राज्यात लागणार साडेतीन लाख 'आठवणींची झाडे'

    दिनांक  12-Jul-2019मुंबई : वन विभागाने 'रानमळा वृक्षलागवड पॅटर्न' राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅटर्नअंतर्गत महाराष्ट्रात यंदा ३ लाख ४८ हजार ८८७ 'आठवणींची झाडे' लावली जाणार आहेत. मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्याचा यामागील उद्देश असलयाचे विभागामार्गात सांगण्यात आले. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा रोपांची लागवड होणार आहे.

 

काय आहे 'रानमळा वृक्षलागवड पॅटर्न'

 

जन्म, मृत्यू, विवाह, वाढदिवस, परीक्षेतील यश, नोकरीचा पहिला दिवस, सासरी जाणाऱ्या लेकीची आठवण, दुर्दैवाने घरातील जिवलगाचा झालेला मृत्यू अशा विविध सुख-दु:खाच्या प्रसंगाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील रानमळा या गावात वृक्ष लावले जातात. गावात वर्षभर घडणाऱ्या अशा घटनांची माहिती घेऊन संबंधितांना ५ जूनला जागतिक पर्यावरणदिनी वृक्षदिंडी काढून ग्रामपंचायतीमार्फत रोपांचे वाटप केले जाते. या उपक्रमातून आज रानमळा हे गाव हिरवेगार झाले आहे. ग्रामविकास आणि नगरविकास विभागामार्फत हा उपक्रम राबवला जातो.

 

वृक्षलागवडीतून स्मृतिगंध अधिक गहिरा- सुधीर मुनगंटीवार

 

आठवणीची रोपटी जेव्हा वृक्ष होऊन डोलतात तेव्हा हा स्मृतिगंध अधिकच गहिरा होत जातो, आयुष्यभर दरवळत राहतो. यातून हरित आणि समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल सोपी आणि वेगवान होण्यास मदत होते हीच भावना लक्षात घेऊन वन विभागाने "वृक्षाची उपासना हीच निसर्गाची उपासना" हा उपक्रम राबविला असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat