कर्नाटकनंतर गोवा काँग्रेसला गळती : काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये

    दिनांक  10-Jul-2019


 
 

पणजी : कर्नाटकात आलेल्या राजकीय भूकंपाचा हादरा गोव्यातही बसत आहेत. येथील काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी (दोन तृतीयांश) काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा बुधवारी सायंकाळी केली. दरम्यान, काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दुजोरा दिला आहे.

 

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी काँग्रेसच्या १० आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष राजेश पाटणकर यांची भेट घेऊन एक पत्र सादर केले. आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची माहिती त्यांनी या पत्रातून अध्यक्षांना दिली आहे. काँग्रेस सोडण्याची घोषणा करणार्‍या आमदारांमध्ये अ‍ॅटानासियो मोन्सेर्राट्टे, जेनिफर मोन्सेर्राट्टे, फ्रान्सिस सिल्व्हेरिया, फिलिप नरी रॉड्रिग्ज, क्लियोफासियो डायस, विल्फ्रेड डिसूझा, नीळकंठ हळर्णकर आणि इसिडोर फर्नांडिस यांचा समावेश आहे. काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडत असल्याचे पत्र सादर करण्यासाठी अध्यक्षांची सायंकाळी ७.३० वाजता भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि उपाध्यक्ष मायकल लोबो उपस्थित होते १० आमदारांनी केलेल्या पक्षांतरामुळे गोवा विधानसभेत काँग्रेसची सदस्यसंख्या घटून पाचवर आली आहे.

 

काँग्रेसच्या १० आमदारांनी त्यांचा गट भाजपमध्ये विलीन केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची विधानसभेतील सदस्यसंख्या २७ झाली आहे. या आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि राज्यात विकास घडवायचा असल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशासाठी त्यांनी कोणतीही अट समोर ठेवली नव्हती, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यापूर्वी सर्व आमदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. “एका मजबूत शासनव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संकल्पात सहभागी होण्याकरिता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी सांगितले.

 

गोवा विधानसभेतील १७ सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन, तर तीन अपक्ष आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मगोपाचा प्रत्येकी एक आमदार आहे. पत्रकारांशी चर्चा करताना चंद्रकांत कवळेकर यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल होण्याचे कारण सांगण्यास नकार दिला. हे कारण स्पष्ट करण्यासाठी लवकरच निवेदन जारी केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat