दोष हा कुणाचा?

    दिनांक  11-Jul-2019   अवघ्या दीड वर्षांचा दिव्यांश.... बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या इवलुशा पावलांनी घराबाहेर पडला. चार पावलं टाकताच मुख्य रस्त्यापाशी आला. पण, त्याचं पुढचं पाऊल पडलं ते थेट उघड्या गटारात. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्याची आई पोटच्या पोराच्या शोधात रस्त्यावर आली खरी. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही संपूर्ण घटना कैद झाली आणि तेव्हापासून पोलीस, अग्निशमन दलाकडून त्या ड्रेनेज लाईनमध्ये दिव्यांशचा शोध सुरूच आहे. या दुर्घटनेनंतर दिव्यांशच्या पालकांनी पालिकेलाच यासाठी दोषी ठरवत कोर्टातही खेचण्याचा इशारा दिला. कारण, या उघड्या गटारांना बंद करण्याची वारंवार तक्रार त्यांनी पालिकेकडे केली होती, पण पालिकेचा ढिम्म कारभारच आज एका चिमुकल्याच्या जिवावर उठला. स्थानिकांनी दुपारी 'रास्ता रोको'ही केला. महापौरसाहेबही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, घटनास्थळी भेट देऊन गेले. पण, प्रश्न हाच की, या महानगरात, भावी स्मार्ट सिटीत चालतानाही नागरिक कितपत सुरक्षित आहेत? दिव्यांशचा शोध अद्याप लागलेला नाही. त्याची वाचण्याची शक्यताही तशी मावळलेलीच. पण, या घटनेनंतर पुन्हा एकदा यांसारख्या जीवघेण्याच घटनांसाठी 'जबाबदार कोण?' हाच प्रश्न उपस्थित होतो. महापौरांच्या म्हणण्यानुसार, स्थानिकांनीच पावसाच्या पाण्याचा निचर्‍यासाठी मॅनहोलचे झाकण उघडे ठेवले आणि दिव्यांश पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. महापौरांच्या शब्दावर क्षणभर विश्वास ठेवला तरी, गटारं, मॅनहोलची झाकणं असं कुणीही येऊन उघडणार असेल, तर ती यंत्रणा सदोष ठरवून तातडीने बदलायलाच हवी. केवळ लोकांनी ती झाकणं उघडू नये, तसे केल्यास दंड ठोठावला जाईल यांसारख्या वरकरणी उपाययोजना पुरेशा नाहीत. गटारं, मॅनहोलची झाकणं ही पालिकेच्या कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर कोणाला साधी हलवताही येणार नाहीत, यासाठी पालिकेने आजवर काय प्रयत्न केले? डॉ. दीपक अमरापूरकरांच्या घटनेनंतर पालिकेने जाळीयुक्त मॅनहोलच्या झाकणांची उपाययोजना केली होती. पण, त्याचे पुढे काय झाले? मुंबईतील किती मॅनहोल आज सुरक्षित म्हणता येतील? त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळायच्या असतील, तर नवीन आयुक्तांनी तातडीने 'अ‍ॅक्शन प्लॅन' हाती घेऊन युद्धपातळीवर मुंबईकरांच्या पायाखालची जमीन तरी किमान सुरक्षित करावी.

 

दुर्लक्ष आणि दुर्देव

 

महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांसाठीच्या 'नजर हटी दुर्घटना घटी'च्या मोठाल्या सूचना फलकांवर लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. पण, हे चार शब्द फक्त वाहनचालकांसाठीच नाही, तर तुम्हा-आम्हा अशा सर्वच जीवनचालकांसाठी आहेत. स्वत:चे जीवन आणि आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचाही जीव लाखमोलाचा. त्यामुळे प्रत्येक क्षणी सावध राहणं अत्यंत महत्त्वाचं. खासकरून, पालकांनी, ज्यांची मुलं अजूनही नकळत्या वयात आहेत. कारण, जे दिव्यांशबरोबर झालं, ते अगदी इतर कोणत्याही लहान मुलाबरोबर होऊ शकतं. दिव्यांशच्या पालकांचा पालिकेवरील रोष, त्यांचा आक्रोश हा योग्यच. पोटचं पोरं गमावण्याच्या दु:खापेक्षा दुसरं दुर्देवही नाही. देव करो, ही वेळ कोणावरही न येवो. पण, त्यासाठी पालकांनाही डोळ्यात तेल घालून मुलांची काळजी घेणं, हे आजच्या काळात क्रमप्राप्तच आहे. अगदी घरातही आणि घराबाहेरही. त्यातच पावसाळ्यांच्या दिवसात अवघे तीन वर्षांचे मूल घराबाहेर पडून रस्त्यापर्यंत आले आणि घरातल्यांच्या ते लक्षात येऊ नये, यालाही निष्काळजीपणाच म्हणावा लागेल. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या जवळ घर असल्यास, घराबाहेर मॅनहोल, गटारं उघडी असल्यास ती तातडीने पालिकेशी संपर्क साधून बंद करून घ्यावी; अन्यथा अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. त्याचबरोबर वयाने थोडी मोठी मुलंही शाळेतून घरी परतताना, शिकवणीला जाताना, मैदानावर खेळायला जात असल्यास पालकांनी मुलांनाही सावधगिरीच्या चार सूचना देऊन खबरदारी घ्यायलाच हवी. खरं तर पालकांनी मुलांच्या जन्मापूर्वीपासूनच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातच सर्वप्रथम काही बदल घडवून आणावेत. त्यामध्ये अगदी लहान-सहान गोष्टींचा कटाक्षाने विचार करायलाच हवा. जसे की, बंद शू-रॅक. घरात गेल्या गेल्या चपला काढून आपण मोकळे होतो. अशावेळी अनावधानाने लहान मूल त्या चपला तोंडात घालण्याची शक्यता असते. म्हणून मुलांना उघडता येणार नाही, असेच बंद शू-रॅकची व्यवस्था करून चपला-बूट त्यातच ठेवावे. कारण, हल्ली घरातल्या घरातही मुलांबरोबर होणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण वाढले असून तेही तितकेच चिंताजनक आहे. सांगायला, अशा भरपूर गोष्टी आहेत, ज्यांची काळजी पालकांनी अगदी सुरुवातीपासून घेतली पाहिजे. त्यासाठी अनुभवी पालकांचा, आपल्या आईवडिलांचा सल्लाही मोलाचा ठरू शकतो. म्हणूनच सदैव लक्षात ठेवा, दुर्लक्ष आणि दुर्दैव यामध्ये फारसे अंतर नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat