नैऋत्य मौसमी पाऊस येत्या चोवीस तासात केरळमध्ये दाखल होणार

    दिनांक  08-Jun-2019नैऋत्य मौसमी पाऊस येत्या चोवीस तासात केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात काही भागात कालही वळीवाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यांत महातपुरी गावात काल वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. यात दुचाकीवरून घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला तर नागडगाव येथे शेतातून घरी जाणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातही काल वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात अनेकांच्या घरांवरचे पत्रे उडाले तसेच विद्युत पुरवठाही खंडीत झाला. जवळपास तासभर चाललेल्या या वादळाने तालुक्यातल्या केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सेलू तालुक्यात देवगाव फाटा आणि परिसरालाही काल संध्याकाळी वादळाचा फटका बसला. हिंगोली शहर आणि परिसरात काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाच्या पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर आणि कन्नड तालुक्यातल्या काही भागात वादळी पाऊस बरसला. पावसासह वादळी वारे आल्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले आणि विद्युत ताराही तुटल्या. औरंगाबाद शहराच्या काही भागातही काल पाऊस पडला. जालना शहरातही आज सकाळी पाऊस झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat