काळाच्या पुढे धावणारा ‘तेजस’

    दिनांक  12-Jul-2019   

 

 
 
वडिलोपार्जित व्यवसायाला स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवणाऱ्या तेजस गोयंका यांनी आपल्या कर्तृत्व व बुद्धिमत्तेच्या जोरावर तरुणाईपुढे एक वेगळा विचार करण्याचा आदर्श ठेवला आहे.
 

अकाऊंट्स सांभाळण्यासाठी जगभरातील एकूण १४० देशांमध्ये वापरले जाणारे ‘टॅली’ हे सॉफ्टवेअर जगभरातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक सॉफ्टवेअर्सपैकी एक. ‘टॅली सोल्युशन्स’ला यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचे श्रेय जाते ते कायम तंत्रज्ञानाच्या चार पावलं पुढे विचार करणाऱ्या तेजस गोयंका यांना... केवळ किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या या सॉफ्टवेअरचे आता बहुतांश उद्योजक, एमएसएमई आणि स्टार्टअप्स ग्राहक आहेत. भारत गोयंका आणि श्याम सुंदर यांनी निर्मिती केलेल्या या सॉफ्टवेअर प्रणालीला आजच्या स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाच्या जगात टिकवून ठेवण्याचे काम तेजस यांनी केले आहे.

 

मूळ राजस्थानातील चुरू गावातील गोयंका दाम्पत्य कालांतराने कोलकात्याला स्थायिक झाले. १९६९ मध्ये गोयंका दाम्पत्याने शिवणकामासाठी लागणाऱ्या ‘बॉबिन्स’चा व्यवसाय सुरू केला. मुलानेही यात रमावे, धंदा शिकून घ्यावा, अशी घरच्यांची इच्छा होती. मात्र, तेजस यांचे वडील भारत गोयंका यांचा ओढा बदलत्या तंत्रज्ञानाकडे जास्त होता. त्यांना संगणकाच्या क्षेत्रातील संधी खुणावत होत्या. त्या काळी वडिलांनी भारत यांना ‘कॅसिओ पीबी १००’ हे गणक यंत्र भेट म्हणून दिले होते. त्यावेळी शाळा सुटल्यानंतर भारत कारखान्यात जात असत. त्या काळी हाताने लिहून हिशेब ठेवण्याच्या पद्धतीवर त्यांनी उपाय शोधला. वडिलांनी खूश होऊन त्यांना एक संगणक भेट दिला. त्यानंतर सुरू झाला एका उद्योगाचा प्रवास. दररोजच्या व्यवहारांचा ताळमेळ, हिशेब ठेवणारे एक सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केले. यामध्ये ‘प्रीट्रॉनिक्स फायनान्शिअल असेट’ या सॉफ्टवेअरद्वारे १९८६ मध्ये ‘प्रीट्रॉनिक्स’ या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर कालांतराने त्याचे रूपांतर नव्वदच्या दशकात ‘टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये झाले. आज तब्बल १४० देशात ‘टॅली’चे वापरकर्ते आहेत आणि हेच त्यांच्या यशाचे द्योतक म्हणावे लागेल.

 
या प्रवासात एका संकुचित राहिलेल्या व्यवसायाला मूर्त स्वरूप देण्याचे काम भारत यांचे सुपुत्र आणि ‘टॅली’चे कार्यकारी संचालक तेजस गोयंका यांनी केले. बाजारातील अटीतटीच्या स्पर्धेतटिकून राहायचे असेल, तर दररोज झपाट्याने बदलण्याचे आव्हान तुम्हाला स्वीकारता यायला हवे, याच तत्वानीशी तेजस यांची वाटचाल सुरु आहे. एकेकाळी केवळ अकाऊंट्स सांभाळण्यासाठी वापरले जाणारे हे सॉफ्टवेअर आता प्रत्येक उद्योजकासाठी ‘आवश्यक’ ठरले आहे. अशाप्रकारे केवळ भारतातच नाही, तर जगभरातील 140 देशांपर्यंत आपला व्यावसायिक पसारा वाढवण्यात ‘टॅली’ यशस्वी झाले आहे. वडिलांच्या व्यवसायात रूजू होण्यापूर्वी तेजस यांनी २०११ मध्ये पेन्सिलवेनिया विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या २८ व्या वर्षी ‘टॅली’मध्ये कार्यरत झाल्यानंतर सॉफ्टवेअर अधिक सुलभ करण्यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर सॉफ्टवेअरचा वेग, अचूक अहवाल, माहितीची सहज-सोपी मांडणी करून सॉफ्टवेअरचा ग्राहकवर्ग वाढवण्यावर त्यांनी भर दिला. व्यवसायाप्रमाणेच आपल्या वैयक्तिक आयुष्यातही तेजस यांनी काही गोष्टी अंगीकारल्या आहेत. ‘तंत्रज्ञानाच्या पुढे काय?’ याच्याच शोधात ते नेहमी गुंग असतात. डिजिटल युगातील भविष्यातील आव्हाने ओळखून त्यांनी या क्षेत्रातील बदल स्वीकारत अनेक वर्षे बाजारातील आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे. काळाच्या चार पावलं पुढे चालून आपल्या ग्राहकवर्गाला योग्य ते उत्पादन-सेवा देण्यासाठी तेजस गोयंका आग्रही असतात.
 

भारतात ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर अनेकांना ही करपद्धती समजणे कठीण जात होते. मात्र, ‘टॅली’च्या मदतीने जीएसटी भरणाही आता शक्य आहे. टीडीएस रिटर्न, शेअर बाजारातील व्यवहारांचा लेखाजोखा, कर्मचार्यांचे पगार आणि अशा कित्येक गोष्टी एक सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांनाही त्याचा वापर सुलभ होत गेला. भारतातील डिजिटल क्रांतीनंतर आज प्रत्येक व्यावसायिकाला उद्योगजगतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे ग्राहकांना केवळ सेवा न देता सुशिक्षित करण्यावरही तेजस यांनी आवर्जून लक्ष केंद्रीत केले आणि म्हणूनच जगभरातील तब्बल दोन कोटी ग्राहकांना यशस्वीपणे आपली सेवा देणे त्यांना शक्य झाले.

 
प्रचंड आशादायी असणारा हा उद्योजक भारतातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांबद्दलही तितकाच सकारात्मक आहे. देशातील उद्योगांना नवतंत्रज्ञानाशिवाय पऱ्याय नाही, असे ठाम मत ते वारंवार व्यक्त करत असतात. स्टार्टअप्स असो अथवा लघु उद्योग, भारतासारख्या देशात वेळोवेळी तीव्र स्पर्धा सुरू असते. त्यावर मात करून आपले स्थान अबाधित ठेवण्याची वृत्ती त्यांनी जोपासली आहे. जगभरातील समाधानी ग्राहक हीच तेजस यांच्यासाठी त्यांच्या यशाची पोचपावती आहे. त्यामुळे व्यवसाय जरी वडिलोपार्जित असला, तरीही तो स्पर्धेच्या युगात कसा टिकवावा, याचे उदाहरण म्हणजे तेजस गोयंका!
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat