संकल्पपूर्ती : व्यापाऱ्यांसाठी मोदी सरकारतर्फे कल्याणकारी मंडळाची स्थापना

    दिनांक  12-Jul-2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपने आपल्या घोषणापत्रात म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय व्यापारी कल्याणकारी मंडळाची घोषणा केली आहे. भाजपच्या संकल्पपत्रात उल्लेख केल्यानुसार, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. त्यानुसार, केंद्रात मोदी २.० सरकार स्थापन झाल्यापासून केवळ ५० दिवसांत ही घोषणा करण्यात आली आहे, अशी माहीती केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

 

देशभरातील व्यापारी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, व्यापार सुलभतेच्या दृष्टीकोनातून पावले उचलणे, व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने योजना आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे या मंडळाचे काम असेल. व्यापार सुलभतेच्या दृष्टीकोनातून नव्याने व्यापार करू इच्छिणारे आणि देशातील व्यापारी वर्गाला व्यापारातील कायदेप्रक्रीया सुलभ करण्यावर केंद्राचा भर असणार आहे. व्यापारी आणि सरकार यांच्यातील दुवा बनण्याचे काम या मंडळामार्फत केले जाणार आहे.

 

भाजपने निवडणूकांच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना, व्यापाऱ्यांसाठी ५० लाखांपर्यंतचे विनातारण कर्ज आदी प्रस्ताव यात अंतर्भूत केले होते. त्यावेळी कॉंग्रेसतर्फे याला 'हनी ट्रॅप' असल्याची टीका करण्यात आली होती. मात्र, आता आम्ही ५० दिवसांतच ही संकल्प पूर्ण केल्याचेही भाजपतर्फे सांगण्यात आले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat