स्टम्पव्हिजन : लढून हरलो...!

    दिनांक  10-Jul-2019

सेकंदाची किंमत काय असते, हे महेंद्रसिंग धोनीशिवाय कुणीच सांगू शकत नाही. सेकंदाच्या शतांश फरकाचा वेग धोनीला कमी पडला आणि धोनीसोबत भारतीय क्रिकेट संघही या विश्वचषक स्पर्धेतून धावचित झाला. धोनीला एक इंच अंतर कमी पडले तर भारतीय संघाला १८ धावा कमी पडल्या. विश्वचषकाच्या सलग दुसर्‍या उपांत्य फेरीमध्ये धोनी धावचित झालाय. सिडनीला झालेल्या २०१५ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य सामन्यामध्ये धोनी अशाच विजयाच्या आशा उंचावत ६५ धावा काढून धावचित झाला होता. या दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यातील पराभवाचे आणखी एक कारण म्हणजे या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली फक्त १ धाव काढून बाद झाला होता.

 

खरंतर यंदाच्या विश्वचषकामध्ये फलंदाजी हे भारताचे बलस्थान होते. पण भरवशाच्या म्हशीला टोणगा, ही म्हण आज भारतीय फलंदाजांनी खरी करून दाखवली. अर्थात मँचेस्टरची आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी नक्कीच सोपी नव्हती. रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली प्रत्येकी १ धाव काढून बाद झाले. ३ बाद ५ धावा या धावसंख्येवरून खरं तर कोणत्याही संघाने हाय खाल्ली असते, पण भारतीय संघातील खडूसपणा आजही दिसला. शेवटच्या विकेटपर्यंत झुंज दिली गेली. सहज हरण्याएवेजी लढून हरलो, अशी नोंद या सामन्याची घेतली जाईल.

 

जेव्हा सर्व तुमच्या मनाविरुद्ध होत असेल तेव्हा सरळ बॅटने खेळत राहा, हा क्रिकेटमधील गुरुमंत्र रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने तंतोतंत अंमलात आणला आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले, पण उंबरठा ओलांडण्याआधीच भारतीय संघाचा तोल गेला. विजयाचे सगळेच हकदार असतात, पराभवाला मात्र बाप नसतो, त्यामुळे या पराभवासाठी कुणाचा गळा पकडायचा? सुरुवात पावसापासून करूया. पावसाने आणि त्यानंतरच्या कुंद हवामानामुळे नक्कीच खेळावर विपरीत परिणाम झाला. विशेषतः सकाळच्या सत्रात न्यूझीलंडच्या फलंदाजांना २३ चेंडूंमध्ये ३ बादच्या मोबदल्यात अवघ्या २८ धावा करता आल्या, तेव्हाच काळजात चर्रर्र झालं होतं. हाती ५ खेळाडू असतानाही न्यूझीलंडच्या फलंदाजांची झालेली दमछाक पुढील घडामोडीचे संकेत देणारी होती.

 

विजयासाठी २४० धावा हे भारतासाठी अशक्यप्राय नक्कीच नव्हते. पण हेन्रीच्या पहिल्याच षटकामध्ये एका अफलातून चेंडूवर रोहित शर्मा चकला. हलकासा स्विंग झालेला बॉल कट करण्यास हेन्रीने रोहित शर्माला भाग पाडले आणि यष्टीरक्षक लॅथमकडे झेल देऊन तो तंबूत परतला. पाठोपाठ विराट आणि के.एल. राहुल तंबूत परतले आणि ४ षटके ३ गडी बाद आणि ५ रन्स अशी भारताची या विश्वचषकामध्ये पहिल्यांदाच केविलवाणी अवस्था झाली. दिनेश कार्तिक स्थिरावतो आहे, असं वाटत असतानाच अशक्यप्राय अशा निशमने घेतलेल्या झेलने दिनेश तंबूत परतला.

 

मैदानावर पंतसारखा हिटर असताना खरंतर अनुभवी धोनीला वर पाठवलं जाईल, अशी अटकळ होती, पण हार्दिक मैदानात उतरला आणि अखेर व्हायचं तेच झालं. हे दोघे बाद झाल्यावर धोनी आणि जाडेजाने ज्या पद्धतीने किल्ला लढवला, त्यावरून भारताच्या थिंक टँककडून नक्कीच गफलत झाली, असं म्हणावयास वाव आहे. विशेषतः धोनी ज्या ५० सामन्यांमध्ये नाबाद राहिला त्यापैकी ४७ सामने भारत जिंकला होता. दोन सामने हरला होता आणि एक सामना अनिर्णित राहिला होता. धोनीला वर पाठवलं असतं तर कदाचित परिणाम काही वेगळा झाला असता. असो. खेळात जर तरला महत्त्व नसते.

 

जो जिंकतो, तो सिकंदर असतो. आजच्या या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने जो खेळ खेळला तो अद्वितीय होता. विशेषतः दिनेश कार्तिकचा झेल आणि धोनी धावचित, या दोन क्षणांवर सामना फिरला, एवढं मात्र नक्की. पण आजच्या या सामन्यामध्ये रवींद्र जाडेजाबद्दल कौतुकाचे दोन शब्द लिहिलेच पाहिजेत. क्षेत्ररक्षणामध्ये एक अफलातून झेल आणि धावचित, गोलंदाजीमध्ये एक बळी आणि फलंदाजीमध्ये ५९ चेंडूंमध्ये ७७ आणि तेही पराभव भारताच्या मानगुटीवर बसलेला असताना...

 

अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर धोनीच्या ५० धावा सोडल्या तर उर्वरित रोहित, विराट, राहुल, पंत, कार्तिक, हार्दिक, भुवनेश्वर, चहल आणि बुमराह या ९ खेळाडूंना मिळून फक्त ७८ धावा करता आल्या, यावरून जाडेजाच्या ७७ धावांचं मोल कळू शकतं. युद्धात दुसरी संधी नसते, संपूर्ण विश्वचषकामध्ये सर्वधिक गुण मिळवून अव्वल क्रमांकावर आलेल्या भारताला अखेर निर्णायक क्षणी झटका बसला. आता पुढील चार वर्षांनंतर भारतीय संघाचा चेहरामोहरा बदललेला असेल. या संघात धोनी नसेल. जिगरबाज आणि जिंकण्यासाठीच खेळणार्‍या या धोनीची जादू कायम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयात राहील.

 

आजच्या युवा पिढीला एकदा नव्हे तर दोनदा जगज्जेतेपदाचा आनंद साजरा करण्याची संधी धोनीने दिली. एकदा ‘टी-२०’ आणि एकदा एकदिवसीय विश्वचषक जिंकून. यंदाचा विश्वचषक जिंकून धोनीला निरोप देण्याची चांगली संधी विराटसेनेला होती. पण सगळीच स्वप्न सत्यात उतरत नसतात. पण एक मात्र नक्की, धोनी युगाने आपणा सगळ्यास विश्वविजेतेपदाची स्वप्न पाहण्याची सवय लावली. विश्वचषकामधील आपलं आव्हान संपुष्टात आलंय पण हेही खरंय की, आपण लढून हरलोय...!

 

- संदीप चव्हाण 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat