'दर्याचा राजा'

    दिनांक  10-Jul-2019   
परदेशात स्थिर पगाराची नोकरी असतानाही शाश्वत मासेमारीसंदर्भात काम करण्याच्या ध्येयाने मायदेशी परतलेल्या आणि सध्या 'ऑल इंडिया पर्ससीन फिशरमॅन वेल्फेअर असोसिएशन'चा अध्यक्ष असलेल्या गणेश नाखवाविषयी...

 

 
(अक्षय मांडवकर)  काही 'माणसं' आपल्या समाजाला नवी दिशा देण्याबरोबरच समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सदैव झटत असतात. गणेश नाखवा हा त्यापैकीच एक. मच्छीमार समाजातील तरुणपिढीचे नेतृत्व करणारा एक पट्टीचा मच्छीमार. परदेशात स्थिर पगाराची नोकरी असतानाही शाश्वत मासेमारीसंदर्भात काम करण्याच्या ध्येयाने तो मायदेशी परतला. गेल्या चार वर्षांपासून गणेश मच्छीमार समाजाच्या मूळ प्रवाहात उतरून त्यांचे प्रश्न, समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्ससीन बोटधारक मच्छीमारांसाठी आवाज उठवतो आहे. शाश्वत मासेमारीसंदर्भात शासकीय पातळीवर अचूक धोरण निर्माण करण्यासाठीही त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

 
 
 

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या 'करंजा' या मच्छीमारांच्या गावात गणेशचा १६ मे, १९८७ साली जन्म झाला. मासेमारी हा त्याच्या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय. गणेश हा त्यामधील सातव्या पिढीचा प्रतिनिधी. वयाच्या बाराव्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत तो आपले वडील भगवान नाखवा यांच्यासोबत मासेमारीला गेला. मासेमारीची ती फेरी १० दिवसांची होती. दहा दिवस खोल समुद्रात जाऊन त्यांनी मासेमारी केली. या फेरीमुळे गणेशला मासेमारीत रस निर्माण झालामग काय, शाळेच्या दीर्घकालीन सुट्ट्यांमध्ये तो मासेमारीकरिता वडिलांसोबत समुद्रात जाऊ लागला. ससून बंदर त्याला अगदी तोंडपाठ झाले. त्यामुळे बालपणीच मच्छीमारांच्या विविध समस्यांची गणेशला जाणीव झाली. पुढे विज्ञान विषयातून बारावीपर्यंत गणेशने शिक्षण पूर्ण केले. आपल्या मुलाने परदेशात जाऊन पुढील शिक्षण घ्यावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी गणेश २००५ मध्ये स्कॉटलॅण्डला रवाना झाला. तिथे त्याने 'फायनान्स इन बिझनेस स्टडी'चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या पहिल्या वर्षाचा खर्च त्याच्या वडिलांनी उचलला. मात्र, त्यापुढील दोन वर्षं त्याने स्कॉटलॅण्डमध्येच छोट्या-मोठ्या नोकर्‍या करून शिक्षण पूर्ण केले.

 
 

 
 
 

शिक्षणानंतर दीड वर्ष गणेशने तेथील एका खाजगी कंपनीत नोकरी केली. सर्व काही सुरळीत सुरू असताना वडिलांना मासेमारीमध्ये सहन करावा लागणारा तोटा पाहून त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. २०१० साली तो मायदेशी परतला. त्यानंतर गणेशने सर्वप्रथम नव्या पर्ससीन बोटी बांधून घेतल्या. मासेमारीसंदर्भात शासकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना भेटी देऊन त्याने ओळखी वाढविल्या. पण, २०१४ मधील एका आंदोलनाने गणेशला त्याची 'ओळख' मिळवून दिली. त्यावेळी ससून बंदरामध्ये मासळी खरेदी करणार्‍या व्यावसायिकांविरोधात वजनकाट्याच्या मुद्द्यावरून मच्छीमारांनी आंदोलन केले होते.

 

गणेशने त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सर्व बंदरांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरणे शासनाने बंधनकारक केले. पुढील काळात त्याने पर्ससीन मच्छीमारांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले. पर्ससीन मच्छीमारांच्या विरोधात पारंपरिक मच्छीमार उभे ठाकले होते. पर्ससीन मासेमारीवर सरकारने बंदी आणली होती. त्यासाठी २०१६ मध्ये गणेशने आझाद मैदानात पर्ससीन मच्छीमारांसोबत आंदोलन केले. अडीच ते तीन हजार मच्छीमार त्यावेळी आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनामुळे राज्याच्या १२ सागरी मैल पुढील क्षेत्रात पर्ससीन मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी मिळाली. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी बोटींवर 'जीपीएस' यंत्रणा बसविण्यात आली.

 

 
 

या आंदोलनामुळे गणेश पर्ससीन मच्छीमारांचा 'चेहरा' बनला. सध्या तो 'ऑल इंडिया पर्ससीन फिशरमॅन वेल्फेअर असोसिएशन' या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. आंतराष्ट्रीय पातळीवरील विविध व्याख्यानमालिकांमध्ये त्याला 'शाश्वत मासेमारी'संदर्भात विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले जाते. 'राष्ट्रीय मत्स्यधोरणा'च्या निर्मितीसाठी त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अवैध मासेमारीसंदर्भात कठोर धोरणनिर्मितीसाठीही तो प्रयत्नशील आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनाची क्षमता अधिक आहे. मात्र, केवळ सरकारी अनास्थेमुळे मच्छीमारांना खोल समुद्रातील मासेमारीला मुकावे लागत असल्याचे गणेश सांगतो. मच्छीमार सोसायटींमध्ये संरक्षित सागरी जीवांच्या मासेमारीबाबत जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन करून तो प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. त्याच्या या कामाला दै. 'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा...!

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat