धर्मापलीकडील योग...

    दिनांक  12-Jul-2019   


 


आपल्या धर्माचा मान राखत, योगशास्त्राचा अभ्यास करून आपल्या धर्मातील महिलांना योग प्रशिक्षण देत त्यांचे आरोग्य सुधारण्याचे कार्य डॉ. तस्मिना शेख या नाशिकमध्ये करत आहेत. त्यांच्याशी दै.‘मुंबई तरूण भारत’ने याबाबत साधलेला खास संवाद...

 

आपण करत असलेला योग ही नेमकी कशाप्रकारची उपचार पद्धती आहे ? योग म्हणजे जोडणी. योगद्वारे शरीर आणि मन यांची जोडणी होते. त्यामुळे योग ही शारीरिक आणि मानसिक उपचार पद्धती आहे. शरीर आणि मन यांचा योग साधण्याची कला ही फक्त योगमध्येच आहे. तसेच संधिवातासारख्या आजाराला योग आणि निसर्गोपचार याशिवाय पर्याय नाही.

 

आपण या क्षेत्राकडे नेमक्या कशा वळलात?

याची प्रमुख दोन कारणे आहेत. एक म्हणजे माझा झालेला अपघात आणि माझे अनेक नातेवाईक हे मधुमेह आणि स्थूलता, गुडघेदुखी या आजाराने त्रस्त होते. तेव्हा आमच्या एका नातेवाईकाला डॉक्टरांनी गुडघ्याच्या वाट्या बदलण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेलादेखील पर्याय असू शकतो, असे माझे मत आहे. त्यावेळी डॉक्टरांनी काही व्यायाम सुचविले होते. ते पाहून मी योगशास्त्रातील वेगवेगळ्या आसनांचा सखोल अभ्यास केला व त्यांचा आजार या आसनांनीच बरा केला. तसेच, माझा अपघात २०१४ मध्ये झाला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी मी योग उपचार पद्धतीकडे वळले. पूर्वी वैद्यकीय सेवेत पारंपरिक उपचार पद्धती वापरली जात असे. मात्र, त्यानंतर या उपचार पद्धतीत बदल होत गेले. मात्र, आज डॉक्टरांनी या व्यवसायाचे रूप बदलून टाकले आहे. अनेक रुग्णांची लूट होत असते. तसेच गरजेपेक्षा जास्त उपचार केले जातात, हे मला स्वानुभवातून जाणवले. म्हणून व्यायामाधारित आणि शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचे जतन करणार्‍या योगशास्त्राकडे मी आकर्षिले गेले.

 

योगशास्त्राचे प्रशिक्षण आपण कुठे घेतले?

नाशिकमध्ये योग विद्याधाम या संस्थेत आणि भारतीय योग संस्थेच्या इंदिरानगर शाखेत मी शिक्षण घेतले. माझे मूळ शिक्षण तसे कॉमर्स आणि टॅक्सेशनमध्ये आहे. टॅक्सेशनमध्ये मी डिप्लोमा आणि कॉम्प्युटर्सदेखील केले आहे. मात्र, योगामध्ये रुची असल्याने मी मास्टर इन योग, मास्टर इन यौगिक सायन्सचे शिक्षण कवी कालिदास विद्यापीठातून प्राप्त केले आहे. तसेच नैसर्गिक उपचार पद्धतीचा डिप्लोमा आणि डिग्रीदेखील मी प्राप्त केली आहे.

 

योगशास्त्राद्वारे करण्यात येणार्‍या उपचार पद्धतीचा फायदा नेमका काय होतो आणि कोणाला होतो?

बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना या उपचार पद्धतीचा फायदा होतो. योग हा प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे, शरीर आणि मन यांची जोडणी होते. इतर उपचारपद्धतीत ध्यानधारणा होत नाही, मात्र, योगासनांमुळे तणाव दूर होतो. एकाग्रता वाढते, त्यामुळे माणूस आपले कोणतेही काम उत्तमरित्या करू शकतो. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधी आणि मानसिक त्रास यांचे निर्मूलन होते आणि हे बरे झाले की, आजारच दूर होतात. असे योगशास्त्राचे बरेच फायदे आहेत.

 

मुस्लीम धर्मात योगशास्त्राला स्थान नाही, मग आपण योग आधारित उपचारपद्धती कशी उपयोगात आणता ?

इस्लाममध्ये एकच परमात्मा मानला जातो. इस्लाममध्ये सूर्यनमस्कारऐवजी फिटनेसच्या १२ स्टेप्स दिल्या आहेत आणि ओंकारच्याऐवजी ‘अलिफ लांम मीम’ हे, निराकार शब्द दिले आहेत. मी त्यांचाच आधार घेतला. तसेच, मी प्रार्थनेच्या गायत्री मंत्राऐवजी ‘सुरे फाती’ चे उच्चारण करते. अशाप्रकारे मी मुस्लीम महिलांकडून योगा करवून घेते.

 

आपल्याला यासाठी विरोधाचा सामना करावा लागला का?

मुस्लीम समाजात पडदा पद्धत आहे. बाहेरच्या पुरुषांनी महिलांना पाहू नये म्हणून मला हॉल घ्यावा लागला. समाजातही काही व्यक्तींनी विरोध केल्यानंतर मी त्यांना नेमकी या उपचाराची गरज का आहे, ते सांगितले. तसेच यात पवित्र कुराणाच्या आधारे कसे बदल केले, ज्यामुळे आपल्या महिलांची प्रकृती उत्तम राहील आणि धर्माचादेखील अनादर होणार नाही, अशी पद्धती मी त्यांच्यासमोर शांतपणे नमूद केली व त्यांना ती पटली. आज गेली 8 वर्ष सुमारे 600 पेक्षा जास्त रुग्णांवर मी उपचार करत आहे. मुस्लीम महिलांना योग साधना देत आहे.

 

आपल्या समाजातून आपणास कसा प्रतिसाद मिळत आहे? 

सुरुवातीचे तीन-चार महिने त्रास झाला. मात्र, महिलांना रिझल्ट मिळाले, तेव्हा महिला येऊ लागल्या. त्यांना आरोग्यदायी जीवन प्राप्त होऊ लागले. महिलांचा प्रतिसाद पाहता यातून त्यांनी रोजगार प्राप्त करावा, असे वाटू लागले, म्हणून मी इंदिरानगर, साईनाथ नगर, वडाळा गाव येथे बचतगट निर्माण केले. यात सर्वधर्मीय आहेत. मात्र, मुस्लीम महिला जास्त आहेत. यामुळे या महिलांना रोजगार मिळाला. यामुळे आता समाजाचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

 

आपला योगशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?

योगाच्या माध्यमातून या जगात शांती निर्माण झाली पाहिजे. योग हा मनोमिलनाचा मुख्य स्रोत आहे. जेव्हा आपण योगासन, ध्यान करतो, तेव्हा आपल्याला मानसिक शांती प्राप्त होते. आपली कार्यक्षमता वाढते, विचारशक्ती वाढते, निसर्गाशी संयोग होण्यास मदत होते. रोज एक तास योग केला तर नातेसंबंधदेखील सुदृढ राहतात.

 

आपल्या कुटुंबीयांचे आपण करत असलेल्या कार्याबाबत काय मत आहे? 

योगाभ्यासामुळे माझ्या घरातील सदस्यांनादेखील फायदा झाला. मी करत असलेल्या कामात त्यांना आनंदच वाटतो आणि त्यांचा कायमच पाठिंबा मला मिळत असतो. माझे पती आयमोद्दीन शेख यांचीदेखील मोलाची साथ मला याकामी लाभत आहे.

 

भविष्यात आपल्या योजना काय आहेत?

भविष्यात योगशास्त्राचा विस्तार ग्रामीण भागात आम्ही करणार आहोत. आज केवळ शहरी भागाला योग परिचित आहे. ग्रामीण भागातील लोकांची मनशक्ती आणि विचारशक्ती वृद्धिंगत करणे, तेथे योगशिक्षक तयार करणे, हे आमचे नियोजन आहे.

 

ॅलोपॅथीच्या युगात नैसर्गिक उपचार पद्धतीचे महत्त्व टिकू शकते काय?

सगळ्या उपचार पद्धती या काळाची गरज आहेत व आजच्या रासायनिक आहारात नैसर्गिक उपचाराची गरज आहे. आज अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टरदेखील नैसर्गिक उपचाराचा सल्ला देतात. त्यामुळे प्रत्येक उपचारपद्धती ही एकमेकांशी संलग्न आहे.

 

योगशास्त्राने आपणास जीवनात काय शिकविले?

योगशास्त्राने सुखी जीवनाचा मंत्र दिला, दिनचर्या सुधारली, जीवनात शिस्त निर्माण झाली, योगशिक्षक म्हणून मान मिळाला आणि योग शिकणार्‍याच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून समाधान मिळाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat