समाजकंटकांनी केली झाडांची कत्तल

    दिनांक  08-Jun-2019मुंबई : 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर' संचालित 'पर्यावरण विवेक समिती'च्या मार्फत मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भालिवली गावात तीन वर्षांपू्र्वी लावलेल्या काही झाडांची अज्ञात समाजकंटकांकडून कत्तल करण्यात आली आहे. यामध्ये १० फुटांपेक्षा वाढलेली ४५ झाडे तोडण्यात आली असून ही घटना शुक्रवारी निदर्शनास आली. याविरोधात समितीमार्फत पोलीस तक्रार नोंदविण्यात आली आहे. मात्र या घटनेचा पर्यावरणप्रेमींनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला असून लवकरात लवकर तपास करून हे कृत्य केलेल्या आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

 

वृक्षारोपनाचा वसा घेत 'पर्यावरण विवेक समिती'च्या वतीने दरवर्षी १ जुलै रोजी वृक्षारोपनाचा कार्यक्रम राबविला जातो. या अंतर्गत समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांच्य़ा नावाने झाडांची लागवड केली जाते. मुंबई अहमदाबाद महामार्ग ४८ येथील भालिवली येथे वनखात्याच्या जागेत 'विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर'च्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येतो. या वृक्षवनाची देखभाल 'पर्यावरण विवेक समिती'चे कार्यवाह उमेश गुप्ता, निवृत्त वनाधिकारी एन.ए.पाटील, हरिश्चंद्र पाटील यांच्यासह अनेक मजुरांच्या मदतीने केली जाते. वृक्षांची लागवड करण्याबरोबरच त्यांची देखभाल करणे आणि वृक्षांच्या अक्षांश व रेखांशाची नोंद त्यांच्यामार्फत ठेवण्यात येते. या वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत १ जुलै, २०१६ रोजी याठिकाणी सुमारे ५०० झाडे लावण्यात आली होती. पुलावामा दहशतवादी हल्यातील शहिदांच्या स्मृतीसाठी येथे सैनिकवन तयार करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या झाडांची योग्य प्रकारे निगा राखण्याचे काम सुरू असल्याने त्यांची उत्तम वाढ झाली होती.

 

मात्र काही समाजकंटकांनी त्यातील ४५ झाडांची गुरुवारी मध्यरात्री कत्तल केली. १० ते १२ फुटांपर्यत वाढलेली झाडे धारधार शस्त्रांच्या आधारे तोडण्यात आली. शुक्रवारी या ठिकाणी मजूर गेल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. या घटनेची गंभीर दखल घेत, आम्ही विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याची माहिती समितीचे कार्यवाह उमेश गुप्ता यांनी दिली. सदर घटना अत्यंत संतापजनक असून अज्ञात समाजकंटकांना कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे. या घटनेचा पर्यावरणप्रेमींकडूनही निषेध नोंदविण्यात आला आहे.

 

तोडलेल्या झाडांची नावे

 

जात          संख्या

 

कडूलिंब        १०

रिठा           ४

विलायती चिंच   

काशिद         १

आपटा.         २

आंबा.          ३

सिसव.         ६

बेहडा.          ४

चिंच.          ४

बांबू.           ३

आवळा.        १

हुंब.           ३

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat