‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास,’ हा आमच्या परराष्ट्र धोरणाचा पाया

    दिनांक  08-Jun-2019


 

माले : प्रचंड बहुमतासह दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शनिवारी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यात मालदीवला भेट दिली. नरेंद्र मोदींनी आपल्या मालदीव भेटीत तिथल्या संसदेला-मजलिसला संबोधित केले. तत्पूर्वी मोदींना मालदीवच्या ‘रुल ऑफ निशान इज्जुद्दीन’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच मोदींनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलीह यांना भारतीय क्रिकेट संघाच्या हस्ताक्षरांतील बॅटही भेट म्हणून दिली.

 

मालदीवच्या संसदेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “मालदीवमधील लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी भारत आणि प्रत्येक भारतीय तुमच्याबरोबर होता आणि यापुढेही राहिल. भारतातदेखील नुकतीच इतिहासातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया-लोकसभा निवडणूक पूर्ण झाली. १३० कोटी भारतीयांसाठी ही केवळ निवडणूक नव्हती तर लोकशाहीचा महोत्सव होता. यंदाच्या निवडणुकीत दोन तृतीयांशपेक्षा अधिक म्हणजे ६० कोटी मतदारांनी मतदान केले. माझ्या सरकारचा मूलमंत्र ‘सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास’ आहे आणि केवळ भारतातच नव्हे तर जगातही माझ्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा पायाही हेच तत्त्व आहे. शेजारी आमच्यासाठी प्राधान्याचा (नेबरहूड फर्स्ट) विषय असून मालदीवला प्राधान्य देणे ही गोष्टही साहजिकच,” असेही यावेळी मोदी म्हणाले.

 

मोदी पुढे म्हणाले की, “भारताच्या सहकार्याचा आधार लोककल्याणच राहणार आहे. आज आम्ही दोन्ही देशांदरम्यान करारही केले. मला आनंद वाटतो की, शिक्षण, आरोग्य, व्यापारासाठी मालदीवला येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाची सुविधा देण्यात आली आहे. परस्पर सहकार्य वाढवत नेऊन आज जगातील गहन चिंतेच्या विषयांवर लक्ष देणे गरजेचे आहे.” पर्यावरण, हिंदी महासागर क्षेत्रातील अनुत्तरीत प्रश्न आणि दहशतवादाच्या जागतिक अक्राळविक्राळ स्वरूपावर मोदी म्हणाले की, “अशी कोणतीही जागा नाही, जिथे दहशतवादाने आपल्या भयानक कृत्यांद्वारे निर्दोषांचा जीव घेतला नाही. दहशतवाद्यांची कोणतीही बँक नाही, संस्था नाही वा कारखानेही नाहीत, तरीही त्यांना पैशाच्या वा शस्त्रास्त्रांची कमतरता भासत नाही. तर दहशतवाद्यांना हे कोण देते?” असा सवालही यावेळी मोदींनी केला.

 

“राज्य (पाकिस्तान) पुरस्कृत दहशतवाद सर्वात मोठा धोका आहे,” असे सांगतानाच, “गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा भेद करणे चुकीचे आहे. पाणी आता डोक्यावरून वाहू लागले आहे. दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्वच मानवतावादी शक्तींनी एकजूट व्हायला हवे. दहशतवादाचा निपटारा करणे जागतिक नेतृत्वापुढील मोठे आव्हान आहे, पण ज्याप्रमाणे जागतिक समुदायाने पर्यावरणाला असलेल्या धोक्यावर जागतिक संमेलन आयोजित केले, तसेच दहशतवादाबद्दलही जागतिक संमेलन आयोजित करायला हवे,“ अशी अपेक्षा यावेळी मोदींनी व्यक्त केली. “मी सर्वच प्रमुख देशांना आवाहन करतो की, एका समयसीमेच्या आत दहशतवादावर जागतिक परिषदेचे आयोजन करावे. जेणेकरून दहशतवादी ज्या कमतरतांचा फायदा घेतात, त्या संपविण्याच्या दृष्टीने विचार करता येईल. जर आज उशीर केला तर आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत,” असेही ते मोदी म्हणाले.

 

भारताच्या सहकार्याने मालेतील रस्त्यांवर झगमगाट

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारताच्या सहकार्याने मालेतील रस्ते अडीच हजार एलईडी पथदिव्यांमुळे उजळत आहेत आणि दोन लाख एलईडी बल्ब मालदीववासीयांच्या घरांना आणि दुकानांना चमकविण्यासाठी आले आहेत. भारतासाठी मालदीवहून मोठा सहकारी कोणी नाही.

 

परस्पर सहकार्य वाढवावे लागेल

 

हिंदी महासागर क्षेत्रात जगातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राहते, पण या भागातील कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला परस्पर सहकार्य वाढवावे लागेल, असे स्पष्ट करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, चार वर्षांपूर्वी मी सागर शब्दाचा उच्चार केला होता, ज्याचा अर्थ सिक्युरिटी अ‍ॅण्ड ग्रोथ फॉर ऑल रीजन असा होतो. पुढे ते म्हणाले की, पृथ्वीचे आपण मालक नाही तर विश्वस्त आहोत आणि त्यामुळे आपल्याला पृथ्वीची काळजी घ्यावीच लागेल.

 

मालदीव-भारत फेरी सेवा

 

दोन्ही देशांतील संबंध केवळ सरकार-सरकारादरम्यान नसतात, तर नागरिकांदरम्यानचा संपर्क त्या संबंधांचा प्राण असतो. म्हणूनच मी अशा सर्वच उपायांना महत्त्व देतो, ज्यातून पीपल टू पीपल एक्सचेंजेसला प्रोत्साहन मिळेल. मला हे सांगायला आनंद वाटतो की, आज दोन्ही देशांनी नौका-फेरी सेवेबद्दलचाही करार केला आहे.

 

जगाचा अनमोल दागिना म्हणजे मालदीव

 

“मालदीव म्हणजे हजारपेक्षा अधिक बेटांची माळ. हा केवळ हिंदी महासागरच नव्हे तर संपूर्ण जगाचा अनमोल दागिना आहे. मालदीवचे असीम आणि नैसर्गिक सौंदर्य हजारो वर्षांपासून आकर्षणाचे केंद्र राहिले. मालदीव आणि संसदेत उपस्थित राहून मला आनंद वाटत आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat