योग दिनाला पंतप्रधान ३० हजार लोकांसह योगासनांमध्ये सहभाग घेणार

    दिनांक  08-Jun-2019


 

२१ जून हा दिवस भारतात योग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी भारतात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि विशेष म्हणजे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतात. यावर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी रांची येथे तब्ब्ल ३० हजार लोकांसह योगदिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाची छोटीशी रंगीत तालीम १३ जूनला पार पडणार असून यावेळी अनेक योग अभ्यासक, गुरु आणि राज्यातील अनेक प्रतिष्ठित लोक उपस्थित राहणार आहेत. देशभरातील आंतरराष्ट्रीय योग दिनाचे पर्यवेक्षण करण्यासाठी आयुष मंत्रालय कार्य करत आहे. दरवर्षी आयुष्य मंत्रालय अशाप्रकारच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व म्हणजे, यावर्षी या दिनाचे महत्व पटवून देऊन सरकारतर्फे जनतेला इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. सिंथेटिक आणि अन्य रासायनिक प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या वापरामुळे पर्यावरण तर खराब होतेच मात्र त्याचे आरोग्यावर देखील वाईट परिणाम होतात त्यामुळे हे थांबवण्यासाठी सरकारकडून पुढाकार घेतला जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat