समुद्राच्या पोटातून काढली ४० हजार चौ.मी जाळी

    दिनांक  11-Jul-2019   


 


 सागर रक्षणासाठी सिंधुदुर्गातील पाणबुड्यांचे स्वखर्चाने काम

 

मुंबई ( अक्षय मांडवकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दांडी किनाऱ्यावरील काही पाणबुडे (डायव्हर) सागरी परिसंस्थेचे रक्षक ठरले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी सागराच्या पोटात अडकलेली सुमारे ४० हजार चौ.मी मासेमारीची जाळी (घोस्ट नेट) समुद्राबाहेर काढली आहे. तर जाळ्यात अडकणाऱ्या सागरी जीवांना वाचविण्याचे काम महिनाभरापासून त्यांनी हाती घेतले आहे.

 

 
( जाळ्यात अडकलेल्या सागरी कासवाची सुटका करताना )  
 

सिंधुदुर्गमधील दांडी किनारा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथील सागरी परिक्षेत्र प्रवाळ खडकांनी समुद्ध असल्याने याठिकाणी 'स्कुबा डायविंग'ला मोठी मागणी आहे. मात्र, या खडकांमध्ये अडकून राहणाऱ्या मासेमारीच्या जाळ्यांमुळे सागरी जीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. समुद्रात मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्या जोरदार लाटांच्या प्रवाहांमुळे खोल तळाशी वाहून जातात. तर काही मच्छीमार खराब झालेल्या जाळ्या समुद्रात फेकून देतात. या जाळ्या प्रवाळ खडकांवर अडकतात किंवा खोल समुद्रात तरंगत राहतात. अशा जाळ्यांमध्ये सागरी कासवे, पाॅयपाॅईज आणि डाॅल्फिन यांसारखे संरक्षित जीव अडकतात. प्रसंगी त्यातून सुटका न झाल्याने त्यांच्या मृत्यू होतो. त्यामुळे सागरी परिसंस्थेला घातक ठरणाऱ्या या जाळ्यांना बाहेर काढण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून दांडी किनाऱ्यावरील 'स्कुबा डायविंग' प्रशिक्षक जगदीश तोडणकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत. 'यूएनडीपी' प्रकल्पाअंतर्गत येथील स्थानिक मच्छीमारांनी 'स्कुबा डायविंग'चे प्रशिक्षण घेऊन निसर्ग पर्यटनासंबंधीत व्यवसाय सुरू केले आहेत.

 

 
 

गेल्या दोन वर्षांमध्ये सिंधुदुर्ग किल्ला ते दांडी किनारा या ३ ते ४ किमीच्या सागरी परिक्षेत्रामधून सुमारे ४० हजार चौ.मी जाळी समुद्राबाहेर काढल्याची माहिती जगदीश तोडणकर यांनी दिली. हे काम ८ ते १० मीटर खोल समुद्रामध्ये करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अशा पद्धतीच्या सागरी स्वच्छतेचे काम ही मंडळी स्वखर्चाने करत आहेत. तसेच या जाळ्यांमध्ये अडकणाऱ्या सागरी कासवांना वाचविण्याचे काम या लोकांकडून सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात जाळ्यात अडकलेल्या 'ग्रीन सी' प्रजातीच्या दोन सागरी कासवांची सुटका तोडणकर यांनी केली आहे. सागरी परिसंस्थेप्रती त्यांच्या या कामाची दखल घेत लवकरच 'वाईल्डलाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया' या संस्थेकडून त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संशोधक स्वप्निल तांडेल यांनी दिली.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat