उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रात ४० लाख गॅस कनेक्शन

    दिनांक  01-Jul-2019


 

 

नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशात ७ कोटी २५ लाख ९४ हजार ११४ गॅस जोडणी देण्यात आल्या आहे. यापैकी महाराष्ट्रात ४० लाख ९८ हजार ३७४ गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात उज्ज्वला योजनेंतर्गत विविध राज्यांमध्ये देण्यात आलेल्या गॅस जोडणीची माहिती दिली.

 

देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना गॅस जोडणी देणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचाशुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१६ रोजी केला. शासनाचे प्रयत्न आणि जनतेचा प्रतिसाद यामुळे या योजनेला चांगले यश आले असून आतापर्यंत देशातील एकूण २६ कोटी ४३ लाख २८ हजार ७१६ गॅस कनेक्शन पैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ७ कोटी २५ लाख ९४ हजार ११४ गॅस जोडणी करण्यात आली आहेत.

 

३२ महिन्यात ४० लाख ९८ हजार गॅस कनेक्शन

 

महाराष्ट्रात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा' शुभारंभ ऑक्टोबर २०१६ मध्ये झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण २ कोटी ६४ लाख ७६ हजार ३५७ गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. यापैकी गेल्या ३२ महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ४० लाख ९८ हजार ३७४ गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat