राधेयच्या मनीचे शल्य!

    दिनांक  10-Jul-2019

 

 
 
"महायुद्धाच्या सतराव्या दिवशी पहाटेच दुर्योधन शल्याकडे आला व म्हणाला, “मी तुझ्याकडे एक मागणे मागणार आहे आणि तुझ्या पाया पडून ही विनंती मान्य कर, असे सांगणार आहे. आज राधेय व अर्जुन यांचे निकराचे युद्ध होईल. कृष्णासारखा सारथी राधेयला जर मिळाला, तर राधेय सहज विजयी होईल. तुझ्यापेक्षा उत्तम सारथी कोणीच नाही. तूच हे काम करू शकतोस. जरा माझ्या सैन्याकडे पाहा, कशी दाणादाण झालीय! पूर्वी हे सैन्य संख्येने विराट होते. पण, आता उन्हाळ्यातल्या सुकलेल्या नदीसारखे दिसत आहे. माझ्यासाठी अनेक वीरयोद्ध्यांनी आपले प्राण दिले. इतके पाप मी कसे फेडणार, हे माझे मलाच माहिती नाही. आता जे मोजके उरले आहे, त्यात तू तर सर्वश्रेष्ठ आहेस. तूच राधेयला साहाय्य करून हे युद्ध जिंकण्यास मदत करू शकतोस. कृपा कर आणि माझी ही विनंती मान्य कर!"
 
 
 

त्याचे हे वक्तव्य एकूण शल्य खूप संतापला. तो म्हणाला, “दुर्योधना, हे बोलून तू माझा अपमानच करत आहेस. राधेयावरील अतिप्रेमामुळे हे साहस तू केले आहेस, हे मी जाणतो. परंतु, त्या सूतपुत्राचे सारथ्य तू मला करायला सांगत आहेस? तुला झालं तरी काय? मी मोठा राजा आहे. महारथी आहे. माझा राज्याभिषेक झाला आहे. कोणीही आजवर मला जिंकू शकला नाही. असे असूनही तू मला माझ्याहून हीन असलेल्या राधेयचे सारथ्य करायला सांगावे, याचे मला एक आश्चर्यच वाटते. तू आज एका महान योद्ध्याचा अपमान केला आहेस. अरे, राधेय, अर्जुन आणि श्रीकृष्ण एकत्र येऊन माझ्याशी लढू लागले, तरी मी त्यांना जिंकू शकतो. यापेक्षा मी माझ्या राज्यात परत जातो. माझ्या मनी तुझ्याविषयी मान व जे प्रेम होते, ते आता समाप्त झाले आहे,” असे बोलून शल्य जाण्यास निघाला.

 
 

दुर्योधनाने त्याला थांबवले. हात जोडून अश्रू भरल्या नयनांनी तो म्हणाला, “हे राजन, तू माझ्यावर चिडावेस हे योग्य नाही. राधेय तुझ्याहून श्रेष्ठ व उच्च आहे, असे मी कधी म्हटलेच नाही. खरं म्हणजे राधेय हा अर्जुनाहून श्रेष्ठ आहे, हे मी जाणतो. पण, त्याला अर्जुनाच्या सारथ्याहून महान सारथी हवा आहे. श्रीकृष्णासारखा श्रेष्ठ सारथी या जगात तुझ्याशिवाय कुणीहीनाही. तू तर श्रीकृष्णाहूनही दुपटीने श्रेष्ठ आहेस. तेव्हा आमच्यासाठी तू एवढे करावेस ही विनंती.” शल्य म्हणाला, “दुर्योधन, मी कृष्णाहून श्रेष्ठ आहे, असे तू म्हणालास. तेही या सर्वांसमोर! मी भरून पावलो. प्रसन्न झालो आहे. या सर्व योद्ध्यांसमोर मी तुला शब्द देतो की, मी हे करेन!” मग दुर्योधन कृतज्ञतेने त्यांच्या पाया पडला व ही बातमी सांगण्यासाठी तातडीने राधेयकडे निघाला.

 
 

परंतु, तत्पूर्वी दुर्योधन पुन्हा शल्याकडे आला व म्हणाला, “मला तुला आणखीन वेगळेच सांगायचे आहे. महान गुरू भार्गव यांना सर्व दिव्य अस्त्रे शंकराने दिली. पण, ती देताना ही अट घातली होती की, हलक्या कुळात जन्मलेल्या कुणाला ही देऊ नकोस! राधेय हा भार्गवांचा शिष्य. त्यांनी राधेयला आपली सर्व अस्त्रे व ‘विजय’ नावाचे धनुष्यही दिले. या अर्थी त्यांना ठाऊक होते की, राधेय हलक्या कुळातील नाही, अन्यथा त्यांनी असे केले असते का? उच्च कुळातील स्त्रीच्या पोटीच राधेयने जन्म घेतला असणार, हे गुरू भार्गवांनी ओळखले. मलाही अशीच अटकळ आहे. अधिरथाचा तो मानलेला पुत्र आहे. तो नक्कीच कोणत्या तरी देवाचा पुत्र असणार. तो सूतपुत्र असणेच शक्य नाही. हरिणाच्या पोटी चित्त्याचा जन्म होऊ शकत नाही. त्यांचे रूंद खांदे, लांब हात, सूर्यासारखे तेज, तू पाहिलेस का? ते सारथ्याच्या पुत्राचे असूच शकत नाहीत. त्याच्या जन्माचे गूढ अजून उकलले नाहीच. पण, माझी खात्री आहे की, तो उच्चकुलीन असून नक्कीच क्षत्रिय असणार!”

 
 

हे ऐकून शल्याने पुन्हा दुर्योधनाला आश्वस्त केले. तो म्हणाला, “अरे, माझे तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काहीही करेन. पण, एक गोष्ट ध्यानी ठेव, तू अथवा राधेयने मी जरी काही कठोर शब्द बोललो तरी त्याचा विषाद मानू नये!” हे बोलणे चालू असतानाच तिथे राधेय आला आणि तो म्हणाला,“तुमच्या सौजन्याचा मी ऋणी आहे. शल्य हे माझे सारथी होणार, ही मला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. यासाठी मी नम्रपणे तुमचे आभार मानतो.” राधेयचे हे विनम्र वागणे पाहून शल्य अधिकच सुखावला. त्याने राधेयचा रथ सुंदररीत्या तयार केला. त्याला दाखवण्यास आणला. राधेयने रथास प्रदक्षिणा घालून आपल्या पित्याला, सूर्यदेवाला नमस्कार केला. त्याने शल्याला आधी त्यात प्रवेश करू दिला व नंतर स्वत: आरुढ झाला. राधेय आणि शल्य हे सूर्य आणि अग्नीप्रमाणे तळपत होते. रथ पांडवांच्या दिशेने निघाला. ज्याचा रथ अरुण हाकतो, अशा सूर्यासारखा राधेय तेज:पुंज दिसत होता. दुर्योधनानेप्रेमाने त्याला निरोप दिला. तो म्हणाला, “भीष्म आणि द्रोण यांना जे जमलं नाही, ते तू आज करून दाखवशील, याची मला खात्री आहे. माझ्या मित्रा जा आणि शाश्वत कीर्ती घेऊन ये.” राधेय म्हणाला,”होय दुर्योधना, मी प्रयत्नांची शर्थ करीन. दुर्योधना, मी तुझ्या यशासाठी खूप काही सोसलं. यानंतर सर्व प्राक्तनाच्या हाती आहे, हे लक्षात ठेव.” दोघा मित्रांनी एकमेकांना दृढ आलिंगन दिलं व निरोप घेतला. राधेयला मनातून ठाऊक होते की, ही त्याची शेवटची भेट आहे. त्याच्या डोळ्यांंच्या कोपर्‍यातील अश्रू याची साक्ष देत होते.

 
-सुरेश कुळकर्णी
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat