अयोध्या प्रकरणाची सुनावणी २५ जुलैपासून !

    दिनांक  11-Jul-2019नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाची ताबोडतोब सुनावणी करावी या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी अयोध्या प्रकरणाची सुनावणी येत्या २५ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली. तसेच मध्यस्थ समितीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ समितीला आपला अहवाल २५ जुलैच्या आत सादर करण्याचे आदेश दिले.

 

अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ समिती नेमली होती. समितीमध्ये श्री श्री रविशंकर, न्या. खलीफुल्ला आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा सामावेश आहे. "मध्यस्थ समितीकडून अयोध्या प्रकरणावर काहीही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा", अशी बाजू ज्येष्ठ वकील के. परासरन यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली.

 

"या प्रकरणावर आम्ही मध्यस्थ समिती नेमली आहे. आम्ही या समितीच्या अंतिम अहवालाची वाट पाहत आहोत. त्यांना त्यांचा अहवाल सादर करू द्या. यानंतर मध्यस्थ समिती बाबत निर्णय घेतला जाईल. मध्यस्थ समिती तोडगा काढण्यास असमर्थ ठरल्यास येत्या २५ जुलैपासून अयोध्या प्रकरणावर सुनावणी केली जाईल", असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat