कल्याणमध्ये अभाविपचे आदित्य ठाकरेंसमोर आंदोलन

    दिनांक  11-Jul-2019शैक्षणिक व्यासपीठांवर राजकारणी नकोच!

 
 

कल्याण : शैक्षणिक व्यासपीठांवरील राजकारण्यांच्या उपस्थितीबाबत आक्रमक पवित्रा घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी कल्याणमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर भर कार्यक्रमात आंदोलन केले.

 

मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक कार्यक्रम असतानाही आदित्य ठाकरे यांची उपस्थिती कशाला, असा सवाल यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या या प्रश्नांचा ’सामना’ करण्याऐवजी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा हिंसात्मक मार्ग पत्करल्याचे अभाविप कार्यकर्त्यांनी सांगितले. पोलिसांनी यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले. मात्र, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र वायकर, खा. डॉ. श्रीकांत शिंदे आदींच्या उपस्थितीतच अभाविपने हे आंदोलन केल्याने युवासेनेसह शिवसैनिकांची पुरती नाचक्की झाली.

 

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात वसंत व्हॅली येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले असून तब्बल १२ वर्षे हे उपकेंद्र सुरू होण्यासाठी लागली. यावेळी सोहळ्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भाषण संपताच कुलगुरू सुहास पेडणेकर हे भाषणासाठी उभे राहिले. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उभे राहत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

 

युवासेना कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी धाव घेत या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. हा शासकीय सोहळा असताना विद्यापीठ प्रशासनाने त्याला राजकीय स्वरूप दिल्यामुळेच अभाविपतर्फे ही निदर्शने करण्यात आली असल्याचे अभाविपचे कोकण प्रदेश सहमंत्री दर्शन बाबरे यांनी सांगितले. दरम्यान, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपकेंद्राबाहेर अभाविप आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केलेले हे आंदोलन मोठा चर्चेचा विषय ठरले.

 

प्रश्नांची उत्तरे द्या; अभाविपची मागणी

विद्यापीठाच्या अधिकृत कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आदित्य ठाकरेंना का बोलावले, यामुळे कार्यक्रम विद्यापीठाचा की युवासेनेचा, तसेच युवासेनेने उपकेंद्राला वेढा दिला होता. म्हणजेच उपकेंद्र युवासेनेचे होते का, असा सवाल अभाविपतर्फे उपस्थित करण्यात आला असूनझालेला विरोध हा विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात होता, असेही स्पष्ट करण्यात आल्याची माहिती अभाविप कोकण प्रांतमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat