कर्नाटकातील सत्तानाट्याचा 'मुंबई' अंक सुरूच

    दिनांक  10-Jul-2019 
 

 

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच्या १३, एक अपक्ष आमदारांसह जेडीएसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय परिस्थितीबाबतचे गूढ अधिकाधिक वाढत चालले आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार केवळ १३ महिन्यांत मोडकळीस आले. यातील सर्वच्या सर्व बंडखोर आमदार अजूनही मुंबईत तळ ठोकून आहेत. दरम्यान, कुमारस्वामी सरकारला आता १७ जुलै रोजी बहुमत सिद्ध करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 

बुधवारी सकाळपासूनच कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी व त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार आले असता त्यांना भेटण्यास त्यांनी स्पष्ट नकार कळवला. शिवकुमार यांचे हॉटेलमधील बुकिंगही रद्द करण्यात आले. ''आमचे वरिष्ठ नेते शिवकुमार यांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नसून आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र, काही कारणामुळे आम्ही हे पाऊल उचलले आहे. मैत्री, प्रेम, सौहार्द हे सध्या एका बाजूला आहेत. त्यामुळे आम्ही आदरपूर्वक त्यांना विनंती करत आहोत की, आम्ही त्यांना का भेटू शकत नाही.", असे बंडखोर काँग्रेस नेते बसवराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. इथूनच कर्नाटकातील राजकीय नाट्य रंगण्यास सुरुवात झाली.

 

बुधवारी दुपारी २ च्या सुमारास शिवकुमार व नसीम खान याना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याना कलिना येथील विद्यापीठाच्या शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले. याठिकाणी लगेचच कलम १४४ लागू करण्यात आले. यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले बंडखोर आमदार आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

दरम्यान, आमदारांचा राजीनामा सत्र सुरू असतानाच काँग्रेसच्या सर्व २१ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यापाठोपाठच आता जेडीएसच्या मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत. आता पुन्हा नव्याने मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठीच जेडीएसच्या मंत्र्यांनी देखील राजीनामे दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat