पावसाचे धुमशान : चाकरमान्यांचा खोळंबा

    दिनांक  01-Jul-2019मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा जोरदार बॅटींग केल्यानंतर सोमवारी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने अधिक जोर धरल्याने सोमवारी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला. मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गावरील गाड्या उशीराने धावत आहेत. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या ३० ते ४० मिनिटे उशीराने धावत आहेत.

 

पश्चिम रेल्वेवर मरिन लाईन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने गाड्या उशीराने धावत आहेत. सकाळी पश्चिम रेल्वेवर मालाड ते विलेपार्ले दरम्यान गाड्या खोळंबल्याचे चित्र होते. परिणामी सकाळी-सकाळी चाकरमान्यांची गैरसोय झाली. ठिकठिकाणी रेल्वेस्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. 

 

मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकापुढे गाड्या मंद गतीने धावत आहेत. ठाण्यात सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लोकल सेवेवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. शीव स्थानकात पावसाचे पाणी साचले आहे.

 

नवी मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. खारघर सेक्टर १० भागातील रस्ते जलमय झालेले आहेत. हार्बर मार्गावरील गाड्याही उशीराने धावत आहेत. कुर्ला भागांत पाणी साचल्याने वाहतूक उशीराने सुरू आहे.
 

पालघर जिल्ह्यातही सकाळपासून तुफान पाऊस झाल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तलासरी, उंबरगाव, बोईसर, पालघर आदी ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. दक्षिण गुजरात आणि पालघर भागातील रेल्वे वाहतूकीवर याचा परिणाम जाणवत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat