'हॅप्पीनेस इंडेक्स'वर देशाच्या प्रगतीचे मूल्यमापन!

    दिनांक  08-Jun-2019मुंबई : देशाच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना 'पर कॅपिटा इन्कम' प्रमाणे 'पर कॅपिटा हॅप्पीनेस' काय आहे, याचा विचार केला जात असून माणसाच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य ही खरी संपत्ती मानण्यात येत असल्याची माहिती आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मल्टिप्लेक्स आणि एकपडदा चित्रपटगृहाचे मालक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसमवेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात संवाद साधला आणि त्यांना या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आ. मंगलप्रभात लोढा, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह चित्रपटगृहांचे प्रतिनिधी, निर्माते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

"जीवनात वन नसते तर जीव कुठेच रमला नसता," असे सांगून मुनगंटीवार यांनी, जिथे वनसृष्टी आहे तिथेच जीवसृष्टी असल्याचे स्पष्ट केले. "सेवाभावाबरोबरच समाजातील व्यक्तींच्या मनात वृक्षभाव रुजविण्यासाठी चित्रपटक्षेत्रातील मान्यवरांनी सहकार्य करावे, या क्षेत्रातील मान्यवरांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा एक संदेश खूप मोठी प्रेरणा ठरू शकतो, हे लक्षात घेऊन या सर्व मान्यवरांनी आपल्या माध्यमांमधून वृक्षलागवडीस प्रोत्साहन देणारे संदेश द्यावेत, जिथे शक्य असेल तिथे वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होऊन इतरांना प्रेरणा द्यावी," असे आवाहनही त्यांनी केले.

 

"चित्रपटगृहाच्या मालकांनी वृक्षलागवडीस प्रोत्साहन देणाऱ्या चित्रफिती सामाजिक कार्यात योगदान देण्याच्या भावनेतून चित्रपटगृहात विनामूल्य प्रदर्शित कराव्यात," अशी अपेक्षाही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. सर्वांच्या सहकार्यातून ३३ कोटी वृक्षलागवडीचे मिशन पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त करताना, "३३ कोटी वृक्षलागवड हा यावर्षीचा सर्वात मोठा उपक्रम असून महाराष्ट्राचे हे काम जगासाठी पथदर्शी स्वरूपाचे राहील," असेही ते म्हणाले. "जगातील सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहिली असून आतापर्यंत ६१ लाख लोक हरित सेनेचे सदस्य झाले आहेत," अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी झालेल्या सादरीकरणात वनविभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. वृक्षलागवडीतील पारदर्शकतेसाठी माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग, '१९२६ हॅलो फॉरेस्ट' हेल्पलाईनची माहिती, हरित सेना, आजपर्यंत झालेली वृक्षलागवड, त्यातील लोकसहभाग आदी माहितीचा त्यात समावेश होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat