असेही जपानी ‘कार’नामे!

    दिनांक  11-Jul-2019   
 

जपानमध्ये कार भाड्याने घेण्याची सेवा वेगाने लोकप्रिय होत आहे. म्हणजेच कार भाड्याने घ्यायची आणि वाट्टेल तशी, हव्या तेवढ्या वेगाने, रस्ता संपेल तिथपर्यंत दामटायची, पिटाळायची! शिवाय भाडेही कमीच, एका तासाचे केवळ ८ डॉलर किंवा ५६० रुपये. मात्र, जपानमध्ये ही सेवा घेणार्‍यांसंदर्भातली अनोखी गोष्ट म्हणजे बहुसंख्य जपानी लोक भाड्याच्या कारचा वापर प्रवासासाठी करतच नाहीत.एखादी वस्तू विशिष्ट कामासाठी तयार केली जाते वा त्याचा उपयोग नेमक्या कामासाठीच व्हावा, अशी निर्मात्याचीही अपेक्षा असते. म्हणजे टूथब्रशचा वापर दात घासण्यासाठी, छत्रीचा वापर पाऊस वा उन्हापासून संरक्षणासाठी आणि असाच अन्य काही उपकरणांचा वापर त्या त्या कामांसाठी करण्यात येतो. परंतु, बर्‍याचदा ज्या कामासाठी वस्तू तयार केलेली असते, त्याऐवजी भलत्याच कामासाठीही त्याचा वापर करणारी माणसे आहेतच. त्यापैकी काही कल्पना इतक्या भन्नाट, लक्षवेधक असतात की, तसा विचार अन्य कोणीही करूच शकत नाही.

 

आपल्याकडे तर स्त्रियांचे पारंपरिक वस्त्र म्हणजे साडी. मग त्याचा वापर परिधान करण्याऐवजी त्यापासून गोधडी-पिशव्या शिवणे, मुलींचे-महिलांचे आकर्षक कपडे तयार करणे यासाठीही केला जातो. सोबतच रिकाम्या बाटल्या, टायर वगैरेंपासूनही निरनिराळ्या वस्तू तयार केलेल्या पाहायला मिळतात. परंतु, जपानी लोकांनी मात्र एका उत्पादनाचा असा काही वापर सुरू केला की, संबंधित सेवा देणार्‍या कंपन्याही चक्रावून गेल्या.

 

दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांचा उपयोग सर्वसाधारणपणे प्रवासासाठी, दळणवळणासाठी, वाहतुकीसाठीच करण्यात येतो. त्यांची निर्मितीही त्याच उद्देशाने केलेली असते. जपानमधल्या टोयोटा, होंडा, निस्सान, सुझुकी, यामाहा, कावासाकी, मित्सुबिशी या कंपन्यांची वाहने जपान, भारतासह जगभरातील रस्त्यांवर धावतानाही आपण पाहतो. वाहन उत्पादक कंपन्यांबरोबरच त्या भाड्याने देणार्‍या अनेक कंपन्याही ठिकठिकाणी कार्यरत आहेत.

 

माइल्स, झूम, इको, एव्हिस, लेट मी ड्राइव्ह, व्हील्सस्ट्रीट, रेंट ऑन गो ही भारतातली काही आघाडीची नावे, अशाच कंपन्या जपानमध्येही सुरू आहेत. पण ग्राहक गाड्या भाड्याने घेतोय, मात्र त्या पुढे सरकतच नाहीयेत, एकाच जागेवर उभ्या आहेत, तरीही वापरकर्ते पैसे देतायत, असं कधी होऊ शकेल का? आणि झालेच तर का? हाच प्रश्न ही सेवा देणार्‍या जपानी कंपन्यांना पडला आणि शेवटी बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांना त्याचे उत्तरही मिळाले.

 

तर झाले असे की, जपानमध्ये कार भाड्याने घेण्याची सेवा वेगाने लोकप्रिय होत आहे. म्हणजेच कार भाड्याने घ्यायची आणि वाट्टेल तशी, हव्या तेवढ्या वेगाने, रस्ता संपेल तिथपर्यंत दामटायची, पिटाळायची! शिवाय भाडेही कमीच, एका तासाचे केवळ ८ डॉलर किंवा ५६० रुपये. मात्र, जपानमध्ये ही सेवा घेणार्‍यांसंदर्भातली अनोखी गोष्ट म्हणजे बहुसंख्य जपानी लोक भाड्याच्या कारचा वापर प्रवासासाठी करतच नाहीत.

 

उलट तेही कार भाड्याने घेऊन एका ठिकाणी, रस्त्याच्या कडेला उभी करतात आणि इथूनच सुरू होते पुढचे काम. म्हणजेच इथले कारभाडेकरू गाडीत लावलेल्या एसी आणि ऑडिओ-व्हिडिओ सिस्टिमचा भरपूर आनंद घेतात, मौज करतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू-जसे की मोबाईल, पॉवर बँक वगैरेला चार्जिंग करून घेतात, आवडते चित्रपट पाहतात, तर काही काही लोक आपल्या मित्रांच्या भेटीगाठीही कारमध्येच घेतात, गप्पा मारतात आणि खातात-पितात. इतकेच नव्हे तर काही काही लोक तर तीन-चार तासांची झोपही कार भाड्याने घेऊनच उरकतात. पण जपानी लोक हे असे का करत असतील? हा प्रश्न पडणे साहजिकच. तर त्याचे उत्तर आहे, कारमध्ये त्यांना एकांताबरोबरच अन्य सर्व सोयी-सुविधा अतिशय कमी किमतीत मिळतात.

 

कार भाड्याने देणार्‍या ऑरिक्स ऑटो कॉर्पला ग्राहकांच्या या अजब-गजब वर्तनाची माहिती वाहने ट्रॅक करताना मिळाली. कंपनीने गाडी एकाच जागी थांबण्यामागचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी आपल्या अडीच लाख ग्राहकांचा डेटा उचकला, तपासला. दुसरीकडे ग्राहकांनी मात्र याबद्दल चांगले अनुभव सांगितले. एकाने, कार भाड्याने इतक्या कमी पैशात उपलब्ध होते की, मित्रांची सायबर कॅफेत भेट घेण्याऐवजी कारमध्येच भेट घेतो, तर दुसर्‍याने फारच गर्दी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये कार्यालयातून मिळालेली काही तासांची सुट्टी घालवण्याऐवजी कारमध्ये कमी पैशात ते साध्य होते, असे सांगितले.

 

काही ग्राहकांनी तर टीव्ही पाहण्यासाठी, हॅलोविनसाठी तयार व्हायला, गाणे शिकण्यासाठी, इंग्रजीत संवाद साधण्यासाठी भाड्याच्या कारचा वापर करत असल्याचेही सांगितले. म्हणजेच कार तयार केली ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी, पण जपानी लोक तिचा उपयोग अन्य कामांसाठीच करत असल्याचे दिसते. पण यातून आणखी एखादा व्यवसायाचा नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतो का?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat