४० वर्षांनंतर घराच्या लढ्याला यश

    दिनांक  09-Jun-2019मुंबई : संक्रमण शिबिरात तब्बल ४० वर्षे वास्तव्य करून मूळ परिसरात स्वत:चे घर हवे म्हणून संघर्ष करणाऱ्या अनंत पवार (७०) यांना अखेरीस हक्काचे घर जाहीर झाले. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाच्या यादीत पवार यांना ताडदेव येथील पुनर्वसन इमारतीत ३०० चौ. फुटाचे घर उपलब्ध होणार आहे. सध्या बोरिवलीतील ओल्ड एमएचबी वसाहतीतील संक्रमण शिबिरातील धोकादायक घरात वास्तव्य असलेल्या पवार यांच्या घरासाठीच्या संघर्षास अखेरीस यश आले आहे.

 

कुंभारवाड्यातील इमारत क्र. १७४ मध्ये राहणाऱ्या अनंत पवार यांना म्हाडाने बोरिवलीतील संक्रमण शिबिरात पाठवले. १९७७ मध्ये बोरिवलीतील एचएचबीतील संक्रमण शिबिरातील इमारतीत पवार राहावयास आले. तब्बल ४० वर्षे उलटून गेली, तरीही त्यांना स्वत:चे घर उपलब्ध केले जात नव्हते. म्हाडाच्या कारभाराने कंटाळल्यानंतरही पवार यांनी पाठपुरावा सोडला नव्हता. अशातच, बोरिवलीतील संक्रमण शिबिरातील घराचीही अवस्था धोकादायक झाली होती. त्यामुळे म्हाडाने पवार यांना शिवडी येथील संक्रमण शिबिराचा पर्याय दिला होता. पण मूळ पवार कुटुंबाने तो नाकारला होता. ज्या भागात धोकादायक इमारत होती, त्याच परिसरात नवीन घर देण्याची त्यांची रास्त मागणी होती. ती मागणी आतापर्यंत पूर्ण होत नव्हती. त्यासाठी त्यांनी म्हाडाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

 

ताडदेवमध्ये नवे घर

 

म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाने त्यांच्या संघर्षाची दखल घेत ताडदेव येथील जहांगीर वसाहतीतील इमारत क्र. सहामध्ये नवीन घर देण्याचे नमूद केले आहे. हे नवीन घर ३०० चौ.फू. असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली की, त्या जागेचा ताबा दिला जाईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat