दिव्यांग विद्यार्थ्यांची 'स्पेशल' दिंडी

    दिनांक  10-Jul-2019


 

नरेपार्कच्या शाळेतील दिव्यांग मुलांचा सहभाग ; वृक्षारोपन आणि अवयव दानाचा संदेश
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) : परळच्या नरेपार्क येथील मुंबई महानगरपालिकेच्या मतिमंद मुलांच्या शाळेत 'श्रीरंग संस्थे'तर्फे बुधवारी सकाळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिंडीव्दारे वृक्षारोपन आणि अवयव दानाचे महत्व सांगितले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या स्पेशलदिंडीवर आधारित एक विशेष गीत तयार करण्यात आले आहे. दिंडीवर आधारित आतापर्यंत अनेक गाणी झाली असली तरी दिव्यांग मुलांना केंद्रस्थानी ठेवून वारीचं हे पहिलेच गीत तयार झाले आहे. महत्वाचे म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांची दिंडी ही महाराष्ट्रातील पहिलीच दिंडी ठरली आहे.

 

बुधवारी सकाळी नरेपार्कच्या विशेष मुलांच्या शाळेतील वातावरण विठुमय झाले होते. कारण होते ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विशेष दिंडीचे. विठ्ठल-रखुमाईच्या रुपात तयार झालेेले दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने या सामाजिक दिंडीची सुरुवात झाली. वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातील वारकरी या दिंडीत उपस्थित राहिल्याने सात्विक वातावरण निर्माण झाले होते. दिंडीसाठी इतर विशेष विद्यार्थी पारंपारिक वेशात आले होते. माहीमच्या संस्कृती-रंग यांची पारंपारिक गाणी तसेच मंगळगौर यावेळी सादर झाली. पारंपारिक वेशात नटलेल्या या विद्यार्थ्यांनी सजवलेली विठ्ठलाची पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विशेष म्हणजे या पालखीत विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींऐवजी देवाचं प्रतिक म्हणून झाडांना ठेवण्यात आले होते. या वृक्षदिंडीव्दारे 'झाडांमध्ये आपला देव शोधा', असा संदेश देण्यात आला. शेवटी तुळशीची रोपं वाटून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपनाचा संदेश रुजविण्यात आला.
 

 

 


या स्पेशलदिंडीवर आधारित गीताचे चित्रिकरण यावेळी करण्यात आले. मराठी सिनेसृष्टीतील कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून ही स्पेशलदिंडी साकारली होती. या दिंडीवर चित्रित केले गेलेले गीत अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केले आहे. तर शिवहरी रानडे यांनी या गीताला संगीत दिले आहे. पार्श्वगायक जयदीप बगवाडकर आणि व्हायोलनिस्ट श्रुती भावे यांनी आपल्या सुरेल आवाजात ते गायले आहे. संदेश कदम यांनी हे गीत तालबद्ध केले आहे. पराग सावंत यांनी हे गीत चित्रित केले असून अक्षय माने आणि अमित रुके यांनी या गाण्यासाठी दिंडीतील क्षण चित्रित केले आहेत. आरती कादवडकर, साक्षी खाडये आणि रोहन टिपे यांनी या गाण्यासाठी चित्रसहाय्य केले तर सौरभ नाईक यांनी संकलन केले आहे. महाराष्ट्रातील इतकी मोठ संत परंपरा, इतका मोठा सण दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अनुभवता यावा यासाठी हा अट्टाहास असल्याचे कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी सांगितले. वारीची आगळीवेगळी अनुभूती दिल्याने शाळेचे प्रशासकीय अधिकारी आणि सर्व शिक्षकांनी 'श्रीरंग संस्थे'चे आभार मानले.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat