जुहू किनाऱ्यावर सागरी कासवांना जीवदान

    दिनांक  01-Jul-2019   

 


जाळ्यात अडकलेल्या कासवांची पुुन्हा समु्द्रात सुटका

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जुहू किनाऱ्यावर सोमवारी पहाटे मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन सागरी कासवांना जीवदान देण्यात आले. स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांनी या कासवांची जाळ्यातून सुटका करत त्यांना पुन्हा समुद्रात सोडले. ही दोन्ही कासवे 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीची होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या किनाऱ्यांवर जखमी किंवा अशक्त अवस्थेतील समुद्री कासवे वाहून येण्यास सुरुवात झाली आहे.

 
 
 
 
 
 
पावसाळ्यात जोरदार लाटांच्या माऱ्य़ामुळे अशक्त आणि जखमी अवस्थेतील कासवे समुद्रात तग धरू शकत नाहीत. अशावेळी ही कासवे किनाऱ्यांवर वाहून येतात. मुंबई महानगर क्षेत्रातील किनाऱ्यांवर दरवर्षी ही कासवे मोठ्या संख्येने आढळतात. वन विभागाच्या कांदळवन संरक्षण विभागाकडून यामधील जखमी आणि अशक्त असलेल्या कासवांना ताब्यात घेतले जाते. त्यांच्यावर वन्यजीव बचाव संस्थांच्या मदतीने उपचार केले जातात. मुंबईत मान्सून दाखल झाल्यापासून येथील किनाऱ्यांवर चार जखमी कासवे आढळली आहेत. 'राॅ' या प्राणिप्रेमी संस्थेने या कासवांचा बचाव केला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 

अशाच प्रकारे सोमवारी पहाटे जुहू किनाऱ्यावर स्थानिकांना दोन कासवे आढळून आली. समुद्रामध्येच जाळ्यात अडकलेली दोन आॅलिव्ह रिडले प्रजातीची कासवे जाळ्यासकटच किनाऱ्यावर वाहून आली होती. जाळ्यात अडकल्याने कासवांना कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही. त्यातून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नाात जाळ्याचा फास त्यांची मान किंवा परांभोवती आवळला जातो. अशावेळी हे अवयव कापले जाऊन त्या ठिकाणी खोल जखमा होतात. सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जुहू किनाऱ्यावर प्रभातफेरीसाठी गेलो असता, त्या ठिकाणी जाळ्यात अडकलेली दोन कासवे आढळून आल्याची माहिती स्थानिक रहिवाशी जयंतीभाई पटेल यांनी दिली. वरकरणी पाहता ती कासवे सुदृढ दिसत होती. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने जाळे कापून आम्ही दोन्ही कासवांची पुन्हा समुद्रात सोडल्याचे त्यांनी सांगितले. समुद्र किनाऱ्यांवर जखमी अवस्थेतील सागरी कासवे आढळून आल्यास '१९२६' या क्रमांकावर संपर्क साधण्य़ाचे आवाहन वन विभागाने केले आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat