देशातील ७५ जिल्हा रुग्णालये होणार वैद्यकीय महाविद्यालये

    दिनांक  09-Jun-2019केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उचलले मोठे पाऊल


नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलत देशातील ७५ जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालय तीन टप्प्यांत ही योजना राबविणार असून पहिल्या टप्प्यात देशातील ५८ जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांत रुपांतर करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात ३९ पैकी २४ जिल्हा रुग्णालयांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूपात कामाला सुरुवात केली आहे तर उर्वरित रुग्णालयांबाबतचे काम अजून सुरू आहे. सरकारने हे पाऊल मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी, या हेतूने उचलले असून यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

 

योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ७५ जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव इकॉनॉमिक अॅण्ड फायनान्स कमिटीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. केंद्रिय मंत्रिमंडळानेदेखील यासंबंधीचा मसुदा तयार केलेला आहे. दरम्यान, एका अंदाजानुसार एका जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्यासाठी जवळपास ३२५ कोटींचा खर्च येणार आहे. वस्तुतः दुर्गम व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली आहे. कारण अधिकतर वैद्यकीय महाविद्यालय देशातल्या शहरी भागात वसलेली आहेत. परिणामी गावखेड्यांत, वनवासी भागात आणि पर्वतीय प्रदेशांत आरोग्य सुविधा देणे अडचणीचे ठरते. परंतु, आता ही योजना लागू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात एमबीबीएसच्या १० हजार आणि एमडीच्या ८ हजार जागा वाढणार आहेत.

 

देशात डॉक्टरांची कमतरता

 

देशात सध्याच्या घडीला डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार देशात एक हजार ९५३ लोकांमागे एक डॉक्टर आहे, तर निकषांनुसार ही संख्या एक हजार लोकांमागे एक डॉक्टर असावा अशी आहे. सरकारची योजना २०२७पर्यंच देशात एक हजार लोकांमागे एक डॉक्टर उपलब्ध करण्याची आहे आणि त्या दृष्टीनेही सरकारचा हा नवा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat