'माझा महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ दे', मुख्यमंत्र्यांचे विठुरायाकडे साकडे

    दिनांक  12-Jul-2019


 


पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. मध्यरात्री २ वाजून २५ मिनिटांनी सुरू झालेली पूजा सुमारे दीड तास चालली. परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेचा मान यावर्षी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी सुनेवाडी तांडा गावातील वारकरी दाम्पत्य विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण यांना मिळाला. जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे यावेळी मुख्यंमत्री फडणवीस यांनी विठ्ठलाकडे घातले.

 

अनेक कामे झाली, अनेक करायची आहेत. प्रत्येक घर, अवघा महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा आणि शेती अधिक सुजलाम् सुफलाम् व्हावी, हेच आपले पुढच्या ५ वर्षांचे ध्येय असेल. हाच आशीर्वाद आपण विठुरायाकडे मागतो आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी पूजेनंतर बोलताना सांगितले. वारीने महाराष्ट्रधर्म जिवंत ठेवला, आपली संस्कृती टिकवून ठेवली. वारी हा सकारात्मक शक्तीचा आविष्कार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांचे कौतुक केले. वारकऱ्यांसाठी अनेक नव्या सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांनी मंदिर समितीने आभार मानले.

 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या वारी नारीशक्तीचीया उपक्रमाचे समारोप करताना मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगाचे अभिनंदन केले. निर्मल वारी, पर्यावरण वारी, नारीशक्ती असे अनेक उपक्रम यावर्षी राबविले गेले असून वारीच्या सकारात्मक शक्तीचा वापर आता हरित महाराष्ट्रासाठी व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, महापूजेनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तसेच मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शेतकरी व वारकरी संप्रदायाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat