मुंबई कॉंग्रेसचे काय होणार? : कार्यकर्ते बुचकळ्यात

    दिनांक  11-Jul-2019
मुंबई : मुंबई कॉंग्रेसचे आता नेमके काय होणार, अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, भाजप-शिवसेनेच्या झंझावातापुढे मुंबई कॉंग्रेस कशी तग धरणार अशा अनेक प्रश्नांमुळे मुंबईतील कॉंग्रेस कार्यकर्ते सध्या चिंतेत आहेत. अवघ्या तीन महिन्यापूर्वी अध्यक्ष झालेल्या मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सध्या मुंबई कॉंग्रेस निर्नायकी अवस्थेत आहे.

 

लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर कॉंग्रेसचे 'पानिपत' झाल्यामुळे कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचेच पडसाद देशभरात उमटले. त्यामुळेच मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला. देवरा यांनी राजीनामा देताना आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाच्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस केली. तसेच आपण पक्षासाठी राष्ट्रीय भूमिका बजावण्यास उत्सुक असून मुंबई काँग्रेसला आपण नेहमीच मार्गदर्शन करत राहणार आहे, असेही देवरा म्हणाले. त्यामुळे कॉंग्रेसच्या मुंबईकर कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला आहे. देवरा यांनी नेमका प्रातिनिधिक स्वरुपात राजीनामा दिला आहे का त्यांना खरेच हे पद नको आहे याबाबत पक्षामध्येच 'कन्फ्युझन' आहे.

 

दुसरीकडे देवरा यांनी पळपुटेपणा दाखवला. त्यांना या पदाची शिडी वापरून राष्ट्रीय पातळीवरील मोठे पद मिळवायचे आहे, अशी कठोर टीका माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. आपल्याला अध्यक्षपदावरून हटवण्यात देवराच होते, याचा राग निरुपम यांच्या मनात आहे. तसेच गेल्या पाच वर्षात आपल्यामुळेच संघटना तगली, असा निरुपमांचा दावा आहे. याउलट माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप हे सर्वजण निरुपम यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. कोणाकडेही पद गेले तरी चालेल पण निरुपमना दूर ठेवा, अशी मागणी या सर्वांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या गोंधळामुळे मात्र अडचणीच्यावेळीही कॉंग्रेस नेते एकत्र येत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

कॉंग्रेस वापरणार 'मराठी कार्ड'?

 

सध्या मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी पक्षाकडे पर्याय मर्यादितच आहेत. त्यामुळे उशिराने का होईना ज्येष्ठ नेते भाई जगताप यांना पक्ष मोठी जबादारी सोपवेल असे म्हटले जात आहे. पण कॉंग्रेस मुंबईत सहसा 'मराठी कार्ड' वापरत नाही, असा इतिहास आहे. स. का. पाटील सोडले तर फार कमी मराठी नेते या पदावर बसले आहेत. अलीकडे जनार्दन चांदुरकर यांना हे पद मिळाले होते. पण ते पक्षाला 'निधी' मिळवून देण्यात कमी पडल्याने त्यांची उचलबांगडी केल्याचे सांगण्यात येते. मुंबईकडून कॉंग्रेसला नेहमीच निधीचीच अपेक्षा असल्याचे वेळोवेळी दिसले आहे. म्हणून तर कॉंग्रेस मुंबईत अजिबात न वाढवताही मुरली देवरा हे या पदावर तब्बल बावीस वर्षे ठाण मांडून होते. त्यामुळे आता कामगार नेते म्हणून प्रसिद्ध असणार्या भाई जगताप यांच्याकडून पक्षाला नेमकी कोणती अपेक्षा असेल ते काही काळातच समोर येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat