टप्पल ते ट्विटर...

    दिनांक  09-Jun-2019   उत्तर प्रदेशातील अलिगढजवळच्या टप्पल गावावर शोककळेची अंधारी कायम आहे. एका अडीच वर्षाच्या निष्पाप जीवाची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. कारण काय, तर त्या मुलीच्या वडिलांची १० हजार रुपयांचे कर्ज फेडण्याची हतबलता. वडील कर्ज फेडत नाही, म्हणून झाहीद आणि त्याच्या लहान भावाने या चिमुरडीचे अपहरण करून तिला अमानुषपणे संपवले. तीन दिवसानंतर त्या चिमुरडीचे शव कचराकुंडीत कुत्र्यांच्या तोंडाला लागले आणि नंतर या अंगावर काटा आणणाऱ्या क्रौर्याचा उलगडा झाला. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा तर होत्याच, पण उजवा हातही या नराधमांनी कापून काढला. एवढेच नाही, तर चौकशीनंतर प्राप्त झालेल्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, तिच्या गुप्तांगांवरही अनन्वित आघात झाल्याचे निष्पन्न झाले. नंतर कचराकुंडीत फेकलेल्या तिच्या निपचित देहाचे उंदरांनी, कीटकांनीही लचके तोडले ते वेगळे. चेहऱ्यासह संपूर्ण शरीर रक्तबंबाळ आणि ओळख पटण्यापलीकडचे... त्या निरागस बालिकेवर नंतर बलात्कार झाल्याच्या अफवाही सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारख्या पसरल्या आणि हळूहळू ट्विटवरही तिच्या नावाच्या हॅशटॅगसह सेलिब्रिटींपासून सामान्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींना फाशीच झाली पाहिजे, ही मागणी उचलून धरली.आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा खटला न्यायालयात लढायला वकिलांच्या संघटनेनेही बंदी घातली आहे. इतकेच नाही तर सुन्न झालेल्या या चिमुरडीच्या परिवाराने आरोपींना फाशी झाली नाही, तर थेट पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा इशारा दिला आहे. आज या टप्पलच्या बालिकेसाठी ट्विटरचे ऑनलाईन विश्व एकवटले असले तरी केवळ विरोधप्रदर्शने, कँडल मार्चने यांसारख्या घटनांची पुनरावृत्ती थांबणार नाही. दरवेळी अशा अमानवीय घटनेनंतर जनआक्रोश उफाळून येतो. ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर द्वेष, उद्विग्नपूर्ण भावनांना वाचा फुटते. पण, अवघ्या काही दिवसांत विरोधाचे हे सूर मावळतात. पुढे आरोपींचे काय झाले? कारवाई किती वेगाने सुरू आहे? त्यांना कडक शिक्षा झाली का? यांसारखे प्रश्न आपसूकच कालौघात गुडूप होऊन जातात. सामान्यांसारखे हाती फक्त ऑनलाईन विरोध करण्यापुरते मर्यादित न राहता, अशा गुन्ह्यांची प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात निकाली काढण्यासाठी सरकारवर, लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करायलाच हवा; अन्यथा या अमानवी घटनेसारख्या अन्य घटनाही फक्त टप्पलपासून ट्विटरपर्यंतच मर्यादित राहतील.

 

सावध ऐका, पुढल्या हाका...

 

अलिगढमध्ये घडलेली क्रौर्याची परिसीमा गाठणारी ही काही पहिलीच घटना नाही. या प्रकारच्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटना वेळोवेळी भारताच्या ग्रामीण भागापासून ते शहरी भागात अगदी कुठेही घडू शकतात. त्यामुळे आपले राज्य, आपले शहर, आपला परिसर हा सुरक्षित या गैरसमजुतीत कोणीही राहू नये. घरातील काही महिन्यांच्या बाळापासून ते ज्येष्ठ नागरिक महिलांपर्यंत १०० टक्के सुरक्षिततेची हमी आज कुणीच देऊ शकत नाही, हे वेळोवेळी घडलेल्या घटनांमधून वारंवार सिद्ध झाले आहे. पण, तरीही बऱ्याच पालकांना या घटनांमागचे गांभीर्य अद्यापही लक्षात आलेले दिसत नाही. शेजारची पाच वर्षांची प्राची घरात दिसली नाही, म्हणून घरकामात गुंतलेल्या तिच्या आईला सहज विचारले, “काकू, कुठे गेली हो आज आपली छकुली? घरात अगदी शांतता आहे, म्हणून विचारलं.” त्यावर “असेल इथेच कुठे तरी खेळत...” असे पटकन उत्तर देऊन प्राचीच्या आईने पुन्हा आपल्या कामात डोके खुपसले. म्हणजे, आपली पाच वर्षांची पोरगी घराबाहेर कुठे आहे, हे तिच्या आईला ठाऊक नाहीच, शिवाय त्याचे अजिबात गांभीर्यही नाही. बहुतांश आयांची हीच गत. पण, ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कारण, मुलं खेळताखेळता कधी रस्ता ओलांडतील, कोणा अनोळखी व्यक्तीच्या घरात जातील, हल्ली फूड पार्सल देणाऱ्यांचीही इमारतीमध्ये ये-जा असतेच, अशावेळी आपला शेजार सुरक्षित आहे म्हणून मुलगा असो अथवा मुलगी दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. त्यामुळे सुरक्षिततेचा उगाच स्वत:ची समजूत काढण्यासाठी तयार केलेला भ्रम प्रत्येक पालकाने तोडायलाच हवा. मुलांमागे प्रत्येक वेळी पळणे शक्य नसले तरी त्यांना ‘चांगला स्पर्श, वाईट स्पर्श’ याची शिकवण द्यावी. कोणाकडून काही घ्यायचे नाही, हे आपण सांगतोच, पण कोणा अनोळखी व्यक्तीशी बोलायचे नाही, सोबत जायचे नाही, हे त्यांच्या मनावर ठासून बिंबवावे लागेल. तसेच आपल्या पाल्याला घरचा संपूर्ण पत्ता, पालकांचे मोबाईल क्रमांक तोंडपाठ करून घ्यावेच. शिवाय, नृत्य आणि चित्रकलेबरोबरच त्यांना कराटे, ज्यूडो असे आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण शालेय जीवनातच ‘काळाची गरज’ समजून द्यायलाच हवे. हल्लीची मुलेमुली कमी वयात भरपूर समजूतदार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधा आणि स्वत: सावध राहा आणि मुलांनाही सावधगिरीचे धडे द्या!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat