी, सांप्रदायी आणि शेकडो 'नेहरु-गांधी' रोखू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी हे या वर्तमानाचे प्रतिनिधित्व करतात. भविष्याच्या इतिहासाची पाने लेखनाचे काम तर १९२५ पासूनच म्हणजे संघ स्थापनेपासूनच सुरू झालेले आहे. या लेखनाचे काम करत करत काही पिढ्या संपल्या. आताच्या पिढ्या अविरत कष्ट करीत आहेत आणि उद्याच्या पिढ्या हे स्वप्न प्रत्यक्षात पाहण्याचे दिवस आणणार आहेत. काँग्रेसपुढचा एवढाच प्रश्न आहे की, आपल्या सनातन वारशाची पुनर्स्थापना करायची की स्मशानघाटाची यात्रा करायची? निर्णय त्यांना करायचा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat