दहावीचे निकाल जाहीर; नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी

    दिनांक  08-Jun-2019 


कोकण विभागाचा सर्वाधिक ८८.३८ टक्के तर सर्वात कमी नागपूर विभागाचा ६७.२७ टक्के निकाल

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ८२.८२ टक्के मुली तर ७२.७८ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्या कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, लातूर, अमरावती, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बोर्डाची पत्रकार परिषद घेऊन दिली.

 

अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतरची ही पहिलीच परीक्षा असल्याने गुणफुगवटा आटला असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्याची नोंदणी झाली होती. त्यातील १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागवार पाहायचं झालं तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८८.३८ टक्के लागला आहे. त्याखालोखाल कोल्हापूर विभाग ८६.५८ टक्के निकालासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ८२.४८ टक्क्यासह पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

मुंबई विभागाचा निकाल ७७.०४ टक्के इतका लागला असून नागपूर ६७.२७ टक्के, औरंगाबाद ७५.२० टक्के, नाशिक ७७.५८ टक्के, अमरावती ७१.९८ टक्के आणि लातूर विभागाचा ७२.८७ टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील तब्बल १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना हे निकाल दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या संकेतस्थाळावर पाहता येणार आहेत.

 
याठिकाणी पाहता येणार निकाल
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat