३३ कोटी वृक्षारोपणाला कांदळवनांची साथ ; ४० लाख कांदळवनांचे रोपण

    दिनांक  12-Jul-2019   


 'कांदळवन संरक्षण विभागा'चा पुढाकार

 

मुंबई ( अक्षय मांडवकर) : वन विभागाच्या ३३ कोटी वृक्षारोपणाच्या उद्दिष्टाला कांदळवनांच्या लागवडीची साथ मिळाली आहे. राज्याच्या 'कांदळवन संरक्षण विभागा'ने ( मॅंग्रोव्ह सेल) या उद्दिष्टाअंतर्गत ४० लाख कांदळवनांच्या रोपणाला सुरुवात केली आहे. किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये या कामाला सुरुवात झाली असून १,१०४ हेक्टर क्षेत्रावर कांदळवनांची लागवड करण्यात येईल.

 

 
 
 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१६ पासून 'हरित महाराष्ट्र अभियान' सुरू केले. त्याअंतर्गत २०१६ मध्ये २ कोटी, २०१७ मध्ये ४ कोटी व २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. राज्यासमोर ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून उर्वरित ३३ कोटी वृक्षांची लागवड करणे अजूनही शिल्लक आहे. त्यासाठी १ जुलै पासून ३३ कोटी वृक्षारोपणाचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. वन विभागाचा ३० सप्टेंबर पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस आहे. आता या वृक्षारोपणाअंतर्गत कांदळवनांच्या लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 'कांदळवन संरक्षण विभागा'च्या पुढाकाराने किनारी क्षेत्रात कांदळवनांचे रोपण होत आहे. ३३ कोटी वृक्षारोपणाचे ध्येय पूर्ण करण्याच्या उद्देशाने पालघर, डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कांदळवनांची लागवड होत असल्याची माहिती 'कांदळवन संरक्षण विभागा'चे मुख्य वनसंरक्षक एन.वासुदेवन यांनी दिली. तर किनारपट्टीलगतच्या १,१०४ हेेक्टर क्षेत्रावर कांदळवनांची लागवड होणार असल्याचे उपवनसंरक्षक निनू सोमराज यांनी सांगितले. याअंतर्गत आजवर कांदळवनांची ३.५ लाख रोपं लावल्याचे त्या म्हणाल्या. ही रोपं वन विभागाच्या अखत्यारीतील जागेत लावण्यात आली असून महसूल विभागाच्या जागेतही ती लावण्यात येणार आहेत.

 
 
 
 

कांदळवन कक्षाकडून मुंबईत ९ लाख, डहाणूमध्ये १३.५१ लाख, ठाण्यात ३ लाख, अलिबागमध्ये ५ लाख, रोह्यामध्ये १० लाख आणि रत्नागिरीत १.९ लाख कांदळवनांची रोपं लावण्यात येत असल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या सह-संचालिका (प्रकल्प) डाॅ. शितल पाचपांडे यांनी दिली. विभागानुरुप लागवडीच्या उद्दिष्टाप्रमाणे रोपवाटिकांमध्ये कांदळवनांची रोपं तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या रोपवाटिका किनारपट्टीभागातील कांदळवन क्षेत्रांमध्येच तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन, तेथील गाळयुक्त मातीचा उपयोग करुन रोपं तयार केली जातील. तसेच लावलेल्या रोपांची वाढ व्यवस्थित होण्याकरिता त्यामध्ये किमान दीड मीटरचे अंतर राहिल, याची काळजी घेण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, लागवड करण्यासाठी निवडलेल्या क्षेत्रांची त्या ठिकाणी अस्तिवात असणाऱ्या कांदळवनांच्या प्रजातींच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. त्यानंतरच निवडलेल्या क्षेत्रावर तेथील प्रजातींच्या प्रमाणानुसार त्या-त्या प्रजातींची रोपं लावण्यात येत आहेत. तसेच या प्रमाणानुसार रोपवाटिकांमध्येही रोपं तयार करत असल्याचे पाचपांडे म्हणाल्या. कांदळवनांच्या या लागवडीमध्ये प्रामुख्याने तिवर (ग्रे मॅंग्रोव्ह), किर्पा, झुंबर, सोनचिप्पी या प्रजातींचा समावेश आहे.


वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat