वृक्षारोपण ही जनतेची चळवळ व्हावी - कामगारमंत्री

01 Jul 2019 15:54:13



कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार असल्याचे संजय कुटे यांचे आश्वासन


मुंबई : पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्षलागवड महत्त्वाची असून हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य सरकारच्या वनविभागाच्या वतीने सुरू केलेली मोहीम सर्व जनतेची चळवळ व्हावी, असे प्रतिपादन कामगारमंत्री संजय कुटे यांनी आज येथे कले. कामगार विभागाच्यावतीने एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्षया मोहिमेअंतर्गत हुतात्मा बाबु गेनू क्रीडा भवन प्रभादेवी येथे वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

 

कामगार मंत्री संजय कुटे, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, कामगार आयुक्त राजीव जाधव, कामगार विभागाचे सहसचिव महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त महेंद्र तायडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कुटे म्हणाले, वन विभागाच्या वतीने ३३ कोटी वृक्षलागवड एक चांगली मोहीम असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. या मोहिमेला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वनविभागाच्या वतीने सुरू केलेली ही मोहीम केवळ मोहीम न राहता सर्व जनतेची चळवळ व्हावी.

 

कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार

 

कामगार विभागाचा आज ६६वा वर्धापनदिन आहे. राज्यातील कामगार विभागाचे काम चांगले सुरु आहे. या विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. येणाऱ्या काळामध्ये लवकरच कामगारांच्या प्रश्नांबाबत नियोजन करण्यात येणार आहे. विभागाच्या वतीने कामगारांचे विविध मूलभूत प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0